तरुणाईमध्ये वाढले उच्च रक्तदाबाचे प्रमाण | पुढारी

तरुणाईमध्ये वाढले उच्च रक्तदाबाचे प्रमाण

रक्त दाब ही वृद्धापकाळातील आरोग्य समस्या असल्याचे गृहीत धरले जाते. उच्च रक्तदाब केवळ प्रौढ किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्येच नाही तर आधुनिक जीवनशैलीमुळे हल्ली तरुणांमध्येही दिसून येते. 20 ते 30 वयोगटातील तरुणांना उच्च रक्तदाबाची समस्या भेडसावते.

जेव्हा तुमचा रक्तदाब 3 वेळा 140/90 पेक्षा जास्त असेल, तेव्हा डॉक्टर तुम्हाला उच्च रक्तदाबाचे रुग्ण म्हणून घोषित करतात. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. झोप न लागणे, ताणतणाव, मादक पदार्थांचे सेवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, मूत्रपिंड किंवा हृदयविकाराचा त्रास, (हायपरथायरॉईडीझम) सोडियमयुक्त पदार्थ खाणे, पुरेसा व्यायाम न करणे ही उच्च रक्तदाबाची काही कारणे आहेत. तरुणांमध्ये हायपरटेन्शनचे प्रमाण चिंताजनक असून ते वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही समस्या इतर आजारांना आमंत्रण देते, जसे मूत्रपिंड समस्या, काहीवेळा महाधमनीच्या समस्या, अनियंत्रित उच्च रक्तदाब, पुढील आयुष्यात हृदय, नेत्र, मूत्रपिंड, मेंदूच्या समस्यांशी जोडलेला असतो.

लक्षणे कोणती?

उच्च रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, डावा खांदादुखी तर कधी कधी पाठदुखी. काही लोकांना छातीत किंवा पाठीत जडपणा जाणवतो.

रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे आवश्यक

औषधे ही उपचारांची पहिली पायरी आहे आणि म्हणून वेळेवर औषधे घ्यावीत. काही रुग्ण विचारतात, आता माझा रक्तदाब नॉर्मल आहे मी औषधे बंद करू शकतो का? त्याचे उत्तर नाही असे आहे. त्यामुळे लक्षात ठेवा औषधे घेणे थांबवू नका. अर्थात, जीवनशैलीत बदल करून आपण रक्तदाब कमी करू शकतो. यासाठी ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, शेंगा आणि कडधान्ये यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्यावा. अतिरिक्त कॅलरीजचे सेवन कमी करा. चरबीयुक्त पदार्थ कमी करण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला कार्बोनेटेड पेय, सोडा, मिठाई, कँडीज, ज्यूस, मिष्टान्न, बिस्किटे, पेस्ट्री, ब्रेड आणि केक टाळावे लागतील. मीठाच्या सेवनाचे निरीक्षण करावे लागेल. आहारातील मीठाच्या प्रमाणाबाबत तज्ञांची मदत घ्या. न चुकता दररोज व्यायाम करा. असे केल्याने तुमचा रक्तदाब कमी करण्यास आणि इष्टतम वजन राखण्यास मदत होऊ शकते. धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य बीएमआय राखण्याचा प्रयत्न करा आणि लठ्ठपणा नियंत्रित करा. योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा वापर करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

– डॉ. बिपीनचंद्र भामरे

Back to top button