असेही काही त्वचारोग | पुढारी

असेही काही त्वचारोग

आपल्यापैकी अनेकांना त्वचेसंबंधी काही समस्या असतात. यातील काही समस्या सर्वसामान्य असतात, तर काही त्वचारोग हे दुर्मीळ असतात आणि बहुतेकवेळा ते बरे होत नाहीत. अशाच काही दुर्मीळ त्वचारोगांबाबत जाणून घेऊया. काही त्वचेच्या समस्या आणि त्यांची लक्षणे बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत समान असतात आणि त्या समस्यांबाबतचा व्यक्तींचा अनुभवदेखील बरेचदा समान असतो. या आजारांमध्ये मुरमे, एक्झिमा, सोरायसीस आणि इतर काही सामान्यपणे ओळखले जाणारे त्वचारोग समाविष्ट होतात. परंतु या व्यतिरिक्त असे काही त्वचारोग आहेत, जे क्वचित आढळतात आणि त्यामुळे ते बहुतेकांना ठाऊक नसतात. तसेच हे त्वचारोग बरेचदा पूर्णपणे बरेदेखील होत नाहीत.

1) ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ः हा आजार झालेला पहिला माणूस सर्वप्रथम इंडोनेशियामध्ये आढळून आला. या दुर्मीळ त्वचारोगामध्ये माणसाच्या शरीरावर खूप मोठ्या आकाराचे मस येतात. एका इंडोनेशियन मासेमारी करणार्‍या कोळ्याच्या किशोर अवस्थेत असताना शरीरावर मस येत असल्याचे आढळले. नंतर ते वाढत गेले आणि संपूर्ण शरीर त्यामुळे झाकले गेले. त्याच्या या विचित्र आजारामुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांना निधी जमा करणे शक्य झाले. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून जवळपास 13 पौंडाचे मस काढले.

2) हायपर ट्रायकोसीस ः या रोगामध्ये त्वचेच्या कुठल्याही भागात विपुल प्रमाणात केस येतात. अशा प्रकारची केसांची वाढ शरीराच्या दुसर्‍या भागात दिसून येत नाही. काही वेळा केसांची ही वाढ संपूर्ण शरीरभर होते, तर काही वेळा ठराविक भागातच होते. संबंधित व्यक्तीला हा आजार जन्मापासून असल्याचे दिसते. तर काही वेळा आयुष्याच्या विशिष्ट टप्प्यावर असा बदल दिसून येतो. काँगेनिटल हायपरट्रायकोसीस हा आजार दुर्मीळ असून आतापर्यंत हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या व्यक्तींना हा आजार झाल्याचे आढळून आले आहे. या आजारावर लेझर उपचार आणि काही पर्यायी औषधे व्यर्थ ठरल्याचे दिसून आले आहे.

3) मॉर्गेलॉन्स डिसीज ः हा अतिशय विचित्र त्वचारोग आहे. यामध्ये त्वचेवर काही तरी रांगल्यासारखी आणि खाजल्यासारखी जाणीव होते. फोड येऊन उघड्या जखमा होतात, अतिशय थकवा येतो, स्मरणशक्ती कमी होते, दृष्टिदोष निर्माण होतो, वागणुकीतही बदल होतो. ज्या व्यक्तीला हा आजार होतो त्याच्या जखमांमधून निळ्या, पांढर्‍या रंगाचे दोर्‍यासारखे तंतू बाहेर येतात. हा आजार कशामुळे होतो याबाबत काही ठोस कारणे आढळलेली नाहीत. म्हणूनच अजूनही यावर कुठलाही खात्रीशीर उपाय आढळून येत नाही.

4) तुंगीयासीस ः दक्षिण आणि मध्य अमेरिकेत, कॅरिबियन, आफ्रिका आणि भारत या भागात हा आजार अढळतो. यामध्ये सूक्ष्म कीटक त्वचेवर हल्ला करतात आणि त्वचा पोखरून आत जातात तेथे अंडी घालतात आणि वाढतात. 1980 च्या दरम्यान त्रिनीदाद, टोबॅगो, नायझेरिया या भागातील जवळपास 40 टक्के मुलांना हा आजार झाल्याचे आढळले होते.

5) डर्मेटोग्राफिया ः ही अतिशय दुर्मीळ स्थिती असून, अतिशय संवेदनशील त्वचेसंदर्भात आढळून येते. हा प्रकार जी त्वचा कुठल्याही लहान ओरखड्याला किंवा छोट्याशा जखमेलासुद्धा तीव्र प्रमाणात प्रतिसाद देते, त्या त्वचेमध्ये हा आजार आढळून येतो. व्यक्तीच्या इम्युन सिस्टीमद्वारे हिस्टेमाईन मोठ्या प्रमाणात स्रवते आणि त्यामुळेच अतिसंवेदनशीलता निर्माण होते. हिस्टेमाईनमुळे त्वचेच्या सूक्ष्म नसा विस्तारतात, त्यामुळे त्वचा लाल आणि वर आल्यासारखी दिसते. तुम्हाला जर त्वचेवर अगदी थोडे जरी वेगळेपण जाणवले, खाज येत आहे असे जाणवले तर ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे. वेळीच उपचार करणे केव्हाही फायद्याचे ठरणारे असते.

Back to top button