‘एक्झिमा’  त्वचाविकार आणि आयुर्वेद | पुढारी | पुढारी

‘एक्झिमा’  त्वचाविकार आणि आयुर्वेद | पुढारी

डॉ. आनंद ओक

विविध कारणांच्या प्रतिक्रिया म्हणून त्वचेचा दाह होतो, ज्यामुळे त्वचा लाल होऊन त्याजागी सूज येते. बारीक पुटकुळ्या येतात. त्यातून रक्‍तस्राव येऊ लागतो. नंतर खपली धरते व ती पडून गेल्यावर डाग राहतो अशा त्वचाविकारास एक्झिमा असे म्हणतात.

काहीवेळा हा एक्झिमा त्वचाविकार अचानक उत्पन्‍न होणारा असतो व कालांतराने बरा होतो. काही वेळा मात्र हा वारंवार होऊन त्या जागेची त्वचा अधिक जाड व गडद रंगाची होते.

एक्झिमाची कारणे – काही वेळा बाह्य कारणांमुळे तर काही वेळा शरीरांतर्गत दोषाने होतो. काही रुग्णांत दोन्हीही कारणे आढळून येतात.

एक्झिमाचे प्रकार – कॉन्टॅक्ट डर्माटायटिस – काही वेळा एखाद्या गोष्टीच्या अ‍ॅलर्जीमुळे निर्माण होणारा असतो. काहीवेळा त्वचेला हानी करू शकणारी अ‍ॅसिड, अल्कली सारख्या पदार्थांच्या परिणामी होणारा असा हा प्रकार आहे.

अ‍ॅलर्जिक ठरणारे पदार्थ – लिपस्टिक, विविध क्रीम्स, केसांचे रंग, कुंकू, डीओडरंट, अत्तराचे स्प्रे, प्लास्टिकच्या चपला किंवा बूट, प्लास्टिक बॅगा, रबराचे बूट, चप्पल, ग्लोव्हज, घड्याळाचा पट्टा, कानातले टॉप्स, ज्वेलरी, नेकलेस, विशिष्ट कपड्यांमधील केमिकल्स, रंग, साबण, साबण पावडर, डिटर्जंट, विविध रंग.

लक्षणे – या पदार्थांचा शरीरावरील ज्या जागेशी संपर्क येतो तेथील त्वचेवर दाह होणे, सुजणे, पुरळ येणे त्यातून स्राव येणे, कालांतराने खपली धरणे हे त्रास होतात.

अ‍ॅटोपिक डर्माटायटिस – मुरलेल्या स्वरूपाचा चिवट वारंवार होणारा हा त्वचाविकार आहे. खाजणे, आग होणे आणि त्वचा जाड होणे या मुख्य तक्रारी जाणवत असतात. प्रत्येक वयात स्वरूप बदलत असते. नवजात शिशूमध्ये चेहर्‍यावर, रांगणार्‍या बाळात गुडघ्यावर पुटकुळ्या येतात. त्याचा दाह होऊन खाजवत असते. कालांतराने त्यातून स्राव येतात. नंतर खपल्या धरतात. काही दिवसांनी हा प्रकार पाठीवर, सर्वांगावर पसरतो. याच्याच जोडीला त्वचा कोरडी होऊन डोक्यातून कोंडा जाणवतो. सुमारे 50 टक्के मुलांच्यात हा प्रकार वयाच्या 18 महिन्यांपर्यंत बरा होतो. मोठ्या शिशूंमध्ये कोपर, गुडघ्यावर, मानेच्या कडेच्या भागावर, मनगट व घोट्यावर त्वचेमध्ये असाच बिघाड होऊन कालांतराने त्वचा जाडसर होते.

तारुण्यावस्थेत त्वचेची अशीच तक्रार वाढत जाते. काहीजणांत वृष्णत्वचा, योनीभाग, स्तनाग्रे या ठिकाणी एक्झिमा होऊन त्वचा जाडसर होते. सर्वसाधारणपणे या रुग्णात एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असणे, त्वचा कोरडी असणे, विशिष्ट आहार सहन होत नसणे असे स्वरूप काही वेळा आढळते.

काही वेळा या त्वचेवरील जाडसर पॅचेसमधे जंतूसंसर्ग होऊन खाजणे खूपच वाढते आणि त्वचेवर चिरण्या पडणे, कोंडा धरणे, फोड येणे, पू असणार्‍या पुटकुळ्या येणे असा त्रासही होत असतो.

कोरडी व अतिसंवेदनशील त्वचा असणार्‍या व्यक्तीस हा त्रास अतिथंडी, लोकरी कपडे आणि मानसिक तणावाने वाढत असतो. अनेकदा अ‍ॅलर्जिक सर्दी अथवा दमा हे आजार या कुटुंबांत आढळून येतात, तसेच जंतुसंसर्ग सहजपणे वारंवार होत असल्याचे आढळत असते.

एक्झिमाचे इतर प्रकार – शरीराच्या त्वचेवर एखाद्या ठिकाणी वारंवार सतत घर्षण होणे किंवा खाजणे या कारणांनी त्वचाबिघाड होऊन सतत खाजवण्याची प्रवृत्ती होते. मानेच्या मागील बाजूस, घोट्यावर, मांडीच्या आतील भागास हाताच्या कोपर्‍याकडील भागास किंवा जननेंद्रियांना खाजवण्याची प्रवृत्ती होत असते. काही रुग्णात नाण्याच्या आकाराचा चट्टा उत्पन्‍न होतो. विशेषत: थंडीत उत्पन्‍न होऊन तीव्र खाज होत असते.

काही रुग्णांत इतर कारणांनी किंवा ऑपरेशनच्या जखमेत जंतुसंसर्ग होऊन स्राव येत असतो. या स्रावाच्या संपर्काने जखमेशेजारील त्वचेवर एक्झिमा उत्पन्‍न होत असतो.

व्हेरिकोजव्हेन्स – पायावरील अशुद्ध रक्‍तवाहिन्या फुगलेल्या राहण्याच्या म्हणजेच ‘व्हेरिकोजव्हेन्सश’च्या आजारात घोट्यावर किंवा पायावर सूज येते. त्यावर होणार्‍या घर्षणामुळे अथवा आघातामुळे त्वचा खाजणे, पुरळ येणे, त्वचा काळसर व जाड होणे, काही वेळा जखमा होणे, त्यातून स्राव होणे, पाय दुखणे या तक्रारी उत्पन्‍न होतात. हादेखील एक्झिमाचाच प्रकार असतो.

एक्झिमावरील उपचार – एक्झिमा झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्वचाविकारतज्ज्ञांकडून विविध रासायनिक क्रीम्स, मलम लावण्यासाठी दिले जातात. एक्झिमाची नुकतीच सुरुवात असेल, तर यांनी आरामही मिळतो. आजारात जंतुसंसर्ग झाला असेल, प्रमाण जास्त असेल अशावेळी स्टेरॉईडस, अ‍ॅन्टिबॉयोटिक्स दिली जातात. काहीजणांना त्याचा उपयोग होतो. परंतु, एक्झिमाचा त्रास वारंवार होत असल्यास, आजार पसरलेला असल्यास आयुर्वेदिय उपचारांनी निश्‍चितपणे चांगला आराम मिळतो.

आयुर्वेदिय उपचार करतांना रुग्णाची सखोल माहिती घेऊन रक्‍तशुद्धी करणारी दोषशमन करणारी, सूज घालवणारी, जाड त्वचा कमी होण्यासाठी लेखन करणारी, तसेच त्वचेवर पडलेले डाग कमी होण्यासाठी त्वचा प्रसाधन करणारी अशी संयुक्‍त औषधेदेखील वापरावी लागतात. त्याच्याच जोडीला आजार पुन्हा पुन्हा होऊ नये, यासाठी तसेच प्रतिकार शक्‍ती वाढविणारी अशी औषधेदेखील वापरली जातात. पोटातून घेण्याची औषधे आणि त्वचेवर लावण्यासाठी तेल अथवा मलम द्यावे लागते. आजाराचे प्रमाण खूपच जास्त असल्यास पंचकर्म उपचारांनी शरीरशुद्धी करावी लागते.

बाह्य उपचार – करंज, निंब, तुळस, बाहवा, निर्गुडी, चालमोगरा, कुमारी, आवळा इ. नी सिद्ध केलेले तेल अथवा मलम वापरले जाते. वंग, कज्जली, गंधक, कर्पुर यांचाही उपयोग केला जातो. 

पोटातून औषधे – सारीवा, मंजिष्ठा, त्रिफळा, खदिरे, निंम्ब, हरिद्रा, वरूण, कांचनार, निर्गुडी, अतिविखा, रसांजन, चंदन, रक्‍तचंदन, गुगूळ, चक्रमर्द, बावची, चोपाचिनी, मुस्ता इ. वनस्पतीज औषधींपासून तसेच वंग, त्रिवंग, गंधक, कज्जली, रमामाणिक्य इ. खनिज औषधीपासून केलेली संयुक्‍त औषधे रुग्णांच्या प्रकृतीनुसार वापरली जातात.

हे उपचार घेताना अ‍ॅलर्जिक ठरणारे पदार्थ अथवा वस्तूंचा संपर्क कटाक्षाने टाळणे, शरीरस्वच्छता, नित्यस्नान, मऊ सुती कपड्यांचा वापर तसेच अतिथंडी अथवा अतिऊन यापासून काळजी घेणेही महत्त्वाचे असते, तसेच खाजणे, आग होणे इ. तक्रारी बंद झाल्यावरदेखील लगेच औषधे न थांबवता त्वचा पूर्ण नॉर्मल होईपर्यंत वैद्याच्या सल्ल्याने औषधे चिकाटीने चालू ठेवणेही अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

Back to top button