मानवी शरीरासाठी पोटॅशिअम का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या अधिक | पुढारी

मानवी शरीरासाठी पोटॅशिअम का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या अधिक

इलेक्ट्रोलाईटस् म्हणजे ते अगदी सूक्ष्म इलेक्ट्रिकल चार्ज वाहून नेतात. पोटॅशिअम हे पेशींमध्ये आढळणारे प्राथमिक धनभारयुक्त अणू आहेत. रक्तामधील द्रवामध्ये (सिरम) प्रत्येक 100 मिलिलिटरमध्ये 4 ते 5 मिलिग्रॅम पोटॅशिअम असते. सामान्यपणे रक्तातील एकूण पोटॅशिअमची पातळी 420 मिलिग्रॅम असेल तर ती सर्वसामान्यपणे चांगली मानली जाते.

मॅग्नेशिअम हे पेशींमधील पोटॅशिअम नियमित राखण्यास मदत करते; पण सोडियम आणि पोटॅशिअम या घटकांमुळे कॅल्शिअम आणि फॉस्फरस संतुलित राखले जाते. संशोधनानुसार असे आढळले आहे की, कमी पोटॅशिअम असणार्‍या आणि अधिक सोडियम असणार्‍या पदार्थांचा आहारात अधिक समावेश केला तर रक्तदाबाची समस्या निर्माण होते. त्यामुळे डॉक्टर कमी मीठ खाण्याचा सल्ला देतात; पण या सर्व क्षारांची पातळी संतुलित राखायची असेल तर नैसर्गिक पद्धतीने राखणे आवश्यक ठरते. त्यासाठी पोटॅशिअमयुक्त अन्नपदार्थ, फळे, भाजीपाला खावे.

पोटॅशिअम हे लहान आतड्यांमध्ये चांगल्या प्रकारे शोषले जाते. ते एक सर्वांत जास्त विरघळणारे क्षार आहेत. त्यामुळे अन्न शिजवताना ते वेगाने नष्ट होते. शरीरातील बरेचसे पोटॅशिअम हे मूत्रावाटे बाहेर टाकले जाते, तर काही प्रमाणात घामावाटे बाहेर टाकले जाते. ज्यावेळी आपल्याला खूप थकल्यासारखे वाटत असेल तेव्हा संत्र्याचा किंवा भाज्यांचा रस पुरेशा प्रमाणात घ्यावा. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशिअम असते.

अल्कोहोल, कॉफी, साखर आणि ड्युरेटिक औषधे यामुळे पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात शरीरातून बाहेर टाकले जाते आणि त्यामुळे रक्तातील पोटॅशिअम कमी होते. पोटॅशिअमचे क्षार उलट्या आणि डायरियामध्येसुद्धा कमी होतात. मानवी शरीरासाठी पोटॅशिअम खूप महत्त्वाचे आहे. ते शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखते. तसेच रक्तातील आणि उतींमधील

आम्लाचे प्रमाण संतुलित राखते. चयापचयाच्या प्रक्रियेतही पोटॅशिअम खूप महत्त्वाची भूमिका बजावते. स्नायूंच्या नैसर्गिक वाढीसाठी आणि मजबुतीसाठी देखील ते गरजेचे असते. सोडियम शरीरात साठवले जात असले तरी पोटॅशिअम साठवले जात नाही, म्हणूनच ते नियमितपणे आहारात समाविष्ट करणे गरजेचे असते.

हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, काही वेळेला लहान बाळांच्या अ‍ॅलर्जिक स्थितीमध्ये डायरियानंतर पोटॅशिअमयुक्त आहार घेणे फार गरजेचे असते.

डॉ. मनोज कुंभार

Back to top button