औरंगाबाद : पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कातील पोलिस निगेटिव्ह | पुढारी

औरंगाबाद : पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कातील पोलिस निगेटिव्ह

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

नशेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या एका ४२ वर्षीय आरोपीला अटक केल्यावर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर ठाणेदारांसह २६ पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या संपर्कातील एकूण ४७ जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आल्याने शहर पोलिसांना दिलासा मिळाला. त्यांना आता आठ दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू, असा पॉझिटिव्ह विचार या निगेटिव्ह आलेल्या पोलिसांनी व्यक्त केला.

वाचा : औरंगाबाद : एचडीएफसी बँकेच्या टीव्ही सेंटर शाखेला आग

संबंधित बातम्या

२४ एप्रिल रोजी सिटी चौक ठाण्याच्या डीबी पथकाने चेलीपुरा भागातून तो आरोपी पकडला होता. त्याच्या घराच्या झाडाझडतीत जवळपास एक हजार ७७० गोळ्या पथकाने जप्त केल्या होत्या. तो कोरोनाग्रस्त असल्याचे मंगळवारी रात्री उशिरा समोर आले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या पाच पोलिस अधिकाऱ्यांसह २६ पोलिस कर्मचारी व त्यांच्या संपर्कातील एकूण ४७ जणांचे बुधवारी स्वॅब घेण्यात आले. पोलिस अधिकाऱ्यांना महसूल प्रबोधिनीच्या गेस्ट हाऊसमध्ये तर कर्मचारी व इतरांना न्यू उस्मानपुऱ्यातील उद्योजक अतिथीगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते. गुरुवारी या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले, अशी माहिती सिटी चौक ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी दिली. सोबतच ठाण्यातील सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पोलिस दलासह शहरवासियांना दिलासा मिळाला.

कोरोनाला घाबरू नका पण काळजी घ्या

कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कात येऊनही पोलिस निगेटिव्ह आले, हे खरे आहे पण, पोलिसांनी स्वत:ची काळजी घेतली म्हणून ते शक्य झाले हेही तितकेच खरे आहे. सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क लावणे, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुणे या सर्व गोष्टी पोलिसांनी पाळल्या. त्यामुळेच त्यांनी कोरोनाला हरविले. यावरून संपर्कात आला म्हणजे कोरोना झाला, असा अर्थ लावणे चुकीचे आहे हे स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांनीही अशाच पद्धतीने स्वत:ची काळजी घ्यावी. कोरोनाला घाबरून न जाता त्याचीशी लढा देताना काळजीही घ्या, असे आवाहन पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी केले आहे.

वाचा : औरंगाबादेत कोरोनाचे दीड शतक पार  

Back to top button