Deep Sleep : झोप पूर्ण होत नसल्‍याने त्रस्‍त आहात? शांत झोपेसाठी ‘या’ टिप्‍स फॉलो करा… | पुढारी

Deep Sleep : झोप पूर्ण होत नसल्‍याने त्रस्‍त आहात? शांत झोपेसाठी 'या' टिप्‍स फॉलो करा...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झोप हा निरोगी आरोग्‍याचा पाया आहे, हे आपण अनेकवेळा ऐकलेले वाक्‍य. आपण आजारी पडलो की, डॉक्‍टर आपल्‍याला पुरेशी विश्रांती घ्‍या, असा सल्‍ला देतात. यावरुन आपल्‍याला झोप आणि विश्रांतीचे महत्त्‍व स्‍पष्‍ट होते. मात्र निद्रानाश ही आजच्या काळातील अनेकांची डोकेदुखी बनली आहे. निद्रानाश हा आजार कोणालाही होऊ शकतो. यावर वैद्यकीयशास्त्रात सखोल संशोधन झाले आहे. यातील काही निष्कर्षानुसार खालील टीप्स आपल्याला शांत झोप (Deep Sleep) येण्यासाठी फायदेशीर ठरतील. त्या जाणून घेऊया…

Deep Sleep : अनिद्रा हा जीवनशैलीचा भाग

अनेक वेळा अतिरिक्त ताण-तणावामुळे निद्रानाश होतो. तसेच मनात सतत एखादी गोष्ट बोचत असेल तरी झोप न येण्याचा आजार जडू शकतो. या व्यतिरिक्त आजच्या काळातील #LifeStyle मुळे देखील अनेकांना झोप न येण्याचा त्रास होतो. यावर उपाय म्हणून अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झोप येण्याच्या गोळ्या घेतात. मात्र, हा अतिशय तात्पुरत्या स्वरुपाचा उपाय असतो. शिवाय याला खूप मर्यादा देखील आहेत. त्यामुळे शांत आणि गाढ झोप येण्यासाठी आपण खालील सोपे उपाय करू शकतो.

 

१) झोपेची निश्‍चित वेळ ठरवा

आधुनिक जीवनशैलीमुळे आहार आणि झोप यांचे नियोजन बिघडल्‍याचे चित्र आहे. निरोगी आरोग्‍यासाठी रात्री सलग सात ते आठ तास झोप अनिवार्य आहे. तुम्‍हाला अनिद्रेचा त्रास होत असेल तर रात्री झोपी जाण्‍याची निश्‍चित वेळ ठरवा. ही वेळ नियमित पाळा. यासाठी तुम्‍हाला टीव्‍ही आणि मोबाईल फोनपासून लांब राहावे लागेल. झोपेचेही एक घड्याळ असते. एकदा तुम्‍हाला वेळेची सवय झाला. त्‍या वेळेत झोप येण्‍याची सवय होते. तुम्‍ही झोपण्‍यासाठी बेडवर पडून राहिलात आणि २० मिनिटांहून अधिक वेळ तुम्‍हाला झोप येत नसेल तर सुखद असे संगीत ऐका किंवा तुमच्‍या आवडीचे पुस्‍तक वाचायला बसा. काही वेळ गेल्‍यानंतर तुम्‍हाला गाढ झोप लागेल.

2) Deep Sleep : रात्रीचा आहार महत्त्‍वाचा

रात्री कधीही तुम्‍ही उपाशी राहू नका तसेच अतिही खाणेही टाळा. या दोन्‍ही सवयी तुमची झोप उडवू शकतात. झोपेपूर्वी तुम्‍ही धुम्रपान, कॉफी, चहा व मद्‍य असे शरीराला हानीकारण द्रव्‍य हे झोप मोडीसचे मुख्‍य कारणही ठरते. त्‍यामुळे रात्री हलका आहार घ्‍या आणि उत्तेजक पेय टाळून मन आणि शरीराला विश्रांती देणारी गाढ झोप अनुभवा.

3 ) झोपे पूर्वीची वातावरण निर्मिती

झोप न येण्‍यास जशी शारीरिक कारणे असतात तशीच वातावरणही कारणीभूत ठरते. गाढ झोपेसाठी तुमची रुम ही आल्‍हाददायक आणि शांत हवी. खोलीतील अतिप्रकाशही तुमची झोप मोड करु शकते. त्‍यामुळे रुममधील लाईट, हवा आणि अन्‍य उपकरणाचा योग्‍य वापर करुन तुम्‍ही शांत व गाढ झोप अनुभवू शकता. तसेच तुम्‍ही खूपच मानसिक तणावातून जात असाल तर झोपेपूर्वी आंघोळ करुन तुम्‍ही मानसिक तणाव कमी करु शकता.

4) उलटा श्वास मोजा

रात्री झोपण्‍यापूर्वी आपण आपले सर्व लक्ष श्वासावर केंद्रीत करून तो १०,९, ८, ७,६, ५ अशा उलट्या पद्धतीने अंक मोजल्यास आपल्याला झोप येण्यास मदत होते. कारण अंक माेजण्‍याची पुनरावृत्ती ही मनाला थकवते. मन तणावपूर्ण असेल तर त्‍याला शांत करते. तुम्‍हाला झाेप येत नसेल तर हा उपाय केल्यास शांत आणि गाढ झोप लागण्‍यास मदत हाेते.

5) दिवसभर सकारात्मक वाक्य म्हणणे

आपले मन आपले म्हणणे ऐकत असते. त्यामुळे एकाच गोष्टीचा सातत्याने पुनर्रुचार केल्यास मन शरीराला ती कृती करायला लावते. त्यामुळे झोप न येणा-यांनी दिवसभरात ‘मला रात्री —-या वेळेला शांत झोप लागते. मी खूप गाढ झोपतो.’ या वाक्याचा वारंवार दिवसभर मनातल्या मनात पुनर्रुच्चार केल्याने ही रात्री शांत आणि वेळेवर झोप लागते. मात्र, हा उपाय करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. दररोज काही दिवस हा उपाय केल्याने याची आपल्या मनाला सवय होते. मन ही गोष्ट लक्षात ठेवतो आणि नंतर त्यप्रमाणे आपले शरीर ही कृती करतो.

6) दिवसाची झोप टाळा, नियमित व्‍यायाम आवश्‍यकच

तुम्‍हाला रात्री गाढ झोप हवी असेल तर दिवसाची झोप टाळणे हे फायदेशीर ठरते. दिवसा अल्‍प काळासाठी विश्रांती घ्‍या मात्र सलग तास ते दोन तास झोपू नका. याचा परिणाम रात्रीच्‍या झोपेवर होतो. दिवसाची झोप तुमच्‍या रात्रीच्‍या झोपेत व्‍यत्‍यय आणू शकते. तुम्‍हाला निरोगी जीवनशैलीसाठी व्‍यायाय हा अनिवार्यच आहे. तसेच गाढ झोपेसाठीही नियमित व्‍यायाम खपूच फायदेशीर ठरतो. मात्र झोपेपूर्वी दोन तास आधी शारीरिक हालचाली टाळा

 

Back to top button