रजोनिवृत्ती चा काळ | पुढारी

रजोनिवृत्ती चा काळ

डॉ. प्राजक्‍ता पाटील

सर्वच स्त्रियांना रजोनिवृत्ती कालाच्या संक्रमणातून जावेच लागते. कधी कधी हा काळ काही वर्षांपर्यंत लांबू शकतो, तर काहींसाठी तो एकदम संपतो. काही जणींना त्याचा काहीच त्रास होत नाही तर काहींना रात्री खूप घाम येणे, मुडी होणे अशी त्रासाची लक्षणे दिसायला लागतात. एस्ट्रोजन कमी होणे, प्रौढत्वाकडे जाणे आणि तणाव निर्माण होणे ही लक्षणे संप्रेरकाच्या बदलामुळे स्त्रियांच्या वयाच्या 45 व 55 व्या वर्षी दिसून येतात. यानंतर स्त्रीची मासिक पाळी पूर्णपणे थांबते.

या रजोनिवृत्ती संक्रमण काळाच्या संदर्भाने राग येणे, सारखी मन:स्थिती बदलणे, एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्‍ती कमी होणे, तणाव, अस्वस्थता, खिन्‍नता वाढणे, निद्रानाश असे अनेक भावनिक बदल होत असतात. त्याचवेळी कमरेतून किंवा छातीतून गरम वाफा सुरू होतात. त्या मान आणि चेहर्‍यापर्यंत जातात आणि काहीवेळा संपूर्ण शरीरात पसरतात.

याबरोबर काहीवेळा हृदयाचे ठोके जलद पडतात. मासिक पाळी अनियमित असते. ती काही महिने थांबते आणि पुन्हा सुरू होते व जास्त दिवस चालते. काही वेळा खूप रक्‍तस्राव आणि/किंवा रक्‍ताच्या गुठळ्या पडतात. यामुळे रक्‍त कमी होऊन अशक्‍तपणा येतो.

तसेच या मेनोपॉजमध्ये इतरही अनेक बदल शरीरात घडतात. वेगवेगळ्या लक्षणांद्वारे ते व्यक्‍त होतात. मूत्राशयाचे स्थितिस्थापकत्व कमी होणे, त्यामुळे स्राव अगर उत्सर्जनावर नियंत्रण ठेवता न येणे (उदा. जेव्हा तुम्हाला खोकला येतो, शिंका येतात तेव्हा थोड्या प्रमाणात मूत्रोत्सर्जन होते), डोकेदुखी, चक्‍कर येणे, चेहर्‍यावरील केसांची वाढ होणे, स्तन संवेदनशील होणे, स्नायूंचे स्थितिस्थापकत्व आणि शक्‍ती कमी होणे, पोटाच्या वरच्या भागात सूज येणे, हाडे ठिसूळ होणे, त्यामुळे हाड मोडण्याची शक्यता वाढून त्याच्या टोकाशी कडक पदार्थ तयार होण्याचा संभव वाढणे, एस्ट्रोजनची पातळी कमी झाल्यामुळे हृदयाचा झटका येण्याचा धोका संभवणे इत्यादी.

शारीरिक बदलाच्या या संक्रमणकाळातील खिन्‍नता आणि/किंवा अस्वस्थता दूर करण्यासाठी काही स्त्रियांना औषधे घेण्याने फायदा होतो. गरम वाफा येण्याच्या स्थितीत काही उपशामक औषधांचा उपयोग होतो. पौष्टिक आहाराने या काळात होणारा त्रास कमी होऊ शकतो आणि त्यासाठी पुढील काही सल्ले तुम्ही अमलात आणून पाहू शकता-

* जेवणामध्ये सोयाचा वापर करा त्यामध्ये फायटो एस्ट्रोजन किंवा प्लॅन्ट एस्ट्रोजन असते. याने रात्री घाम येतो. मूड बदलणे, हॉट फ्लशेस कमी होतात. रक्‍तातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राखायला मदत होते. त्यामुळे हृदयाचे विकार कमी होतात. हाडांमधल्या धातूंची घनता वाढते व ऑस्टोपोरोसिस या रोगापासून संरक्षण मिळते.

* कॅल्शियमचे प्रमाण वाढवा, त्यामुळे हाडं मजबूत होतात. मेनोपॉजनंतर कंबरेच्या हाडांना इजा व्हायची शक्यता असते. ती शक्यता कॅल्शियम वाढवल्यामुळे कमी होते.

* फोलेट वाढवा. त्यामुळे मेनोपॉजनंतर हृदयाचे रोग होण्याची शक्यता कमी होते.

* वजन योग्य प्रमाणात ठेवा. वजन कमी ठेवले की हृदयाचे रोग होण्याची शक्यता कमी होते.

* बोरोन व फायबर्स असलेले अन्‍न खावे. मेनोपॉजच्या वेळेस एस्ट्रोजेन कमी होण्याची शक्यता असते. बोरॉनमुळे शरीरातले एस्ट्रोजन कायम राहते. योग्य प्रमाणात फायबर असलेले अन्‍न खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होते.

Back to top button