आरोग्य : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत बळावतोय डिमेन्शिया! | पुढारी

आरोग्य : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत बळावतोय डिमेन्शिया!

डॉ. मनोज शिंगाडे

मोठ्या वयात होणारे काही आजार आता कमी वयातही दिसू लागले आहेत. डिमेन्शिया (मानसिक आजार) हा या आजारांपैकीच एक आहे. युवकांत आता डिमेन्शिया ची लक्षणे दिसू लागली आहेत. कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांत अशा प्रकारचा आजार बळावत चालला आहे.

डिमेन्शिया अर्थात विस्मरण हा सर्वसाधारणपणे वृद्धापकाळातील आजारपण मानले जाते. हा आजार वयाची साठी ओलांडल्यानंतर होऊ शकतो. परंतु, जीवनशैलीतील बदलामुळे या आजाराची लक्षणे कमी वयातही दिसत आहेत.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा परिणाम हा युवकांवर अधिक झाला आहे. यादरम्यान कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत डिमेन्शियाची लक्षणे दिसत आहेत. त्यांना एखादी गोष्ट आठवणे किंवा ओळखण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय मोबाईल आणि स्क्रीन टाईममुळेही स्मरणशक्‍तीवर वाईट परिणाम होत आहे. साहजिकच ही समस्या डिमेन्शिया बळावण्यास कारणीभूत ठरू शकते.

अनेक लक्षणांचा गट

सर्वसाधारणपणे डिमेन्शियाला विसरभोळेपणाच्या द‍ृष्टीने पाहिले जाते. हा एक केवळ डिमेन्शियाचा एक प्रकार आहे. आपला मेंदू हा केवळ लक्षात ठेवण्याचे काम करत नाही. डिमेन्शियाच्या आजारात एखाद्या व्यक्‍तीची दररोज काम करण्याची क्षमता, भाषा, विचारशक्‍ती, हिशेब ठेवणे यासारख्या गोष्टींवर परिणाम होतो. मेंदूत बीटा एमेलॉड नावाचा प्रोटिन जमा होत असल्याने हा आजार होतो. त्यामुळे न्यूरॉन्स नष्ट होऊ लागतात.

डिमेन्शियाचे प्रकार

डिमेन्शिया हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. पहिले म्हणजे व्हॅस्क्यूलर डिमेन्शिया. यात मेंदूपर्यंत रक्‍तपुरवठा करणार्‍या पेशींत अडथळेे निर्माण होतात. त्यामुळे मेंदूतील काही भागात ऑक्सिजन न पोहोचल्याने मृत होतो. यात स्मॉल स्ट्रोक असेही म्हणतो. या प्रकारचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. जी मंडळी धूम्रपान, मद्यपान करतात त्यांना उच्च रक्‍तदाब, मधुमेह, उच्च कॉलेस्ट्रॉलसंबंधीच्या तक्रारी असतात. दुसरे रूप म्हणजे संमिश्र डिमेन्शिया. यात रक्‍तप्रवाहात अडथळे येण्याबरोबरच मेंदूत प्रोटिन जमा होऊ लागते. परिणामी, मेंदूतील क्रियेत बिघाड होऊ लागतो. संमिश्र डिमेन्शियाची लक्षणे मात्र लगेच दिसतात. कारण मेंदूवर हा एकापेक्षा अधिक प्रकारच्या समस्येचा परिणाम होऊ लागतो.

कारणे कोणती?

डिमेन्शिया साठी अनुवंशिकता घटक देखील कारणीभूत आहे. याशिवाय डोक्याला मार लागणे, स्ट्रोक, मेंदूत ट्यूमर, एचआयव्हीची बाधा, मद्यपान, नैराश्य आणि तणाव, एकाचवेळी अनेक काम करणे, थायरॉईड, व्हिटॅमिन बी-12 चा अभाव, इंटरनेटवरची अवलंबिता, मेटाबॉलिक समस्या आदी कारणे असून ते डिमेन्शियाचा धोका वाढवण्याचे काम करतात.

लक्षणे

डिमेन्शियाचे तीन स्तर असतात. सुरुवातीच्या लक्षणात एखादा व्यक्‍ती दररोज काम करतो; परंतु त्याला चांगली झोप येत नाही. एकाग्रता होत नाही. तो काही गोष्टी विसरू लागतो. अलीकडच्या गोष्टी देखील विसरू लागतो. योजना तयार करणे, निर्णय घेणे, काम पूर्ण करण्यास त्याला अडचणी येऊ लागतात. या स्टेजवर लक्षणे एकदम दिसत नाहीत.

दुसर्‍या स्टेजचा परिणाम हा अनेक वर्षांपर्यंत चालतो. व्यक्‍तीला लक्षात ठेवण्यास अडचणी येऊ लगातात. एवढेच नाही तर दिवस कोणता आहे, हे देखील लक्षात राहत नाही. आपले नावही तो विसरतो. विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. विशेष म्हणजे मलमूत्रावरही नियंत्रण गमावून बसतो.

तिसरी स्टेज : तिसरी स्टेज ही गंभीर मानली जाते. या स्टेजमध्ये डिमेन्शियाचे लक्षणे खूपच गंभीर होतात. बोलणे, चालणे, बसणे किंवा कधी कधी गिळण्याची क्षमताही तो गमावून बसतो. तो बोलताना अडखळू लागतो आणि होणारा त्रास सांगण्यासही असमर्थ राहतो. स्मरणशक्‍तीवर विपरित परिणाम होत असल्याने रुग्णाकडे प्रत्येक वेळी लक्ष देणे गरजेचे आहे.

उपचार आणि खबरदारी

सध्या या आजारावर कोणताही उपचार नाही. सुरुवातीच्या काळात दिलेली औषधे ही तात्पुरत्या रूपात डिमेन्शियाची लक्षणे कमी करतात. आजारपण बळावण्यावर नियंत्रण राहते. हे औषधे मेंदूत न्यूरो ट्रान्समीटर्स वाढवण्याचे काम करतात. डिमेन्शिया असल्याचे स्पष्ट झाल्यावर अनेक चाचण्या केल्या जातात. डॉक्टर देखील संबंधित व्यक्‍तीचा इतिहास आणि लक्षणे चांगल्या रितीने जाणून घेतात. म्हणूनच डिमेन्शियाची लवकर ओळख पटवणे आवश्यक असून त्याद‍ृष्टीने उपचार करता येऊ शकतात.

चांगली झोप आणि आहार असणे गरजेचे आहे. रुग्णांनी अँटिऑक्सिडेंटस्युक्‍त गोष्टीचे सेवन करायला हवे. जसे की गहू, बदाम, काजू आणि अक्रोडचे सेवन करणे गरजेचे आहे. मासे देखील मेंदूसाठी उत्तम असतात. यात प्रोटिन आणि कॅल्शियमचे प्रमाण विपूल असते आणि त्याचबरोबर मेंदूत नव्या पेशी तयार होत राहतात.

Back to top button