वर्क फ्रॉम होम आणि डोळ्यांचे आरोग्य | पुढारी

वर्क फ्रॉम होम आणि डोळ्यांचे आरोग्य

डॉ. अश्‍विनी राऊत

कोव्हिडमुळे जवळपास सगळेच लोक वर्क फ्रॉम होम करत आहेत. ऑफिसमध्ये जेवढे काम करावे लागते त्यापेक्षा जास्त वेळ कॉम्प्युटरसमोर बसून घरून काम करावे लागत आहे. वर्क फ्रॉम होम कामामुळेच नव्हे, तर लॉकडाऊनमध्ये वेळ घालवण्यासाठी मोबाईल, टी.व्ही. यांच्या अतिरेकी वापरामुळे डोळ्यांवरचा ताण वाढतो आहे. या उपकरणामधून येणारी नीलकिरणे डोळ्यांवरील ताण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरतात. या किरणांमुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होतात.

या उपकरणाच्या अतिवापरामुळे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार होतो. यालाच डिजिटल आय स्ट्रेन असेही म्हणतात.

त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे

1) डोळे कोरडे होणे. 2) डोकेदुखी. 3) डोळे सतत खाजवणे. 4) डोळ्यांतून पाणी येणे. 5) अस्पष्ट दिसू लागणे.
डोळ्यांची उघडझाप होण्याचा वेळ कमी होतो. त्यामुळे डोळ्यांवर अतिशय ताण येतो. डोळ्यांची उघडझाप होण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावल्याने डोळ्यांच्या पेशींना योग्य आराम मिळत नाही. शिवाय, डोळ्यांतील अश्रूंमध्ये काही प्रमाणात प्रोटिन्स असतात, ज्यामुळे डोळ्यांचे पोषण होते. त्यासाठी डोळ्यांची उघडझाप होण्याची नैसर्गिक प्रक्रिया योग्य होणे गरजेचे आहे.

वातावरणाचा परिणाम

1) वाढते प्रदूषण. 2) अल्ट्राव्हायोलेट किरणे. 3) तापमानात होणारे बदल. 4) आहाराचा परिणाम. 5) स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल अतिप्रमाणात सेवन. 6) जंकफूडचा आहारात अतिवापर. 7) बैठी जीवनशैली

डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी घरगुती उपाय

1) डोळे दिवसातून तीन ते चारवेळा थंड पाण्याने धुवा.

2) डोळ्यांवर काकडीचे तुकडे, थंड पाण्यात कापूस बुडवून पाच ते दहा मिनिटे ठेवा.

3) चेहरा धुताना गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा.

4) रात्री झोपताना तळपायांना नारिकेल तेल लावून झोपा. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होऊन झोप तर चांगली लागेल; शिवाय पायांचे आरोग्यही चांगले राहील.

5) झोपण्यापूर्वी आणि सकाळी झोपेतून उठल्यावर हातांचे तळवे एकमेकांना घासून हात दोन्ही डोळ्यांवर हलकेच ठेवा.

6) व्यायाम, प्राणायाम, योगासने नित्य नियमाने करा.

7) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्‍त प्राण मुद्रा याचा अभ्यास रोज पाच मिनिटे करावा.

8) चिडचिड, राग अशा भावनांवर ताबा ठेवावा.

9) आहारात व्हिटॅमिन अ, सी युक्‍त आहार घ्यावा.

10) दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावे. 11) अंधारात मोबाईल, लॅपटॉपचा वापर करू नये.

12) बाहेर जाताना किंवा कडक उन्हात जाताना गॉगल्स किंवा चष्मा वापरावा.

13) डोळे चोळू नयेत.

14) प्रवासात वाचन, लिखाण करू नये.

15) दिवसभरात दर एक तासाने पाच ते दहा मिनिटे डोळे बंद करून बसावे.

16) तीक्ष्ण प्रकाशाकडे बघू नये.

Back to top button