ऑटो- इम्युन आजार आणि कोव्हिड-19 | पुढारी

ऑटो- इम्युन आजार आणि कोव्हिड-19

डॉ. किरण गोडसे

जेव्हापासून कोरोना या जागतिक साथीचे संकट आपल्यावर ओढवले आहे, तेव्हापासून ‘रोगप्रतिकार शक्‍ती’ हा महत्त्वाचा शब्द बनला आहे. या प्राणघातक विषाणूपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणे महत्त्वाचे ठरते. मात्र, नंतर शरीरातील रोगप्रतिकार शक्‍ती अतिसक्रिय होऊन, तसेच तिच्या कामात दोष निर्माण होऊन ती शरीराच्याच उतींवर हल्ला चढवू लागते. या अवस्थेला ऑटो-इम्युन आजार म्हणतात. जागतिक अंदाजानुसार सुमारे 700 दशलक्ष लोक सौम्य आणि मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऑटो-इम्युन अवस्थेने ग्रस्त आहेत.

सोरायसिस, सोरिअ‍ॅटिक आर्थरायटिस, अँकिलुजिंग स्पाँडिलिटिस, र्‍हुमॅटोईड आर्थरायटिस या काही मोठ्या प्रमाणात आढळणार्‍या ऑटो-इम्युन अवस्था आहेत. यासाठी अनेक रुग्णांना इम्युनो-सप्रेसंट्स (रोगप्रतिकार शक्‍ती कमी करणारी औषधे) दिली जातात. मात्र, या औषधांमुळे रुग्णाला प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. ऑटो-इम्युन आजारांनी ग्रासलेल्या ज्येष्ठ रुग्णांना कोव्हिड-19 होण्याचा मोठा धोका आहे.  मात्र, ऑटो-इम्युन आजारांसाठी घेतली जाणारे औषधे न थांबवण्याचा किंवा त्यात खंड न पडू देण्याचा सल्ला डॉक्टर्स देत आहेत. कारण, औषधे न घेतल्यास त्यांचा आजार तीव्र स्वरूप धारण करू शकतो.

सध्याच्या परिस्थितीमुळे येणारे अतिरिक्‍त मानसिक ओझे व तणावामुळेही सोरायसिस आणि अँकिलुजिंग स्पाँडिलायटिससारख्या ऑटो-इम्युन अवस्थांसह जगणार्‍या रुग्णांना अचानक त्रास जाणवू शकतो. सध्याच्या लॉकडाऊनमुळे तसेच वातावरणातील बदलामुळे/ विमनस्कतेमुळे सोरायसिसच्या रुग्णांना तणाव किंवा नैराश्याचा अनुभव येऊ शकतो. यामुळे अवस्थेची तीव्रता अधूनमधून वाढू शकते, तर एकंदर आयुष्याचा दर्जा खालावू शकतो. या कसोटीच्या काळात रुग्णांनी आजाराच्या व्यवस्थापनाकडे सकारात्मक व सर्वांगीण द‍ृष्टिकोनासह बघायला हवे.

रुग्णांनी तणाव, मद्यपान हे निग्रहाने टाळले पाहिजे. बायोलॉजिक्सचे उपचार सुरू ठेवायचे किंवा सुरू करण्याचा निर्णय डर्माटोलॉजिस्टने त्या-त्या रुग्णाबाबत केला पाहिजे. ऑनलाईन कन्सल्टेशनमुळे रुग्णांना उपचार सुरू ठेवण्यात किंवा डॉक्टरांचा सल्ला पाळण्यात उपयोग होऊ शकतो. आता तर भारतीय वैद्यकीय परिषदेनेही टेलिकन्सल्टेशन अधिकृत व कायदेशीर केले आहे. 

या रुग्णांच्या हालचालींवर निर्बंध घालणार्‍या कालखंडात आयुष्याचा दर्जा खालावू नये म्हणून डॉक्टरांसोबत नियमितपणे संपर्कात राहण्याच्या गरजेवर अनेक आघाडीच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे. आज रुग्ण फोन किंवा व्हिडीओ कॉलद्वारे टेलिकन्सल्ट करू शकतात.

सोरायसिस आणि अँकिलुजिंग स्पाँडिलायटिससारख्या काही ऑटो-इम्युन आजारांमध्ये इंजेक्शन्सच्या माध्यमातून औषधे घेण्यासाठी डॉक्टरांना नियमित भेटणे आवश्यक असते. हे रुग्ण औषधे स्वत:च्या स्वत: घेऊ शकत नाहीत किंवा लॉकडाऊन आहे म्हणून उपचार दीर्घकाळ लांबवूही शकत नाहीत. त्यांनी न घाबरता डॉक्टरांना भेटावे. कारण, बहुतेक वैद्यकीय आस्थापनांमध्ये नीट खबरदारी घेतली जात आहे. रुग्णांनी मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड वापरावे तसेच स्वत:सोबत हँड सॅनिटायझर ठेवावे. लॉकडाऊननंतरच्या काळात अँकिलुजिंग स्पाँडिलायटिस आणि सोरिअ‍ॅटिक आर्थरायटिसचे निदान होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यापैकी बहुतेकांना जाणवणारी लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हालचालींवर आलेले निर्बंध, ‘वर्क फ्रॉम होम’साठी घरातील खुर्च्यांवर दीर्घकाळ बसून राहणे यामुळे अनेकांमध्ये पाठदुखी खूप वाढली आहे. यामुळे अनेकांना बर्‍याच काळापासून सतावणार्‍या पाठदुखीची व सांधेदुखीची प्रकर्षाने जाणीव होत आहे. 

सध्याच्या काळात हालचालींवर आलेल्या बंधनांमुळे व्हिडीओ कन्सल्टेशन रुग्णांसाठी अधिक सोयिस्कर ठरू शकते. टेली/व्हिडीओ कन्सल्टेशनपूर्वी रुग्णांनी त्यांचे रिपोर्ट डॉक्टरांना पाठवावे. सर्व प्रश्‍न तयार ठेवावेत जेणेकरून अत्यावश्यक निरीक्षणाने उपाय सुचवता येतील. रुग्णांनी साथीच्या रोगाचा परिणाम त्यांच्या पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या अवस्थेवर होऊ देणे टाळले पाहिजे आणि निरोगी आयुष्य जगण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

Back to top button