blood vessel: रक्‍तवाहिन्यांत चरबी जमा झाल्यास… | पुढारी

blood vessel: रक्‍तवाहिन्यांत चरबी जमा झाल्यास...

पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज (पीव्हीडी) हा रक्‍तवाहिन्यांचा सर्वात सामान्य रोग आहे. या रोगामध्ये रक्‍तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस किंवा रक्‍तवाहिन्या कडक होणे असे म्हणतात. चरबीचा हा संचय हळूहळू होतो. कालांतराने यामुळे धमन्यांत अडथळा येऊ शकतो. धमन्या संकुचित किंवा कमकुवत होऊ शकतात. जेव्हा धमनीमध्ये अशा प्रकारचा अडथळा येतो तेव्हा त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. अनेकदा एथेरोस्क्लेरोसिस हृदयावर आणि मेंदूच्या वरच्या रक्‍तवाहिन्यांना परिणाम करते. वास्तविक, एथेरोस्क्लेरोसिस संपूर्ण शरीरातील कोणत्याही रक्‍तवाहिनीवर परिणाम करू शकतो.

जोखमीचे घटक कोणते : एथेरोस्क्लेरोसिसची कारणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे ज्यामध्ये संपूर्ण रक्‍तवाहिन्या प्रभावित होतात. जसे की 50 वर्षांपेक्षा जास्त वय, जास्त वजन, वाढलेले कोलेस्टेरॉल, स्ट्रोक, कोरोनरी धमनी रोग, उच्च रक्‍तदाब, मधुमेह किंवा किडनी रोग हे घटकही कारणीभूत ठरतात. पेरिफेरल व्हॅस्क्युलर रोगासाठी धूम्रपान हे अत्यंत महत्त्वाचे आणि थेट कारण आहे.

लक्षणे : काही वेळ चालल्यानंतर पाय दुखणे, पायाची बोटे काळी पडणे (गँगरीन), न बरे होणारे व्रण, पुरुषांमध्ये नपुंसकत्व, सुन्‍नपणा येणे, केस गळणे किंवा पायावर केसांची वाढ कमी होणे, थकवा येणे, पायाच्या बोटांत वेदना, बसलेल्या स्थितीत क्रॅम्पिंग किंवा तीव्र वेदना होतात तेव्हा आपण वेदना म्हणतो. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पायाला विलक्षण थंडी जाणवते.
या स्थितीवर उपचार न केल्यास स्ट्रोक किंवा पायाला गँगरीन होऊ शकतो. धमन्यांमध्ये प्लेक तयार झाल्यामुळे हृदय आणि मेंदूतील रक्‍तवाहिन्यांवरही परिणाम होऊ शकतो. या स्थितीमुळे दिसणारी आणखी एक समस्या म्हणजे इस्केमिया ज्यामध्ये रक्‍तपुरवठा गंभीररीत्या कमी झाल्यामुळे ऊती मरतात.

निदान : सुरुवातीला डॉक्टर पायांच्या रक्‍तवाहिन्यांमधील स्पंदन तपासतील. जर त्यांना तुमच्या पायाची नाडी कमकुवत वाटत असेल, तर ते तुम्हाला पुढील चाचण्या करण्याचा सल्ला देतील. प्रभावित पायाची अल्ट्रासाऊंड डॉपलर ही प्रारंभिक स्क्रीनिंग चाचणी करून नंतर रक्‍त चाचण्या, संगणकीकृत टोमोग्राफी अँजिओग्राफी (उढ-) अँजिओग्राफी, अल्ट्रासाऊंड किंवा अगदी एंकल-ब्रेकियल इंडेक्स (अइख) चाचणीने या स्थितीचे निदान केले जाते.

उपचार : वैद्यकीय व्यवस्थापन, अँजिओप्लास्टी, एथेरेक्टॉमी किंवा पेरिफेरल आर्टरी बायपास शस्त्रक्रिया यासारखे विविध प्रकारचे पर्याय आहेत ज्यांचा सल्ला डॉक्टर तुम्हाला देऊ शकतात. रक्‍तवहिन्यांसंबंधी रोग टाळण्यासाठी धूम्रपान सोडणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. सॅच्युरेटेड फॅटस्चे प्रमाण कमी असलेले पदार्थ खाणे आणि तुमचा रक्‍तदाब, रक्‍तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी औषधांच्या मदतीने नियंत्रित करणे आवश्यक ठरते. दररोज व्यायाम आणि योग्य वजन राखणे आवश्यक आहे.

– डॉ. बिपीनचंद्र भामरे

Back to top button