डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी 'हे' व्यायाम करा | पुढारी

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी 'हे' व्यायाम करा

आपल्या डोळ्यांचे आरोग्य राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. हल्ली प्रत्येक जण कामानिमित्ताने संगणकासमोर तसेच अनेकजण बराच वेळ टीव्ही समोरही बसलेले असतात. या उपकरणांचा परिणाम आपल्या डोळ्यावर होत असतो. सतत कॉम्प्युटरसमोर बसल्याने डोळ्यातून पाणी येणे, डोळ्याची आग होणे, डोळे चुरचुरणे असे प्रकार होत असतात. त्याचबरोबर आपल्या द‍ृष्टीच्या दर्जावरही थेट परिणाम होत असतो. तुम्हाला जर चष्मा असेल तर सतत संगणकासमोर बसल्याने तुमच्या चष्म्याचा नंबर वाढू शकतो. तुम्ही शरीराच्या अन्य भागांचा जसा व्यायाम करता किंवा शरीराला विश्रांती देता त्याचप्रमाणे डोळ्याचे एक्सरसाईज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

अनेक वेळा संगणकासमोर बसल्याने संगणकातून बाहेर पडणारे किरण आपल्या द‍ृष्टिपटलावर पडतात. त्याचा परिणाम अर्थातच द‍ृष्टीवर होतो. आपल्याला धूसर, अंधूक दिसू लागते. एक्सरसाईजमुळे स्नायूंची ताकद वाढते आणि संगणक, टीव्हीमधून बाहेर पडणार्‍या किरणांचा दुष्परिणाम आपल्या द‍ृष्टीवर होत नाही. डोळ्यावर ताण पडल्याने आपल्याला खूप दमायला होते, थकायला होते. संगणकासमोर आठ आठ तास बसून काम केल्यानंतर असा थकवा येतो. मात्र, डोळ्यावर ताण पडल्याने हा थकवा आला आहे याची आपल्याला कल्पना नसते. अनेकदा आपल्या संगणकासमोर बसण्याच्या पद्धतीमुळे आपल्या डोळ्यांवर ताण येत असतो. म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरांकडून संगणकासमोर कसे बसावे, या विषयीचे मार्गदर्शन घ्या.

अनेकांना रात्री कॉटवर झोपून वाचण्याची किंवा मोबाईल पाहण्याची सवय असते. दिव्याच्या उजेडाचा त्रास बाकी मंडळींना होऊ नये म्हणून अनेकजण डिम लाईटमध्ये वाचतात. त्याचाही ताण आपल्या डोळ्यावर येतो. व्हिडीओ गेम खूप वेळ खेळल्यानेही डोळ्यावर मोठा ताण येतो. सध्याची तरुण मुले आपल्या स्मार्टफोनशी दिवसभर खेळत असतात. त्याचाही परिणाम डोळ्यांवर होतो. हा ताण घालवण्यासाठी, कमी करण्यासाठी डोळे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज पद्धतीने फिरवा. काम करताना दर अर्ध्या तासाने संगणकासमोरून उठून हा व्यायाम करा.

आपले डोळे घट्ट बंद करा आणि दोन्ही तळहातांनी डोळे झाकून घ्या. हातांचा दाब डोळ्यावर पडणार नाही याची काळजी घ्या. संगणकासमोरून उठा आणि एखाद्या वस्तूकडे, चित्राकडे स्थिर नजरेने अर्धा मिनीट बघा. त्यानंतर डोळ्यांची वेगाने उघडझाप करा. त्यानंतर परत एखाद्या वस्तूवर 15 सेकंद नजर स्थिर करा. पुन्हा अनेक वेळा डोळ्यांची वेगाने उघडझाप करा. असे काही व्यायाम केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

डॉ. मनोज कुंभार

Back to top button