वेदना आणि प्राथमिक लक्षणे | पुढारी

वेदना आणि प्राथमिक लक्षणे

हाडे व सांधे हे आपल्या शरीरातील असे भाग आहेत, ज्यांना दुखापत झाल्यास त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामावर होतोच. या वेदना कधी कधी सौम्य असतात, तर कधी कधी तीव्र असतात. वेदनेच्या तीव्रतेप्रमाणे त्या त्यावेळी योग्य उपचार केल्यास या वेदना थांबतात, पण त्यासाठी त्यांच्या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर औषधोपचार करवून घ्यावेत.

काहीवेळा व्यायाम करताना, धावताना किंवा आपले आवडते खेळ खेळताना आपल्या शरीराच्या एखाद्या भागात व खासकरून सांध्याच्या भागात वेदना सुरू होतात. या वेदनांना तात्पुरते समजून आपण दुर्लक्ष करतो, पण नंतर त्यामधून एखादी गंभीर दुखापत होऊन अचानक तीव्र वेदना सुरू होतात. सांध्यांच्या वेदनांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते, त्यामुळे या वेदनांचे नेमके कारण आपल्याला उमगत नाही. सांध्यांशी संबंधित अशा काही वेदना व त्यांची कारणे याबद्दल माहिती घेऊ.

पाठदुखी

संबंधित बातम्या

एखादेवेळी वजन उचलण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्या पाठीच्या मानेखालच्या हाडामध्ये वेदना सुरू होतात. आपल्या उचलण्यामध्ये गती असेल तर त्यामुळे पाठीच्या कण्याला जोराचा हिसकाही बसू शकतो. त्यामुळे आपल्या ताकदीला अनुसरून वजन उचलावे. पाठदुखीची तीव्रता जास्त असेल व त्यामुळे श्‍वास घेण्यासही त्रास होत असेल, तर लगेच डॉक्टरांकडे जावे. कधी कधी पाठीच्या मानेखालील भागात वेदना होणे हृदयविकाराचा झटका येण्याचेही चिन्ह आहे.

खांदेदुखी

कधी कधी आपली अवजड बॅग वर ठेवताना खांदा सळकतो व वेदना सुरू होतात. खांद्याजवळच्या हाडामुळे मानेजवळील हाडावर दाब पडल्यामुळे या वेदना सुरू होतात. कधी कधी संधिवात व संधिदाह यांमुळेही वेदना होतात. अशावेळी बर्फ लावून किंवा विश्रांती घेऊन वेदना कमी करता येते. पण, जर वेदना तीव्र असेल किंवा खांदा त्याच्या खोबणीतून बाहेर येत असल्यासारखे वाटल्यास, खांद्याजवळ सूज आली असल्यास गंभीर दुखापत झाली आहे असे समजावे व डॉक्टरांकडे जावे.

गुडघेदुखी

कुणीतरी म्हटले आहे की, ‘आपल्या गुडघ्यांचे महत्त्व ते बाद झाल्यावरच कळते.’ बर्‍याच जणांच्या बाबतीत हे खरे ठरते. अचानक हिसका बसल्यास, उंच ठिकाणावर खूपवेळ चढल्यास वगैरे गुडघेदुखी उद्भवते. तज्ज्ञांच्या मते गुडघेदुखीची समस्या गंभीर होण्याचे प्रमाण तुरळक असते. गुडघ्यातील कूर्चा गुडघ्याच्या वाटीच्या खाली सरकल्यामुळे जिने चढणे-उतरणे इत्यादी प्रसंगी गुडघ्यात वेदना होतात. गुडघ्यावर ताण येईल असे व्यायाम अशावेळी करू नयेत. गुडघ्याला अंतर्गत दुखापत झाली असेल व दुखापत होताना आवाज आला असेल, तर थोड्या वेळाने गुडघ्यावर सूज येते. अशावेळी गुडघ्याचा एक्स-रे काढणे
महत्त्वाचे असते.

घोट्यातील वेदना

कधी कधी डान्स किंवा एअरोबिक्स क्लासमध्ये आपला पाय अचानक मुरगाळतो. तेव्हा आपण कसेतरी त्या वेदना सहन करून वेळ घालवतो. पण नंतर घोट्यामध्ये हलक्या किंवा तीव्र वेदना सुरू होतात. वेदना हलक्या असतील तर बर्फ लावून, शेक देऊन किंवा विश्रांती घेऊन या वेदना कमी करता येतात. पण जर त्यानेही वेदना कमी होत नसतील, तर कदाचित फ्रॅक्चर असू शकतो. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन एक्स्-रे काढून घ्यावा.

पायातील स्नायूबंधांना झालेली इजा

पायावर प्रचंड ताण आल्यामुळे किंवा खूप वजन पडून पाय फिरल्यामुळे पायातील स्नायुबंध दुखावले जातात. हे स्नायुबंध पोटरीचे स्नायू व टाच यांना जोडण्याचे काम करतात. दुखापत झाल्यामुळे त्या भागावर सूज आली असेल किंवा चालण्यास त्रास होत असेल तर शेक घेऊन किंवा विश्रांती घेऊन आराम मिळतो. अगदीच उभे राहण्यासही त्रास होत असेल तर स्नायुबंधांना गंभीर दुखापत झाली आहे, असे समजावे. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियाही करावी लागू शकते.

कटिप्रदेशातील वेदना

काहीवेळा काही भागांचे दुखणे हे काही दिवसांपर्यंत दुर्लक्षित करता येते. पण कटिप्रदेशातील किंवा नितंबातील हाडाच्या वेदनांच्या बाबतीत असे करून चालत नाही. नितंबाच्या वेदना तशाच सहन करीत हालचाल करीत राहिल्यास त्यामधून संधीदाहासारखा विकार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नितंबाच्या हाडाजवळ वेदना होत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे धाव घ्यावी.

कंबरदुखी

बराचवेळ एका जागी बसून काम करणार्‍या लोकांमध्ये कंबरदुखी असणे हे स्वाभाविक आहे. या वेदना हलक्या असतील तरी त्या तीव्र होतील असे व्यायाम करणे टाळावे. खासकरून उंच डोंगरावर चढणे, एअरोबिक्स असे व्यायामप्रकार टाळावेत. विश्रांती घेणे, बर्फ लावणे व हलकासा ताण देणारे व्यायाम करणे इत्यादी चालते, पण वेदना तीव्र असेल व त्याच्यासोबत कधी कधी बधिरता, अशक्‍तपणा इत्यादी त्रासही होत असतील तर आपल्याला ‘हर्निएटेड डिस्क’ हा विकार झालेला असण्याची दाट शक्यता आहे. सांधे व हाडे यांमधील वेदना त्यावेळी जरी तात्पुरती वाटत असली, तरी ती तशी असेलच असे नाही. त्यामुळे वर दिलेल्या लक्षणांपैकी कुठले लक्षण असेल, तर त्वरित उपचार करवून घ्यावा.

डॉ. संतोष काळे

Back to top button