पचनक्रिया सुधारण्यासाठी असा घ्या आहार, जाणून घ्या अधिक

पचनक्रिया सुधारण्यासाठी असा घ्या आहार, जाणून घ्या अधिक
Published on
Updated on

आपली रोगट आणि अनियमित दिनचर्येमुळे शरीराची चयापचय क्रिया मंद होत जाते आणि त्याची लक्षणे लठ्ठपणाच्या रूपात दिसू लागतात. चयापचय क्रिया आपोआप मंद होत नाही. आपली दिनचर्या त्यासाठी कारणीभूत असते. चयापचय क्रिया म्हणजे काय?
आपण जे खातो, पितो, त्याला पचवून त्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे चयापचय क्रिया. इंग्रजीत याला मेटाबॉलिजम असे म्हणतात. ही एक अशी प्रक्रिया आहे की जी कॅलरीचे ऊर्जेत रूपांतर करते. आपल्या शरीराला सतत ऊर्जेची आवश्यकता असते. शरीरात चयापचय क्रिया 24 तास सुरू असते. आपण झोपतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत क्रिया म्हणजे रक्त प्रवाह, श्वासोच्छ्वास, पेशींची दुरुस्ती यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. चयापचय क्रिया दोन प्रकारची असते.

बीएमआर म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट आणि आरएमआर म्हणजे रेस्टिंग मेटाबॉलिक रेट. आपण दिवसभर जितक्या कॅलरींचे सेवन केलेले असते, त्याच्या 75 टक्के खर्च आरएमआर करतो. उरलेल्या कॅलरी पचन आणि अन्य शारीरिक हालचालींसाठी असतात. सर्वसाधारणपणे आरएमआरसाठी एका प्रौढ महिलेला 1200 कॅलरींची गरज असते. तर 200 ते 400 अतिरिक्त कॅलरींची इतर शारीरिक हालचालींसाठी गरज असते.

पुरुषांसाठी 1300 कॅलरी आरएमआरसाठी आवश्यक असतात तर शारीरिक हालचालींसाठी त्यांना अतिरिक्त 400 ते 600 कॅलरींची आवश्यकता असते. अर्थात प्रत्येकाची शारीरिक हालचाल, सक्रियता वेगवेगळी असते, त्यामुळे त्यांच्या कॅलरी खर्च होण्याचे प्रमाणही वेगवेगळे असते. आपल्या शरीरात जितक्या कॅलरी खर्च होत नाहीत, त्या चरबीच्या रूपात शरीराच्या वेगवेगळ्या भागात साठवल्या जातात आणि त्यातूनच लठ्ठपणा निर्माण होतो. चयापचय क्रिया कमी झाली तर शरीराचे वजन एके ठिकाणीच स्थिर राहू शकते. चयापचय क्रियेबरोबरच आणखी एक गोष्ट असते ती म्हणजे कॅटाबॉलिक रेट. हा वाढला की शरीराचे वजन कमी होऊ लागते.

चयापचय क्रियेवर परिणाम करणारे घटक

सकाळच्या वेळी चयापचय क्रिया जलद होते. तुमची दिनचर्या व्यस्त असेल तर उर्जेची गरज आणि खर्च वेगाने होते. म्हणूनच सकाळी पौष्टिक नाष्टा करणे आवश्यक असते. संध्याकाळी आपली शारीरिक हालचाल कमी होते. चयापचय क्रियाही मंदावते. म्हणूनच संध्याकाळी हलका आहार घ्यावा. सकाळच्या वेळी नाष्टा न करणे आरोग्यासाठी चांगले नाही. एकदम दुपारीच जेवल्याने चयापचय क्रियेवर वाईट परिणाम होतो. सकाळी उठल्यावर दीड ते दोन तासांच्या आता आपण काही तरी पौष्टिक खाणे आवश्यक असते. सकाळी योग्य वेळी नाष्टा केल्यावर दुपारी आणि संध्याकाळचे जेवणही योग्य वेळेतच केले जाते. खाण्यापिण्यातील नियमितपणाचा चयापचय क्रियेवर चांगला परिणाम होतो.

महिलांची चयापचय क्रिया पुरुषांच्या तुलनेत कमी असते. मासिक पाळीच्या चार-पाच दिवसांत सर्वसाधारणपणे महिला व्यवस्थित आहार घेत नाहीत. अनेकदा या काळात शारीरिक हालचालही होत नाही. चार-पाच दिवसांच्या काळात आहारात आलेल्या अनियमितपणामुळे चयापचय क्रियाही मंदावते. याशिवाय सकाळचा नाष्टा करण्याबाबतही महिला फारशा उत्साही नसतात. चयापचय क्रिया केवळ पौष्टिक खाण्या पिण्याने वाढते असे नाही. नियमित व्यायामामुळे अतिरिक्त ऊर्जा खर्च होते आणि चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवते. आपण घेत असलेल्या जेवणाचे छोट्या कणांत आणि त्यानंतर ऊर्जेत रूपांतर होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपल्या शरीरात पाणी कमी असेल तर चयापचय क्रिया मंदावेल. म्हणूनच ताजी फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. मधुमेह किंवा हृदयविकाराच्या रुग्णांनी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. संतोष काळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news