स्तनपान व दुग्धदान बाळांसाठी अमूल्य | पुढारी

स्तनपान व दुग्धदान बाळांसाठी अमूल्य

आईला दूध कमी येण्याची समस्या शहरी भागात जास्त आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना ग्रामीण स्त्रियांमध्ये जास्त दूध येत असल्यामुळे स्तन कडक होणे, दुखणे अशा समस्या दिसून येतात. म्हणून बर्‍याचदा स्त्रिया हे जास्तीचे दूध काढून फेकून देतात. ह्यूमन मिल्क बँकेच्या माध्यमातून हा असमतोल दूर करून दूध कमी येणार्‍या व दूध जास्त येणार्‍या दोन्ही मातांना लाभ होऊ शकतो.

आईच्या दुधातून मिळणार्‍या अँटीबॉडीजमुळे प्रतिकारशक्ती वाढते. पण काहीवेळा बाळाचा जन्म 9 महिन्यांच्या आधी झाल्यास किंवा बाळ आजारी असल्यास, त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागल्यामुळे आईवर मानसिक तणाव येऊन पुरेसे दूध येत नाही. बर्‍याचदा बाळ एका हॉस्पिटलमध्ये, तर आई दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये दाखल असते. तसेच सध्या वकिर्ंंग मदर्सची संख्या वाढल्यानेही बाळांना आईच्या दुधाला नाइलाजास्तव मुकावे लागते. अशा वेळी गाईचे दूध किंवा फॉर्म्यूला मिल्क (दुधाची पावडर) हा सोपा पर्याय निवडला जातो. पण आईच्या दुधाची तुलना या कृत्रिम दुधाशी होऊच शकत नाही म्हणून ‘ह्यूमन मिल्क बँक’ ही संकल्पना आकार घेऊ लागली. अशा प्रकारे नोव्हेंबर 1989 मध्ये आशिया खंडातील पहिली ‘ह्यूमन मिल्क बँक’ म्हणजेच ‘मानवी दुधाची बँक’ सायन हॉस्पिटल येथे डॉ. फर्नांडिस यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.

गेल्या दशकापासून अनेक कारणांनी, विशेषत: स्तनपानाबाबतचे गैरसमज, मातांमधील तणाव व वर्किंग मदर्समधील अनियमित स्तनपान यामुळे बर्‍याच मातांमध्ये दूध येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच नवजात शिशूंमध्येही जंतुसंसर्ग किंवा इतर आजारांमुळे त्यांना आईचे दूध मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे. आईला दूध कमी येण्याची समस्या शहरी भागात जास्त आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना ग्रामीण स्त्रियांमध्ये जास्त दूध येत असल्यामुळे स्तन कडक होणे, दुखणे अशा समस्या दिसून येतात म्हणून बर्‍याचदा स्त्रिया हे जास्तीचे दूध काढून फेकून देतात. ‘ह्यूमन मिल्क बँके’च्या माध्यमातून हा असमतोल दूर करून दूध कमी येणार्‍या व दूध जास्त येणार्‍या दोन्ही मातांना लाभ होऊ शकतो.

नवजात अतिदक्षता विभागात दाखल झालेली कमी दिवसाची व कमी वजनाची बालके यांना योग्य वेळेत मातेचे दूध मिळाल्यास त्यांच्यामधील जंतुसंसर्ग व इतर गुंतागुंतीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते. अशा बालकांना त्यांच्या आईचे दूध उपलब्ध नसल्यास अशा ‘ह्यूमन मिल्क बँक’द्वारे दूध दिले जाऊ शकते. यामुळे अशा बालकांमधील मृत्युदर निश्चितपणे कमी होऊ शकतो.

मानवी दुधाच्या बँकेसाठीचे दाते हे या रुग्णालयातील किंवा रुग्णालयाबाहेरील माताही असू शकतात. दूध पंपाच्या साहाय्याने एका कंटेनरमध्ये जमवले जाते. दुग्धदान करणार्‍या आईला एचआयव्ही., कावीळ बी व सिफिलिससारखे आजार नसल्याची खातरजमा केली जाते. त्यानंतर हे दूध 62.5 डिग्री सेल्सिअसला उकळून त्याचे पाश्चरायझेशन केले जाते. त्यानंतर हे दूध साठवून ठेवून जशी गरज पडेल तसे गरजू नवजात शिशूंना दिले जाते.

1989 मध्ये ‘ह्यूमन मिल्क बँके’ची ही चळवळ मोठ्या उत्साहात सुरू झाली. गेल्या दोन दशकांमध्ये भारतात सुमारे 80 इतक्या मिल्क बँकांची स्थापना झाली आहे. आज भारतातील बालमृत्यूंचे प्रमाण पाहता जास्तीत जास्त ‘ह्यूमन मिल्क बँका’ स्थापन करणे काळाची गरज आहे. अशीच ‘ह्यूमन मिल्क बँक’ व CLMC सेंटर आपल्या कोल्हापूरमध्ये बालरोग विभागाने सीपीआर रुग्णालयात स्थापन केली आहे.
या दुग्धदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शासकीय तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, आशा व अंगणवाडी सेविका व उत्साही मातांनी पुढे येऊन ह्यूमन मिल्क बँकिंगची चळवळ पुढे नेणे आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र प्रयत्न केल्याने अनेक माता दुग्धदान करण्यास प्रेरित होतील व अनेक बाळांचे प्राण वाचू शकतील.

-डॉ. दीपा फिरके

Back to top button