आराम आणि मनारोग्य | पुढारी

आराम आणि मनारोग्य

डॉ. मनोज शिंगाडे

मानसशास्त्रज्ञांच्या मते आराम हराम नाही तर ती एक सामाजिक गरज आहे. खूप अभ्यासानंतर ते या निष्कर्षापर्यंत आले की, व्यक्तीला ऊर्जा मिळण्यासाठी आरामाची आवश्यकता निर्विवादपणाने आहे.

सतत कार्यशील राहा, असा संदेश आपण ऐकत मोठे झालो. पण, आज भोवताली प्रत्येक जण इतका व्यग्र असतो की, त्याला खाण्यापिण्यासाठी आणि झोपण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अमेरिकेत झालेल्या अभ्यासानुसार 25 वर्षांपूर्वीच्या तुलनेत पाच टक्के अधिक सूचना प्रत्येक व्यक्ती रोज ऐकते तर प्रत्येक व्यक्ती सुमारे एक लाख शब्द प्रतिदिन ग्रहण करते. त्यामुळेच व्यक्तीच्या आयुष्यात इतर कोणत्याही गोष्टींसाठी जागाच शिल्लक राहात नाही.

आपण सतत व्यग्र असल्याने कामाचा ताण असल्याने सतत एकाग्रता आवश्यक असते. मेंदूचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. काही अभ्यासकांच्या संशोधनानुसार माणसाचा मेंदू काही काळाने विचलित होतोच ही मानवी मेंदूची खासियत आहे. माणूस आणि मशीन यांच्यातील हा मूलभूत फरक आहेच, पण त्यामुळे कामात संपूर्ण लक्ष न दिल्याने काही चुका होतात, मात्र त्याचा फायदाही होऊ शकतो.

मेंदू विचलित झाला की तो आपसूकच विचलित होणे आणि एकाग्रता यांच्या दरम्यान अनेक प्रकारे संतुलन करतो आणि रचनात्मकता निर्माण होते. मात्र, सतत व्यग्र राहणार्‍या व्यक्ती सतत एकाच मार्गाने चालत राहतात आणि नवीन रस्ते शोधू शकत नाही. व्यग्रतेमुळे रचनात्मकतेवर प्रभाव पडतो असे नाही तर काही नवे करण्याची इच्छाशक्तीही कमी होते. न्यूटनपासून आईन्स्टाईनपर्यंतच्या अनेक शास्त्रज्ञांची उदाहरणे विचारात घेता त्यांनी गुंतागुंतीच्या सिद्धांतांची संकल्पना विश्रामाच्या काळातच मांडल्या आहेत.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, व्यग्रता आणि काम यांच्यामध्ये संतुलन राखणे हीच चांगली पद्धत आहे. अर्थात, धकाधकीच्या आजच्या आयुष्यात हे सोपे नाही. हल्ली आपण ज्याला आराम म्हणतो तो वेळ खरोखरच आरामाचा असतोच असे नाही. कारण, अगदी गादीवर आडवे पडलो असलो तरीही मेसेज, चॅटिंग किंवा ई-मेल हे सुरू असते. आपल्या हातून काही महत्त्वाचे निसटून जाऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. या अवस्थेतून वाचण्यासाठीही अनेक उपाय आहेत. उदाहरणार्थ बाहेर फिरायला जाताना फोन घरीच ठेवून जा. खेळण्यासाठी आणि आनंदी क्षण मिळवण्यासाठी थोडा जास्त वेळ काढा. स्वतःसाठी वेळ काढाल तेव्हा काम, त्यातील व्यग्रता आणि त्याचा ताण हे सर्व विसरून आनंद लुटा.

 

Back to top button