आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि जुळी बालके | पुढारी

आयव्हीएफ तंत्रज्ञान आणि जुळी बालके

डॉ. इंद्रनील जादव

आयव्हीएफ उपचारांनी पालक बनू बघणारी बहुतांश जोडपी जेव्हा हॉस्पिटलला येतात तेव्हा त्यांचा पहिला प्रश्‍न असतो, हे तंत्र वापरून जुळी किंवा तिळी जन्माला येण्याची काही शक्यता आहे का? एकावेळी एकापेक्षा जास्त बालके जन्माला येण्याचा प्रकार पूर्वीच्या तुलनेत अलीकडे जास्त प्रमाणात आढळून येऊ लागला आहे आणि याचे कारण अनेक महिला मूल होण्याकरिता उपचार घेत आहेत. शिवाय, बरीच जोडपी ही नोकर्‍या करणारी असल्याने त्यांचा कल हा एकाचवेळी जुळी होऊ देणे आणि चौकोनी कुटुंब पूर्ण करणे याकडे असतो.

मुळात डॉक्टर आणि जोडपी हे आधीच ठरवून घेतात की आयव्हीएफद्वारे किती हे गर्भाशयात सोडायचे आहेत. उदाहरणार्थ, एक भ्रूण सोडण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला जुळी किंवा तिळी होण्याची शक्यता  अजिबातच नसते. मात्र, त्यामुळे गर्भधारणेची शक्यतादेखील तितकीच कमी होते. सोडलेले भ्रूण गर्भाशयाच्या अस्तरात योग्य ठिकाणी जातील याची कोणतीही शाश्‍वती नसते. त्यामुळे अनेक महिला, विशेषत: ज्यांना दोन किंवा अधिक फेर्‍या करणे शक्य नसते, त्या एकावेळी दोन किंवा अधिक भ्रूण सोडण्याचा पर्याय निवडतात. यातील महत्त्वाची बाब ही की एका भ्रुणाच्या तुलनेत अधिक भ्रूण सोडले तरीही गर्भधारणा होण्याची शक्यता अगदी किंचितच वाढते. मात्र, एकापेक्षा जास्त मुले होण्याच्या शक्यतेत निश्‍चित वाढ होते. आयव्हीएफ फेर्‍यांच्या यशात महिलेचे वय, तिची प्रकृती आणि भ्रूण यशस्वी होण्याची शक्यता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात, हे प्रथमत: ध्यानात घ्यावे.

 जुळ्या बालकांची मागणी

जर आयव्हीएफ  फेरीदरम्यान तुम्ही एकापेक्षा जास्त भ्रूण गर्भाशयात सोडण्याचा पर्याय निवडला तर तुम्हाला जुळी किंवा तिळे होण्याची शक्यता एकदम वाढून जाते. ज्या जोडप्यांना जुळी हवी असतात आणि एकाच गर्भारपणात दोन मुले होणे हे ज्यांना ‘क्यूट’ वाटते, अशांमध्ये हा ट्रेंड जास्त आहे. एक मूल हवं किंवा जुळी, आयव्हीएफचा खर्च एकसारखाच लागणार असल्याने सध्या आयव्हीएफची मागणी मोठी आहे. आयव्हीएफ हे खर्चिक असल्याने काही जोडपी एकाचवेळी जुळी होऊ देण्याच्या मानसिकतेची असतात तर काही जोडप्यांना वारंवार आयव्हीएफ करणे नकोसे वाटते आणि त्यामुळे ती एकाचवेळी जुळे होऊ देण्याचा निर्णय घेतात. आयव्हीएफद्वारे जुळी होऊ देणे हा 1 पर्याय अशा जोडप्यांना आर्थिकदृष्ट्या देखील परवडणारा वाटतो. नोकरी करणार्‍या महिलांना असे जुळे होऊ देण्याची बरेचदा इच्छा असते कारण एकाचवेळी चौकोनी कुटुंब पूर्ण झाले की त्या आपल्या करियरकडे अधिक लक्ष देऊ शकतात. तशी इच्छाही ते बोलून दाखवतात.

जनुकीय चाचणी करून घेण्याची इच्छा असणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. क्रोमोझोम्सची संख्या निश्‍चित करण्यासाठी आणि कोणतेही दोष नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी पीजीडीप्रमाणेच पीजीएस (प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक स्क्रिनिंग) चा वापर केला जातो. जनुकीय दोष निश्‍चित करण्याबाबत पीजीडीची अचूकता 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या चाचण्यांमुळे गर्भपात होण्यासारखे कठीण प्रसंग टाळणे डॉक्टरांना शक्य होऊ लागले आहे. अशा गर्भपातांचे महिलांवर होणारे शारीरिक आणि मानसिक परिणाम लक्षात घेता हे अधिक महत्त्वाचे आहे. या चाचण्यांमुळे काही जोडप्यांमध्ये आयव्हीएफ चाचण्या वारंवार का आणि कशा अपयशी ठरतात याचा शास्त्रीय आधार मिळवणे शक्य होते. गर्भपातामुळे तरुण जोडप्यांमध्ये निर्माण होणारे मानसिक आणि भावनिक ताण टाळण्यासाठी या चाचण्यांचा उपयोग होत असला तरी या तंत्राबद्दल काही शंका अजूनही आहेत. डॉक्टर्स आणि निरोगी बाळ हवे असणारी जोडपी अशा दोघांसाठीही या चाचण्या फायदेशीर असल्याने वैद्यकीय क्षेत्रातील काही लोक हे या चाचण्यांचा वापर लिंग परीक्षणासारख्या बंदी असलेल्या गोष्टी करण्यासाठी करू शकतात. हे धोकादायक आहे.

आयव्हीएफनंतर जोडप्यांनी घ्यावयाची काळजी

एखाद्या स्त्रीची एकापेक्षा जास्त बाळंतपणे बहुतांशवेळा सुरक्षितपणे पार पडतात आणि निरोगी बाळांचा जन्म होतो, हे नैसर्गिकरीत्या व आधुनिक काळात आता शक्य आहे. मात्र, दोन किंवा अधिक अर्भके पोटात असताना काही धोकेही असतात याची जाणीव असणे आवश्यक असते. त्यामुळे त्या स्त्रीने डॉक्टरांबरोबर असलेली अपॉईंटमेट कधीही चुकवू नये.  वेळेवर तपासणी करून घ्यावी. एकापेक्षा जास्त बाळंतपणे होणे हे डॉक्टरांच्या हातात नसते कारण जेव्हा आयव्हीएफ प्रक्रिया केली जाते, तेव्हा एकापेक्षा जास्त भ्रूण गर्भाशयात सोडले जातात आणि त्यांच्यात कोणताही हस्तक्षेप करता येत नाही. गर्भाशयात भ्रुणांचे रोपण होण्याची प्रक्रिया स्वयंनियंत्रित असते.

तुम्हाला एक किंवा जास्त बाळ होणार आहेत हे महत्त्वाचे नाही तर आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि संतुलित आहार यामुळे गर्भाचे आणि मातेचे योग्य प्रकारे पोषण होऊ शकते. जर तुम्हाला भूक लागली तर ताजी फळे, कमी फॅट असलेले दही किंवा ग्रेटेड चीज, लीनहॅम किंवा मॅश्डट्युना भरलेले सँडविच खावेत. जुळी बालके होणार आहेत याचा अर्थ मातेने दुप्पट किंवा खूप जास्त आहार घ्यावा असे नाही.  जुळ्यांच्यावेळी बाळंतपणात अशक्तपणाची जास्त शक्यता असल्याने लोह आधारित पूरक आहार देणे महत्त्वाचे आणि लाभदायक ठरू शकते.

Back to top button