कोरोना व्हायरसच्या वेगवेगळ्या टेस्ट कोणत्या? | पुढारी

कोरोना व्हायरसच्या वेगवेगळ्या टेस्ट कोणत्या?

रेणुका कल्पना

कोणत्याही साथरोगाचा, त्याच्या वायरसचा शोध लावण्यासाठी मदत करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या आजाराची टेस्ट. रक्तातून, लाळेतून किंवा लघवी, विष्ठेमधून शरीरात वायरस आहेत की नाही, याचा पत्ता ही टेस्ट लावते…

कोरोना व्हायरसची आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्ट कधी केली जावी याबाबत महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने नवे नियम जाहीर केलेत. आरटीपीसीआर, स्वॅब टेस्ट, नेझल ऍस्पिरेट, अँटिबॉडी अशी कोरोनाच्या विविध टेस्टची नावं आपण ऐकत असतो. यातली प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे. व्हायरसची लागण झालीय हे ओळखण्यासोबतच साथरोगात काय उपाययोजना करायच्या हे शोधायला या टेस्ट सरकारला मदत करत असतात.

टेस्ट टेस्ट टेस्ट! कोणत्याही साथरोगाचा, त्याच्या व्हायरसचा शोध लावण्यासाठी मदत करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या आजाराची टेस्ट. रक्तातून, लाळेतून किंवा लघवी, विष्ठेमधून शरीरात व्हायरस आहेत की नाही याचा पत्ता ही टेस्ट लावते. कोव्हिड-19 या आजाराची साथ सुरू झाली तेव्हाही या टेस्टनेच आपल्याला मोठी मदत केली. 

आताही सर्दी, ताप झाला रे झाला की डॉक्टर लगेचच कोरोनाची टेस्ट करून घ्यायचा सल्ला आपल्याला देतात. या टेस्टचे अनेक प्रकार सध्या उपलब्ध आहेत. बहुतेकवेळा आरटीपीसीआर टेस्ट डॉक्टरांनी लिहून दिलेली असते. त्यासाठी नाकातल्या, तोंडातल्या द्रव्याचे नमुने गोळा केले जातात. रक्तामधूनही कोरोना वायरस आपल्या शरीरात येऊन गेला आहे की नाही हे शोधता येतं. याशिवाय स्वॅब टेस्ट, नेझल टेस्ट अशी कोरोनाचा शोध लावणार्‍या वेगवेगळ्या टेस्टची नावं आपण ऐकतो असतो.

मागच्याच आठवड्यात महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यासंदर्भातली नवी नोटीस जाहीर केली. कोरोना व्हायरसची लागण झालीय की नाही, हे शोधण्यासाठी करण्यात येणार्‍या आरटीपीसीआर चाचणीऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यावर भर देण्यात यावा असं यात सांगितलंय. फक्त बाहेरच्या देशातून आलेल्या आणि कोरोनाग्रस्तांच्या अगदी जवळून संपर्कात आलेल्यांसाठी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी. तर संपर्कात न येता ताप, सर्दी झालेले किंवा गर्भवती स्त्रिया अशांसाठी इतर टेस्ट करण्याचे आदेश दिलेत. हे नवे नियम समजून घ्यायचे असतील तर आधी आरटीपीसीआर आणि कोरोना व्हायरसच्या इतर टेस्ट काय असतात हे पहावं लागेल.

अचूक निदान देणारी आरटीपीसीआर टेस्ट

कोरोना वायरस म्हणजे कोव्हिड-19 या आजाराला कारणीभूत ठरणारे सार्स कोव्हिड- 19 हे व्हायरस ओळखण्यासाठी तीन प्रकारच्या टेस्ट केल्या जाऊ शकतात, अशी माहिती हेल्थलाईन या वेबपोर्टलवर देण्यात आलीय. एक डायग्नोस्टिक टेस्ट, दुसरी अँटिजेन टेस्ट तर तिसरी अँटिबॉडी टेस्ट. डायग्नोस्टिक या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो निदान करणं. थोडक्यात, शरीरातल्या कोरोना व्हायरसचं निदान करण्यासाठी ही टेस्ट वापरली जाते. यासाठी नमुना म्हणून आपल्या श्वसनसंस्थेतला द्रव्य पदार्थ गोळा केला जातो. या द्रव्याला इंग्रजीत म्युकस किंवा मराठीत शेंबूड असंही म्हणतात.

स्वॅब टेस्ट, नेझल ऍस्पिरेट, ट्रेकल ऍस्पिरेट किंवा स्पटम टेस्ट असे याचे विविध प्रकार असतात. आपल्या नाकातून किंवा फुफ्फुसातून थेट नळी घालून किंवा एखादं औषधं सोडून हा म्युकस काढला जातो. एका हवाबंद डब्यात वगैरे तो गोळा करून लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवून देतात. लॅबमधे या नमुन्यातून आरएनए म्हणजेच व्हायरसची जनुकं शोधली जातात. हे जनुकं कोरोना व्हायरसच्या जनुकांसारखं असेल तर कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते. संसर्गाची तीव्रता किती जास्त आहे हे शोधण्यासाठीही या टेस्टचा उपयोग होतो.

व्हायरसची लागण शोधण्याची अतिशय अचूक पद्धत म्हणून या टेस्टकडे पाहिलं जातं. नमुन्यामध्ये व्हायरस नसतील किंवा ही टेस्ट करताना काही चूक झाली तरच त्याचा रिझल्ट निगेटिव्ह येतो. बाकी प्रत्येकवेळी ही टेस्ट एकदम अचूक रिझल्ट सांगते. लॅबमधे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि कौशल्यपूर्ण टेक्निशिअनच्या सहाय्यानेच ही टेस्ट करता येते. त्यामुळेच त्याची किंमतही खूप जास्त असते. नमुना घेतल्यानंतर टेस्टचा रिझल्ट यायला काही दिवसांचा वेळही लागतो. भारतात अशाप्रकारे कोरोना व्हायरसचं निदान करण्यासाठी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेस चेन रिऍक्शन म्हणजेच आरटीपीसीआर ही टेस्ट वापरली जाते. याचा खर्च सुमारे 4,500 रुपये येतो. आणि रिझल्ट यायला एक ते दोन दिवस लागतात.

15 मिनिटांत रिझल्ट

या मॉलेक्यूलर टेस्टच्या मर्यादा पाहिल्या की साथरोगाच्या काळात ही टेस्ट व्यवस्थेवर ताण देणारी का आहे हे लक्षात येईल. त्यामुळेच या टेस्टऐवजी रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे आदेश आरोग्य मंत्रालयाकडून आलेत. ही रॅपिड अँटिजेन टेस्ट साधारण कोरोना वायरसची लक्षणं दिसू लागल्यावर केली जाऊ शकते. त्याआधी किंवा व्हायरसची लागण झाल्या झाल्या लगेच केल्यास त्याचा रिझल्ट चुकीचा येतो.

आपले कोरोनाचे वायरस शरीरात पसरू लागतात. ते स्वतःची संख्या वाढवत असताना आपल्याभोवती अँटिजेन नावाच्या एका प्रोटिनचं आवरण तयार करत असतात. हे आवरण आणि त्याचं शरीरातलं प्रमाण ओळखलं की कोरोना वायरसची लागण झालीय की नाही हे सहज शोधता येतं. यासाठीही नमुना म्हणून म्युकस लागतो. त्यामुळेच वायरसची लागण झाल्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसांनी लक्षणं दिसली तर ही टेस्ट करायचा सल्ला दिला जातो.

आरटीपीसीआर टेस्टमध्ये वायरसचे जीन्स शोधावे लागतात. त्यामुळे त्याच्या वरचं शरीर या जीन्सपासून वेगळं करायला बरीच खटपट करावी लागते. याउलट अँटिजेन टेस्टमधे वायरसच्या वरचं आवरणंच शोधायचं असल्याने याची प्रक्रिया फारशी किचकट नसते. साहजिकच, अँटिजेन टेस्टचे रिझल्ट यायला फारसा वेळ लागत नाही. काही तास किंवा अगदी काही मिनिटं अगदी 15 मिनिटंसुद्धा पुरतात; पण या टेस्टचे रिझल्ट शंभर टक्के अचूक नसतात, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

अँटिजेन टेस्टच्या अचूकपणाबद्दल शंका असली तरीही या दोन्ही टेस्ट महत्त्वाच्या आहेत. याचं कारण, आरटीपीसीआर टेस्टवर पैसे, वेळ खर्च करून निगेटिव्ह रिझल्ट घेण्याऐवजी फारसा ताण न देणार्‍या अँटिजेन टेस्टवर भर देणं व्यवस्थेसाठी सोपं असतं. अनेकदा तर एकाच डबीत 50 जणांचे नमुने गोळा करून त्या सगळ्यांची एकत्रित अँटिजेन टेस्ट केली जाते. ही टेस्ट निगेटिव्ह आली तरच सगळ्या 50 जणांची आरटीपीसीआर टेस्ट करणं परवडणारं असतं.

शरीराने कोरोनाला हरवलं का?

परदेशातून आणि कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लागण झाल्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याचीही भीती असते. त्यामुळे ही लागण टाळण्यासाठी अशा पेशंटची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात यावी, असं आरोग्य विभागाने सांगितलंय. तर इतर सगळ्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली आणि तीव्र लक्षणं दिसत असतील तर मात्र आरटीपीसीआर टेस्ट करण्याची गरज पडेल.

आता या डायग्नोस्टिक आणि अँटिजेन दोन्ही टेस्ट शरीरात वायरस आहे की नाही हे ओळखण्यासाठी वापरल्या जातात. तर अँटिबॉडी टेस्ट ही कोरोना व्हायरसची लागण होऊन गेली आहे की नाही हे शोधण्यासाठी वापरतात. कोरोनाचा व्हायरस शरीरात येऊन मस्त खातपित असताना आपल्या शरीराने त्याला संपवून टाकल्याचा पुरावाच ही टेस्ट देत असते. 

अँटिबॉडी या शब्दाचा अर्थ होतो प्रतिपिंड. व्हायरस शरीरात आल्यावर रक्तातल्या पांढर्‍या पेशी त्याला मारून टाकतात. पुन्हा असेल व्हायरस शरीरात आले तर त्यांना ओळखण्यासाठी या पांढर्‍या पेशी ‘वाय’ या इंग्रजी अक्षराच्या आकाराचं प्रोटिन तयार करतात. या प्रोटिनला प्रतिपिंड किंवा अँटिबॉडी असं म्हणतात. हे प्रतिपिंड शरीरात आहेत की नाही हे अँटिबॉडी टेस्टनं शोधतात. या अँटिबॉडी शोधण्यासाठी रक्ताचे नमुने लागतात. 

अँटिजेन टेस्टप्रमाणेच ही टेस्टही पटकन होते. बहुतेकवेळा लॅबमधेच ही टेस्ट केली जाते; पण घरच्या घरी बोटाच्या टोकातून रक्त काढूनही टेस्ट करणं शक्य आहे. अर्थात हे स्वतःच्या मर्जीने न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला हवं. भूतकाळात शरीरात कोरोना येऊन गेला आहे की नाही हे सांगण्यासाठी अँटिबॉडी टेस्ट वापरली जाते. समाजातल्या किती टक्के लोकांना कोरोनाविरोधातली रोग प्रतिकारकशक्ती मिळालीय, किती टक्के लोक प्लाझ्मा दान करण्यासाठी सक्षम आहे किंवा एकदा वायरसची पुन्हा लागण किती टक्के लोकांना होतेय हे या टेस्टने समजून घेता येतं. यालाच सिरिओलॉजी टेस्ट असंही म्हणतात. 

प्रत्येक टेस्ट महत्त्वाची

आरटीपीसीआर किंवा अँटिजेन अशी कोरोनाची लागण झालीय की नाही हे ओळखणार्‍या टेस्ट केल्या की त्याचा रिझल्ट येईपर्यंत सेल्फ आयसोलेशनमधे जाणं अत्यंत गरजेचं असतं. तसं न केल्यास, कोरोना पसरण्याची भीती असते. अशा या कोरोनाच्या तीन प्रकारच्या टेस्ट असतात.

यातली प्रत्येक टेस्ट महत्त्वाची आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. या टेस्ट मिळून फक्त माणसांना लागण झालीय की नाही एवढंच ओळखत नाहीत तर सरकारला लॉकडाऊन करायचा की नाही याबाबतचे निर्णय घ्यायला मदत करतात. कोणते परिसर उघडायचे, देश पुन्हा कसा चालू करायचा हे सगळं या टेस्टवर ठरतं. इतकंच काय तर आजार झाल्यावर कोणते उपचार आणि औषधं द्यायची आणि वायरसविरोधतली लस निर्माण करतानाही या टेस्टचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. साथरोगाच्या काळात आपलं भवितव्यच या टेस्टच्या आधारवर ठरतं.

Back to top button