बदलती जीवनशैली आणि पुरुषांमधील वंधत्व | पुढारी

बदलती जीवनशैली आणि पुरुषांमधील वंधत्व

डॉ. करिश्मा डाफळे

स्वत:चे कुटुंब सुरू करणे हे अनेक जोडप्यांचे स्वप्न आहे. परंतु, काही जोडप्यांना गर्भधारणा करणे आणि पालक होणे कठीण होऊ शकते. यामागील कारण या जोडप्याची प्रजनन स्थिती असू शकते. अंडकोषात वेदना होणे आणि सूज येणे, चेहर्‍यावरील किंवा शरीराच्या इतर भागांवरील केस कमी होणे किंवा गुणसूत्र आणि अगदी हार्मोनल विकृती आणि कमी शुक्राणू यासारख्या समस्या पुरुष वंधत्वासाठी उद्भवल्याचे दिसून येते. पुरुष वंधत्व ही आजची आणि सध्याच्या वयातली सामान्य घटना आहे आणि त्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घेण्याची आवश्यकता आहे. याकरिता नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करण्याच्या आव्हानांना तोंड देणार्‍या जोडप्याने प्रजननतज्ज्ञांची मदत घेणे अत्यावश्यक आहे.

एखाद्या पुरुषाची प्रजनन क्षमता ही शुक्राणूंचे प्रमाण आणि गुणवत्तेवर अवलंबून असते. शुक्राणूंची निर्मिती कमी होणे, शुक्राणूंचे कार्य कमी होणे किंवा शुक्राणूंच्या वितरणास अडथळ्यांमुळे पुरुषाला वंधत्व येते. शिवाय आजार, दुखापत, आरोग्याच्या समस्या, चुकीची जीवनशैली आणि इतर घटकदेखील वंधत्वाला कारणीभूत असू शकतात. बदलत्या जीवनशैलीमुळे नोकरदारांच्या खाण्यापिण्यासह झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. पोळी भाजीऐवजी पिझ्झा, बर्गरसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढले आहे. पूर्वीच्या तुलनेत दर्जेदार भाज्या आता मिळत नाहीत. शुक्राणूची संख्या, त्यांची क्षमता आणि अंड्यांबरोबर संयोग होऊन बाळ तयार होण्याची क्षमता यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे.

पुरुषांमधील वंध्यत्वाची कारणे

बदलती जीवनशैली : कामाचा ताणतणाव, लॅपटॉप/मोबाईल यासारख्या गॅजेटस्चा जननेंद्रियाच्या नजीकचा सततचा वापर, प्रदूषण, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा व भेसळयुक्‍त तसेच जंक पदार्थांचे सेवन.

धूम्रपान करणे – धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे. याचा शुक्राणूंवर नकारात्मक प्रभावदेखील पडतो. कारण, निकोटीन हे शरीरात असंतुलन निर्माण करते. हे एखाद्याच्या शुक्राणूच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते आणि वंधत्वालाही प्रवृत्त करते. गर्भधारणेची इच्छा असल्यास धूम्रपान सोडणे ही काळाची गरज आहे.

लठ्ठपणा : लठ्ठपणा हे सर्व आजारांचे मूळ कारण आहे. 30 पेक्षा जास्त बीएमआयचा शुक्राणूंच्या गुणवत्तेवर नकारात्मक प्रभाव पडतो. चरबीमुळे शुक्राणूंच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडतात. त्यामुळे निरोगी जीवनशैली स्वीकारणे नक्‍कीच फायदेशीर ठरू शकते.

जननेंद्रियाला झालेल्या दुखापती : मार्शल आर्टस्, सायकलिंग इत्यादी खेळांद्वारे जननेद्रियांना इजा झाल्यास वंधत्व येऊ शकते.

लैंगिक आजार – गोनोरिया किंवा क्लॅमिडियासारख्या लैंगिक आजारांमुळे (एसटीआय) शुक्राणूंची गुणवत्ता कमी झाल्याने पुरुष वंधत्वदेखील वाढवू शकते. या प्रकारच्या गंभीर आणि तीव्र आजारांमुळे वंधत्व येऊ शकते. संसर्गावर वेळीच उपचार करणे योग्य ठरेल.

वाढते वय – वयाच्या 35 वर्षांनंतर प्रजनन क्षमता कमी होते. त्याकरिता योग्य वयात लग्‍न करणे व मूल होणे या समस्येला दूर ठेवू शकते.

ट्युमर : कर्करोग आणि नॉनमॅलिग्‍निगंट ट्यूमर पुरुषांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनास कारणीभूत ठरतात.

वेरिकोसेल : अंडकोषाला ज्या रक्‍तवाहिन्या रक्‍तपुरवठा करतात त्यांना सूज येणे, यामुळे अंडकोषाला सूज येणे यालाच वेरिकोसेल असे म्हणतात. हे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करते.

Back to top button