चिकुनगुनिया व होमिओपॅथिक उपचार | पुढारी

चिकुनगुनिया व होमिओपॅथिक उपचार

डॉ. सौ. सपना गांधी

चिकुनगुनिया मागील वर्षापासून महाराष्ट्रात चांगलाच फोफावला आहे. सध्या चिकुनगुनियासद़ृश लक्षणे असलेले रुग्ण आढळत आहेत. चिकुनगुनिया एडीस इजिप्ती या डासाची मादी चावल्यामुळे होतो. प्रथम हा आजार टांझानियामध्ये आढळला. चिकुनगुनियामुळे सांधेदुखी व पाठदुखीने रुग्ण बेजार होतो व हातपाय गोळा करून झोपतो. म्हणून त्या भाषेत त्या झोपण्याच्या पद्धतीला ‘चिकुनगुनिया’ म्हणतात. म्हणून या आजाराचे नाव चिकुनगुनिया असे पडले आहे.

2006 मध्ये चिकुनगुनियाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला. याला बोन ब्रेकर व हाडे दुखणारा ताप असेही म्हणतात. एडीस इजिप्तीच्या पोट व पाठीवर पांढरे चट्टे असतात, त्यामुळे त्याला ‘टायगर डास’ म्हणतात. एडीस इजिप्तीची नर डास माणसांना चावत नाहीत; पण मादी डास मात्र लोकांना चावतात. ही मादी कमी उजेडाच्या व निवांत खोलीमध्येच आढळते, शिवाय पाण्याच्या साठ्यावरही अंडी घालते.

चिकुनगुनियाची लक्षणे – एकाएकी ताप व थंडी वाजणे, हात, पाय, डोके दुखणे, सांधे फारच दुखतात, कंबर दुखणे, काही लोकांमध्ये अंगावर पुरळ येणे, लिम्फ नाडे सुजणे, अतिशय थकवा येऊन अशक्तपणा येणे, 2-3 दिवस ताप येऊन पुन्हा 6-8 दिवस आराम वाटतो व पुन्हा ताप व सांधेदुखी चालू होते. याचा कालावधी साधारण 8 दिवस, 3 महिने ते 6 महिनेही राहू शकतो. हा कालावधी त्या रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवर अवलंबून आहे.

उपाय – उपचारापूर्वी प्रतिबंध करणे केव्हाही योग्यच. म्हणजेच एडीस इजिप्ती डासाच्या उत्पत्तीवर आळा घालणे, योग्य ती औषध फवारणी करणे, घरात अगरबत्ती, कॉईल लावणे, दारे-खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी लावणे, पिण्याचे पाणी झाकून ठेवणे, इतरत्र साठवलेले पाणी वेळोवेळी काढून टाकणे, साधारण पूर्ण अंग झाकलेले कपडे, फुल बाही व पायघोळ कपड्यांचा वापर करावा इत्यादी जर आपण कटाक्षाने पाळले तर चिकुनगुनियाचा प्रसार थांबण्यास वेळ लागणार नाही.

होमिओपॅथिक उपचार – वर सांगितल्याप्रमाणे रुग्णाला थंडी, ताप, सांधेदुखी, सांधे आखडल्यासारखी लक्षणे, अशक्तपणा, थकल्यासारखे जाणवले तर तज्ज्ञ डॉक्टर प्रत्येक पेशंटचा वेगवेगळ्या शारीरिक व इतर अनेक लक्षणे व त्यातील भिन्नता यांचे सूक्ष्म अभ्यास करून प्रत्येकास त्याचे त्याचे प्रमाणे औषधे द्यावी लागतात. ही औषधे विनासाईड इफेक्ट असतात. शिवाय चवीला गोडही असल्याने आबालवृद्ध सर्वांनाच यांचा चांगलाच फायदा होतो.

जर जास्त प्रमाणात अशक्तपणा असेल तर (ORS) ओरल रिहायड्रेशन सॉफ्ट किंवा (IVF) इन्ट्राव्हेनस फ्लूईड देण्याचीही गरज होमिओपॅथिक औषधांबरोबर असते. खालील काही होमिओपॅथिक औषधे आहेत की जी एखाद्या होमिओपॅधिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. (Rhustox) रक्सटॉक्स, (Bryonia) ब्रायोनिया, (Apis Mel) एपीस मेल, (Rododendron) रोडोडेन्ड्रान, (Ferrom Phos) फेरम फॉस, (Alfa Alfa) अल्फाअल्फा, (Hypericum) हायपेरीकम, (Belladona) बेलाडोना, (Cal.Phos) कलकेरिया फॉस इ. अनेक औषधे आहेत.

Back to top button