World Breastfeeding Week: 'स्तनपान' एक वरदान | पुढारी

World Breastfeeding Week: 'स्तनपान' एक वरदान

आईचे दूध अर्थात ‘स्तनपान’ हा बाळासाठी निसर्गदत्त असा आदर्श आहार आहे. आईने बाळाला दिलेली सर्वोत्कृष्ट व अनमोल अशी भेट आहे. जगातील परमोच्च आनंदापैकी एक म्हणजे ‘मातृत्वाचा’ आनंद. त्याचा यथार्थ अनुभव घेता येतो तो बाळाला स्तनपान दिल्याने. या आनंदाला कोणतीच तोड असू शकत नाही. जगाच्या पाठीवर चार हजारांहून अधिक सस्तन प्राण्यांच्या जाती आढळतात व त्यांच्यापासून मिळणार्‍या दुधातही तितकीच विविधता दिसते. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचेे डॉ. रूथ लॉरेन्स म्हणतात, ‘प्रत्येक प्रजातींमधील विविधता लक्षात घेता, गायीचे अथवा म्हशीचे दूध हे त्यांच्या पिलांसाठी परिपूर्ण असते. मात्र, मनुष्य प्रजातीसाठी ते संयुक्‍तिक नाही. कारण त्यामध्ये आढळणार्‍या प्रथिनांचं, शर्करेचं, स्निग्धतेचं अन् संप्रेरकांचं प्रमाण अतिशय भिन्‍न आहे.’ मात्र ‘स्तनपान’ करण्याचे कमी प्रमाण ही जागतिक पातळीवर एक अतिशय चिंतेची बाब आहे.

भारतामध्ये स्तनपानाचा दर केवळ 56 टक्के इतका आहे व महाराष्ट्रात तो 52 टक्के इतका कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर लॅन्सेट या सुप्रसिद्ध आरोग्य माहितीपत्रकात भारताला स्तनपानाचा दर वाढविण्याचे फायदे व शिफारस नमूद केलेली आहे. स्तनपानामुळे पाच वर्षांखालील बालकांमधील मृत्यूचे प्रमाण 13 टक्क्यांनी कमी होऊ शकते. इतकेच नव्हे तर बालकाचा बुद्ध्यांक वाढतो. स्तनाच्या कर्करोगाला आळा घालता येऊ शकतो. जागतिक अहवालानुसार, स्तनपानामुळे बालकात आढळणार्‍या स्थूलतेचा (26 टक्के) व मधुमेहाचा धोका (35 टक्के) कमी होण्यास मदत होते.

बाळाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्षे म्हणजे खर्‍या अर्थाने ‘सुवर्णकाळ’ म्हणावा लागेल. कारण याच काळामध्ये मेंदूचा अधिकतम विकास व पोषण होते तसेच, कुपोषण व तद्जन्य व्याधींना थोपविता येणे शक्य असते. या पार्श्‍वभूमीवर अनेक सामाजिक संघटना स्तनपानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला स्तनपानाचे महत्त्व कळावे यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यातूनच ‘जागतिक स्तनपान सप्‍ताह’ या संकल्पनेचा उदय झाला. दरवर्षी काही तरी नवीन विचार या संकल्पनेत जोडला जातो. यंदाच्या वर्षी “Step up for breastfeeding Educate and support.” ही संकल्पना घेऊन 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्‍ताह जगभर साजरा केला जातो आहे.

स्तनपानाचे फायदे ः

बालकाला मिळणारे लाभ मातेचे दूध हे पचण्यास हलके व बालकाच्या सर्वांगीण विकासाला परिपूर्ण असते. स्तनपानामुळे माता व बालकामधील बंध अधिक द‍ृढ होण्यास मदत होते.

सुरुवातीच्या काळातील पिवळे – चिकट व जाडसर दूध म्हणजेच ‘कोलोस्ट्रम’ होय. यामुळे बालकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. एलर्जी, आंतड्याची संक्रमणे (अतिसार – जुलाब), कानाची संक्रमणे, श्‍वसनमार्गाची संक्रमणे इत्यादीचे प्रमाण कमी होते.
स्तनपानाच्या क्रियेमध्ये दूध हे मातेच्या स्तनांमधून सरळ बालकाच्या मुखात जात असल्याने बॉटल फिडिंगप्रमाणे जंतुसंसर्गाचा धोका स्तनपानामध्ये नसतो. स्तनपान हे बुद्ध्यांक वाढीसाठी व मेंदूच्या विकासासाठी उत्कृष्ट असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मातेचे दूध हे सहज व विनामूल्य उपलब्ध असल्याने आर्थिक ताण पडत नाही. केवळ बालकालाच नव्हे तर, मातेलाही स्तनपानामुळे अनेक लाभ मिळतात.

मातेला होणारे फायदे – गर्भावस्थेत अतिरिक्‍त जमा झालेल्या कॅलरीज वापरल्या जातात व स्तनपानामुळे मातेचे गर्भावस्थेतील वाढलेले वजन घटण्यासाठी मदत होते. बाळाला अंगावर पाजल्याने स्तनाचा कर्करोग, अस्थिसुशिरता व स्तनामध्ये गाठी होण्याचा धोका कमी होतो. बाळंतपणानंतर होणारा रक्‍तस्राव कमी होण्यास मदत होते. गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते.
मातेला मानसिक, शारीरिक समाधान मिळाल्याने प्रसूतीनंतरचे नैराश्य येण्याचा धोका कमी होतो.

स्तनपान देण्याची योग्य पद्धत – ‘यशस्वी स्तनपानाची गुरुकिल्ली म्हणजे योग्य पकड, योग्य पद्धती व त्याबद्दलचा आत्मविश्‍वास होय.’ त्याच बरोबर ‘शुभस्य शीघ्रम’ अर्थात जितक्या लवकर तितके अधिक उत्तम.

योग्य पकड – बाळाचे पोट व मातेचे पोट एकमेकांना संलग्‍न असावे. बालकाने पूर्ण तोंड उघडले पाहिजे (मोठा ‘आ’ करणे). केवळ स्तनाग्रे न ओढता पुढचा काळा भाग बाळास ओढण्यास देणे. (काळा भाग जास्तीत जास्त बाळाच्या मुखात द्यावा.) बाळाचे डोके त्याला हवे तसे ते जुळवून घेते त्यामुळे, केवळ मानेला आधार द्यावा व डोके सैल ठेवावे.

स्तनपान देण्याची पद्धत ः

1. पाळण्यासारखे धरणे – सामान्य पद्धती.

2. फुटबॉलसारखे धरणे- जुळे अथवा मोठे स्तन असताना असे पाजणे सोयीचे.

3. एका कुशीवर झोपून पाजणे. – सिझेरियननंतर या पद्धतीचा त्वरित अवलंब करता येतो.

स्तनपानाविषयी काही ठळक बाबी – प्रसूतीनंतर दोन तासांच्या आत स्तनपानास सुरुवात केल्याने स्तनपानाचे प्रमाण वाढते म्हणूनच त्याला “Golden hour’ म्हणतात. सतत म्हणजेच 2-3 तासांच्या अंतराने स्तन रिकामे झाल्याने दुधाचे प्रमाण लक्षणीय असे वाढते. शिल्लक दूध पुन्हा बाळास गरजेनुसार देता येते.

आहार : स्तनपानाच्या कालावधीत मातेने सकस आहार, योग्य प्रमाणात पाणी (2-3 लिटर /24 तासांत) व सकारात्मक द‍ृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे मातेवरील अनावश्यक ताण कमी होतो व त्यामुळे दूध वाढण्यास मदत होते. स्तनपानाविषयीच्या समस्या वेळीच जाणून घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मातेचे दूध काढण्याच्या व साठविण्याच्या योग्य पद्धती जाणून घेणेही गरजेचे आहे.

– डॉ. स्नेहल विजय माळी

Back to top button