मंकीपॉक्स: संसर्गाचा प्रभाव किती काळ टिकतो, त्याची लक्षणे कशी विकसित होतात? जाणून घ्या सर्व काही तपशीलवार | पुढारी

मंकीपॉक्स: संसर्गाचा प्रभाव किती काळ टिकतो, त्याची लक्षणे कशी विकसित होतात? जाणून घ्या सर्व काही तपशीलवार

पुढारी ऑनलाईन: जागतिक स्तरावर कोरोना महामारी सोबतच मंकीपॉक्स संसर्ग वाढत आहे. मे महिन्यापासून सुमारे 80 देशांमध्ये 21,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर डझनभर लोकांनी या संसर्गामुळे आपला जीव गमावला आहे. भारतातही संक्रमणाचा धोका वाढत आहे. सध्या देशात ९ जणांना संसर्ग झाल्याची माहिती आहे. यापैकी एका संक्रमिताचा मृत्यूही झाला आहे.

मंकीपॉक्सच्या संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेनेही याला ‘आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे. जागतिक स्तरावर वेगाने वाढणाऱ्या या धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व लोकांना मंकीपॉक्सची अचूक माहिती असणे आणि त्यावर आधारित प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मंकीपॉक्स संसर्गावरील आतापर्यंतच्या अभ्यासात, आरोग्य तज्ञ याला जास्त धोकादायक मानत नाहीत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मंकीपॉक्सचा संसर्ग जीवघेणा होण्याचा धोका खूपच कमी आहे. मात्र त्याची गंभीर लक्षणे आणि संसर्ग निश्चितपणे तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतात. हा धोका लक्षात घेऊन प्रत्येकाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत राहायला हवे. चला जाणून घेऊया की, जर एखाद्याला मंकीपॉक्सची लागण झाली असेल, तर त्याचा प्रभाव किती काळ टिकतो, तसेच कोणत्या लक्षणांच्या आधारे तो ओळखता येतो?

संसर्गाची सुरुवात फ्लूसारख्या लक्षणांनी

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मंकीपॉक्स संसर्गाची सुरुवात फ्लूसारख्या लक्षणांनी होते. मंकीपॉक्सच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, ताप, थकवा आणि अंगदुखी यासारख्या समस्या प्रथम अनुभवल्या जातात. कालांतराने ही सर्व लक्षणे विकसित होऊ शकतात आणि गंभीर स्वरूप घेऊ शकतात. मंकीपॉक्स इन्क्युबेशनचा कालावधी 1-2 आठवडे असू शकतो. जर अशी लक्षणे सामान्य औषधांनी बरी होत नसतील तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

लिम्फ नोड समस्या

मंकीपॉक्स संसर्गाची सुरुवातीच्या लक्षणांनंतर काही दिवसांत लिम्फ नोड्सची समस्या येऊ शकते. यामध्ये तुम्हाला लिम्फ नोड्स सुजणे किंवा त्याचा आकार वाढणे यासारख्या समस्या जाणवू शकतात. मंकीपॉक्सच्या संसर्गादरम्यान जेव्हा शरीर फ्लूसारख्या लक्षणांचा सामना करत असते, तेव्हा लिम्फ नोड्समध्ये समस्या दिसू शकतात. संसर्गाची अशी लक्षणे दुसऱ्या टप्प्याचे लक्षण मानले जातात.

 त्वचेवर पुरळ किंवा फोड येणे

तज्ज्ञांच्या मते, लिम्फ नोड्सशी संबंधित समस्यांसोबतच दोन-तीन दिवसांतच हात, पाय, चेहरा, तोंड आणि गुप्तांग यांसारख्या शरीराच्या अनेक भागांवर पुरळ किंवा फोड दिसू लागतात. ताप येण्यास सुरुवात झाल्यानंतर ४-५ दिवसांनी शरीरात असे बदल दिसून येतात. कालांतराने या फोडांमध्ये द्रव्य जमा होऊ लागते, ज्यामुळे तुम्हाला तीव्र वेदना होऊन खाज सुटू शकते.

संसर्गाची लक्षणे किती काळ टिकतात?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्सचा संसर्ग 2 आठवड्यांपासून ते एक महिन्यापर्यंत टिकू शकतो. या दरम्यान डॉक्टर उपचार म्हणून लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी आणि शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करण्यासाठीची औषधे देतात. प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून हा गंभीर धोका टाळता येऊ शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. मंकीपॉक्स सामान्य परिस्थितीत प्राणघातक नाही, त्याचा संसर्ग बरा होऊ शकतो.

Back to top button