पुन्हा स्वाईन फ्लू ? | पुढारी

पुन्हा स्वाईन फ्लू ?

पुन्हा स्वाईन फ्लू ? – डॉ. अनिल मडके

तीन चार दिवसांपूर्वीचीच गोष्ट. एक फोन आला, आमचा पेशंट येथे एका रुग्णालयात अ‍ॅडमिट आहे. त्याला न्यूमोनिया आहे. ऑक्सिजन कमी झाला आहे. व्हेंटिलेटरवर आहे आणि त्याला आम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहोत. त्याला घेऊन येऊ का?फोनवर बोलणार्‍या गृहस्थानी पेशंटचं वय सांगितलं. सुरुवातीला पेशंटला सर्दी, खोकला आणि कणकण होती; पण त्याने सात-आठ दिवस अंगावर कसं काढलं हे सांगितलं. नंतर धाप वाढली तेव्हा हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि ते म्हणाले की, रिपोर्ट तुम्हाला व्हॉटस् अ‍ॅपवर पाठवतो बघा आणि सांगा.त्यावर मी त्यांना विचारले, पेशंट कुठे परगावी गेला होता का? आणि त्यांना कोव्हिड आहे का किंवा झाला होता का?त्यावर ते म्हणाले, कोव्हिड नाही; पण स्वाईन फ्लू आहे.

स्वाईन फ्लूचा रुग्ण आहे, म्हटल्यावर सावध झालो आणि फोनवर रुग्णाची सविस्तर माहिती घेतली. व्हॉटस् अ‍ॅप आलेले रिपोर्ट पाहिले.
पेशंटचा न्यूमोनिया अगदी पुढच्या टप्प्यात होता. अशा स्थितीत रुग्ण हलवणे शक्य नव्हते, हे मी त्या गृहस्थांना सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी त्या रुग्णाला इतरत्र/सरकारी रुग्णालयात हलविले आणि दुर्दैवाने त्या रुग्णाचा मृत्यू झाला.हा रुग्ण एका खेडेगावातील. हा रुग्ण कुठेही प्रवासाला गेला नव्हता, अशी माहिती मिळाली. स्वाईन फ्लूची चाचणी तर पॉझिटिव्ह आलेली होती. याचा अर्थ असा की, आपल्या आजूबाजूला स्वाईन फ्लूचा विषाणू आहे. स्वाईन फ्लूचा रुग्ण आपल्याकडे सापडला म्हणून, घाबरून जाण्याचे कारण नाही; पण त्याचवेळी आपण जागरूक राहणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

स्वाईन फ्लू हा एक प्रकारचा फ्लू म्हणजे इन्फ्लुएंझा होय. तो ‘एच वन एन वन’ या प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. युरोपमध्ये 2009-10 मध्ये स्वाईन फ्लूची साथ आली. ती ‘जागतिक साथ’ म्हणून घोषित केली. आपल्याकडे पुणे हे स्वाईन फ्लूचे आधी केंद्रस्थान बनले आणि मग ती साथ महाराष्ट्रभर पसरली. स्वाईन म्हणजे डुक्‍कर. डुक्‍करांमध्ये आढळणार्‍या विषाणूंमुळे हा आजार होत असला तरीसुद्धा, तो एका माणसातून दुसर्‍या माणसाकडे संक्रमित होऊ शकतो. स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णाच्या नाकातील आणि घशातीलस्राव तसेच शिंकण्यातून किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे तुषार आणि थुंकी यातून विषाणूंचा प्रसार होतो.

स्वाईन फ्लूच्या बाबतीत महत्त्वाचा संक्रमण प्रकार म्हणजे फोमाईटस्. जेव्हा एखादी व्यक्‍ती शिंकते-खोकते किंवा मोठ्याने बोलते, तेव्हा तिच्या नाकातोंडातून उडणारे तुषार ती व्यक्‍ती हाताळत असलेल्या वस्तूंवर पडतात किंवा त्या व्यक्‍तीच्या समोर असलेल्या वस्तूंवर पडतात. उदाहरणार्थ मोबाईल, पुस्तक, वही, पेन, एखादे भांडे, दरवाजाचा हँडल इ. अशी वस्तू जर दुसर्‍या व्यक्‍तीने हाताळली तर, या वस्तूंवर पडलेले कण त्या दुसर्‍या व्यक्‍तीच्या हातावर येतात. हे कण म्हणजे फोमाईटस् ज्यात विषाणू असतात. अशा ठिकाणी स्पर्श केलेला हात जेव्हा ही व्यक्‍ती आपल्या नाकाजवळ, तोंडाजवळ किंवा डोळ्यांशी नेते तेव्हा, विषाणू संसर्गाचा धोका असतो. दोन डोळे, नाक आणि तोंड या भागात हाताचा स्पर्श करू द्यायचा नाही, हे पथ्य पक्के लक्षात ठेवावे. संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर महत्त्वाचा. त्यामुळे नाकाला किंवा तोंडाला आपल्या हाताचा-बोटांचा प्रत्यक्ष स्पर्श होणार नाही. हात नाकाला न लागता मास्कला लागेल आणि आपले संरक्षण होईल. स्वाईन फ्लू असलेला रुग्ण जेव्हा खोकतो, शिंकतो किंवा मोठ्याने बोलतो तेव्हा, त्याच्या नाका-तोंडातून बाहेर पडणारे तुषार… समोर जर निकट व्यक्‍ती असेल तर त्याला बाधित करू शकते. सर्दी, पडसे, शिंका येणे, नाक गळणे, घसा दुखणे, बारीक कणकण येणे, ताप येणे, खोकला येणे, दम लागणे तसेच काही वेळा खोकल्यातून-थुंकीतून रक्‍त पडणे ही स्वाईन फ्लूची प्रमुख लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये उलटी, मळमळ आणि जुलाब अशी लक्षणेही आढळतात.

वर सांगितलेली लक्षणे आढळल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या लक्षणांमध्ये खोकला, धाप आणि रक्‍त पडणे ही लक्षणे धोक्याची सिग्‍नल्स आहेत, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे सर्दी-पडसे, शिंका, ताप ही लक्षणे तातडीने आटोक्यात येत नसतील, तर डॉक्टरांचा पुन्हा सल्ला घ्यावा. आपण कोव्हिड टाळण्यासाठी जी खबरदारी घेतो, तीच खबरदारी स्वाईन फ्लूचा प्रसार टाळण्यासाठी घ्यावी. स्वाईन असलेल्या रुग्णाजवळ जाताना मास्क लावून जावे. या रुग्णाच्या वस्तू हाताळताना काळजी घ्यावी. या वस्तू हाताळून आपला हात नाकाशी नेऊ नये. नेहमी स्वच्छ हात धुवावेत. खोकताना-शिंकताना तोंडाला रूमाल लावावा. कुठेही थुंकू नये. हस्तांदोलन टाळावे. भरपूर पाणी प्यावे. सकस आहार घ्यावा. नियमित व्यायाम करावा. पुरेशी झोप घ्यावी. कोरोनासुद्धा आजूबाजूला आहे, त्यामुळे त्याची त्रिसूत्री कटाक्षाने पाळावीच.

Back to top button