जीवाणूजन्य सांसर्गिक रोग | पुढारी | पुढारी

जीवाणूजन्य सांसर्गिक रोग | पुढारी

डॉ. निलोफर नदाफ

‘कोरोना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सांसर्गिक रोगाचे भयानक रूप आपल्या सर्वांच्या समोर आले आहे. यापूर्वीही इतर सांसर्गिक आजारांची भयानकता आपल्या देशाने अनुभवली आहे व त्यामध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्यादेखील कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. परंतु, अधिक वेगाने पसरण्याची क्षमता असल्यामुळे कोरोनाची भीती इतर आजरापेक्षा अधिक आहे.

सांसर्गिक किंवा संसर्गजन्य रोग हे रोगी व्यक्‍तीच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आल्याने एका व्यक्‍तीपासून दुसर्‍या व्यक्‍तीत पसरतात. सर्वच सांसर्गिक रोग हे प्राणघातक असतात असे नाही. सांसर्गिक रोग होण्यास नुसत्या डोळ्यांना न दिसणारे जीव म्हणजेच विषाणू, जीवाणू, कवक कारणीभूत असतात. एकपेशीय आदिजीव व कृमीमुळे देखील सांसर्गिक रोग होतात. अशा रोगकारक सूक्ष्म जीवांचे वहन होण्यासाठी माध्यम (vector) ची आवश्यकता असते. काही संसर्गजन्य रोग संक्रमित व्यक्‍तीपासून थेट निरोगी व्यक्‍तीपर्यंत पोहोचवले जातात, तर काही प्राण्यांकडून, दूषित पाणी, दूषित वातावरण, दूषित अन्‍नामार्फत पसरतात. अशा ‘मूर्ती लहान पण विकृती महान’ असणार्‍या काही जीवाणूमुळे होणार्‍या सांसर्गिक रोगांविषयीची माहिती आपण पाहू.

क्षयरोग (टी बी) : या रोगाचा प्रादुर्भाव मायकोबक्टेरिम ट्यूबरक्यूलोसिस या जीवाणूमुळे होते. हे जंतू मुख्यत्वे  फुफ्फुस्साला अपाय करतात तसेच हाडे, सांधे, मज्जासंस्था, आतडे, लसिका ग्रंथी यांनादेखील क्षयरोग होतो. क्षयरोगाचा प्रसार संक्रमित व्यक्‍ती खोकल्यास किंवा शिंकल्यास तोंडातून बाहेर उडणार्‍या तुषारांमार्फत हवेच्या माध्यमातून होतो. क्षयरोगाची लागण झाल्यास तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणे, दम लागणे, खोकल्यावर थुंकीतून रक्‍त येणे, तसेच अशक्‍तपणा, वजन कमी होणे, रात्री खूप घाम येणे आदी लक्षणे दिसून येतात. क्षयरोगाचे सर्वात जास्त रुग्ण भारतामध्ये असून दरवर्षी साधारणतः 2.8 दशलक्ष केसेस आढळतात. वेळीच निदान व उपचार झाल्यास क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. केंद्र व राज्य सरकारने क्षयरोगमुक्‍त भारत मोहीम हाती घेतली असून, 2025 पर्यंत भारत या सांसर्गिक रोगातून मुक्‍त होईल अशी आशा आहे.  

टायफॉईड : साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे हा आजार होतो. अस्वच्छता या आजरास निमंत्रण देते. हे जीवाणू मानवी (संक्रमित व्यक्‍तीच्या) विष्ठेतून  पाण्यामधे मिसळले जातात, अशा दूषित पाण्याचे व अन्‍नाचे सेवन, तसेच अस्वच्छ हात, घरमाश्यांमार्फत हे जंतू निरोगी व्यक्‍तीच्या शरीरात प्रवेश करतात व प्रचंड संख्येमध्ये वाढतात. परिणामी आजारी व्यक्‍तीमध्ये जंतूंचा शिरकाव झाल्यानंतर 6 ते 30 दिवसांमध्ये हलका ते तीव्र ताप, कमजोरी, पोटदुखी, डोकेदुखी, उलटी, तसेच काही रुग्णांमध्ये शरीरावर गुलाबी पुरळ दिसून येतात. काही व्यक्‍ती या जंतूंचे सुप्त वाहक असतात, त्यांचा द्वारेदेखील या रोगाचा प्रसार होण्याचा धोका असतो. वैयक्‍तिक स्वच्छता, शौचानंतर साबणाने हात व पाय धुणे, उघड़्यावरील अन्‍न न खाणे, जेवणाआधी स्वच्छ हात धुणे, शुद्ध पाणी पिणे, तसेच लसीकरणाद्वारे या आजाराला दूर ठेवता येते.

कॉलरा : या आजारामध्ये तीव्र स्वरूपाचा अतिसार होतो. यांस विब्रियो कोलेरी नावाचा जीवाणू कारणीभूत असतो. हा आजार कॉलराची बाधा झालेल्या व्यक्‍तीच्या विष्ठेमुळे दूषित झालेल्या अन्‍न व पाण्याद्वारे पसरतो. रुग्णावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. वेळीच निदान करून योग्य उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. वैयक्‍तिक स्वच्छता, शुद्ध पाणी तसेच इतर स्वच्छते संबंधित सोयीसुविधांचा अवलंब केल्यास कॉलराला दूर ठेवता येते.

न्यूमोनिया : न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांमध्ये झालेला संसर्ग. हा संसर्ग जीवाणूजन्य, विषाणूजन्य किंवा बुरशीजन्य (फंगल) असू शकतो. आपल्या फुफ्फुसामधील हवेच्या लहान लहान पिशव्यांना संसर्ग होऊन त्यात कफ जमा होतो. परिणामी श्‍वास घेण्यास त्रास, खोकताना छातीत दुखणे आदी लक्षणे दिसू लागतात. संक्रमित व्यक्‍ती शिंकल्यास किंवा खोकल्यास तोंडवाटे उडणार्‍या थेंबांद्वारे हा रोग इतरत्र पसरतो. लहान मुले व वयस्कर व्यक्‍तींमध्ये या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असते. न्यूमोनियापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हा एक उत्तम उपाय आहे. तसेच न्यूमोनियाची लक्षणे दिसल्यास  वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

या काही प्रमुख आजारांचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की सांसर्गिक रोगांचे मूळ हे अस्वच्छतेमध्ये आहे. तसेच कमकुवत रोगप्रतिकार शक्‍ती असणार्‍या व्यक्‍ती ना अशा सांसर्गिक रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. म्हणूनच या रोगांना दूर ठेवायचे असेल तर वैयक्‍तिक स्वच्छते सोबतच आपला परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच चांगला आहार व व्यायामाद्वारे रोग प्रतिकार क्षमता वाढवून, आरोग्याबाबीतल्या चांगल्या सवयी आत्मसात करून अशा घातक रोगांना दूर ठेवता येते.

Back to top button