मुलांना ठेवा व्यस्त | पुढारी | पुढारी

मुलांना ठेवा व्यस्त | पुढारी

डॉ. तुषार पारेख

कोरोना व्हायरस हे एक जागतिक संकट आहे. दिवसेंदिवस या आजाराची परिस्थिती गंभीर वळण घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाव्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आणि त्याची मुदतही वाढवली आहे. जेव्हा संपूर्ण जग भीती व चिंताग्रस्त वातावरणात असते तेव्हा लॉकडाऊनचा म्हणजे आपण जिथे आहात तिथेच राहायला पाहिजे, हाच उपाय असतो. अशावेळी पालकांना चिंता वाटू लागते. सर्वांनाच घरी राहण्याची सूचना केली जाते; पण त्यामुळे मुलांना मात्र कंटाळा येऊ शकतो. आपल्या मुलांना निरोगी आयुष्यासाठी प्रोत्साहित करणे आणि लॉकडाऊन दरम्यान मुलांना विविध छंद, चांगल्या सवयी जोपसण्यात गुंतवून ठेवणे नक्‍कीच फायदेशीर ठरेल.

लॉकडाऊनदरम्यान पालक आपल्या मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी काही सोपे पर्याय वापरू शकतात.

चांगल्या सवयी लावा : 

मुलांना चांगल्या सवयी लावा. रोजच्या कामाचे महत्त्व स्वतःहून त्यांना पटवून द्या. जेणेकरून मुलांना स्वावलंबी करता येईल. त्यांना त्यांच्या रोजच्या जबाबदार्‍या कळतील. त्यांना पुस्तक वाचण्यात मदत करा, त्यांच्याबरोबर कोडी सोडवा. बुद्धीला चालना देणारे खेळ खेळा, गाणी-गोष्टी सांगा, सामान्यज्ञान वाढविणारे वाचन करून घ्या.

त्यांच्यातील कलागुणांना वाव द्या : 

मुलांना त्यांच्यातील सुप्त कलागुणांना चालना देण्याची संधी द्या. हस्तकला शिकवा, तसेच आवडता छंद जोपासण्यात त्यांना मदत करा. त्यांना चित्र काढणे, ते रंगविणे, विणकाम करायला शिकवा, तसेच रोजनिशी लिहायला लावा. आपल्या मुलाच्या त्यांच्या कल्पनाशक्‍तीला वाव देत बेडरूममध्ये सजावट करा किंवा घरात त्यांना स्वतःला त्यांची खोली सजवू द्या. चित्रकला आणि ओरिगामी शिकणे हे देखील मुलांना क्रिएटिव्ह करू शकतात. आपल्या मुलांबरोबर शैक्षणिक कार्यक्रम पाहा. पेंटिंग, पाककला, टायपिंग करणे आदी नवीन कौशल्ये शिकण्यासाठी लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग करा.

मुलांसह काही चांगल्या गोष्टींत वेळ घालवा : 

आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम मर्यादित करा. त्याऐवजी, आपल्या मुलाबरोबर काही चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. घरात तंत्रज्ञान मुक्‍त झोन तयार करा. असे केल्याने आपल्या मुलाशी असलेले आपले नाते आणखी घट्ट होऊ शकते. कॅरम, बुद्धिबळ, लुडो किंवा यूएनओ सारखे काही घरातील खेळ खेळा.

व्यायामाचे महत्त्व पटवून द्या : 

घरी असताना आपल्या मुलांना व्यायामाचे महत्त्व पटवून रोज व्यायाम करण्यास प्रोत्साहित करा. ध्यान करणे, योगसाधना किंवा बागकाम करण्यास मदत करा. व्यायाम करताना त्यांच्यावर जबरदस्ती न करता त्यांना त्यातून आनंद घ्यायला शिकवा.

दैनंदिनी लिहिण्यास मदत करा : 

आपल्या मुलास रोजनिशी लिहिण्यास मदत करा. त्यांना त्यांच्या भावनांबद्दल मनमोकळेपणाने लिहू द्या. त्यांना काय आवडते, छंद कोणते किंवा भविष्यात काय करण्याची त्यांची इच्छा आहे. याबाबत त्यांना या वहीमध्ये लिहिण्यास सांगा. या गोष्टी त्यांना लॉकडाऊन दरम्यान आनंदी आणि सकारात्मक राहण्यास नक्‍कीच मदत करतील.

संतुलित आहार द्या : 

आपल्या मुलांना पोषक आहार द्या. त्यांना आवडणारे पदार्थ बनवायला शिकवा. त्यांच्याबरोबर भाज्यांचे सूप, कोशिंबिरी आणि स्नॅक्स बनवण्याचा प्रयत्न करा.

Back to top button