फुफ्फुसांना त्रासदायक ठरणारा सीओपीडी आजार | पुढारी

फुफ्फुसांना त्रासदायक ठरणारा सीओपीडी आजार

सर्दी, खोकला ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. मात्र, एका मर्यादेपर्यंत जर ही लक्षणे असतील तर घाबरण्यासारखे फारसे काही नसते. मात्र, दोन महिन्यांपर्यंत खोकला पिच्छा सोडत नसेल, दरवर्षी थंडी सुरू होताच खोकला जोर पकडत असेल तर सावध होणे गरजेचे आहे. अशा वेळी डॉक्टरांशी भेटून नेमके निदान करून घेणे गरजेचे ठरते. कारण, हा आजार सीओपीडी अर्थात ‘क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज’देखील असू शकतो.

फुफ्फुसे संपूर्ण शरीरात शुद्ध ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात. मात्र, ऑक्सिजनऐवजी त्यांना धूर, धूळ, प्रदूषण या वातावरणात काम करावे लागले तर त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो आणि त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. परिणामी अनेक प्रकारचे आजारही उत्पन्न होऊ लागतात.

क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज या आजाराला सामान्य भाषेत क्रॉनिक ब्राँकायटीस असेही म्हणतात. हा एक फुफ्फुसांचा आजार असतो. या आजाराचा थेट संबंध शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह घटण्याशी असतो. शरीरात ऑक्सिजन पोहोचविणार्‍या छोट्या-छोट्या वायू तंत्रामध्ये काही तरी गडबड होते आणि श्वास घेणे अवघड होऊ लागते.

लक्षणे : सीओपीडी या आजाराचे प्राथमिक लक्षण ओळखणे सोपे असते. दोन महिन्यांपर्यंत सतत कफ असणारा खोकला येत असेल आणि हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून होत असेल तर अशा स्थितीत डॉक्टरांशी त्वरित संपर्क करावा. खोकल्याची सामान्य औषधे यासाठी परिणामकारक ठरत नाहीत. तपासणीनंतरच योग्य ते औषध घ्यावे लागते. सीओपीडीची लक्षणे 35 वर्षांनंतरच दिसू लागतात.

तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, सीओपीडीचे 100 पैकी 80 रुग्ण धूम्रपान करणारे असतात. सिगारेट, विडी किंवा गांज्या यापैकी कुठल्याही प्रकारचा धूर शरीरात घेतल्यामुळे आपल्या फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होत असतो. तसेच आपल्या देशातील 60 टक्के जनता खेड्यांत राहाते. अनेक ठिकाणी अजूनही गॅस सिलिंडर उपलब्ध नाही. ग्रामीण भागात बायोमास फ्यूएल हे देखील सीओपीडीचे एक मोठे कारण आहे. तसेच विडी ओढणे हे देखील एक कारण आहे. सगळ्यात जास्त धोका सिगारेटपासूनच असतो.

पल्मनरी फंक्शन टेस्टद्वारे फुफ्फुसांचे किती नुकसान झाले आहे हे समजू शकते. त्यानंतर आपला बचाव करणे रुग्णांच्या हातात असते. त्यानंतरही तो धूम्रपान करीत राहिला तर फुफ्फुसे कमकुवत होतात. त्यामुळे या आजाराबाबत निदान होताच त्वरित धूम्रपान करणे बंद करावे. तंबाखूसारख्या पदार्थांपासून सुटका करण्यासाठी टोबॅको रिसेशन क्लिनिक्सच्या मदतीने उपाय करावेत. डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी.

फुफ्फुसे आरोग्यसंपन्न ठेवावीत. यासाठी सुरुवातीपासूनच धूम्रपान न करणे फायद्याचे ठरते. धूळ, धूर, प्रदूषण असणार्‍या ठिकाणी राहू नये. रोज व्यायाम करावा. सीओपीडी हा आजार होतातच वजन त्वरित कमी करावे. स्थूलपणाची समस्या असल्यास अशा व्यक्तींना ऑब्सस्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनिया सिंड्रोम होतो. यामुळे श्वसन नलिकेद्वारे अडथळा निर्माण होतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा शरीरात कमी होतो. अशा स्थितीत सीओपीडी झाल्यानंतर रुग्णाचा त्रास वाढतो.

डॉ. महेश बरामदे

Back to top button