हिरड्यांमधून रक्‍तस्राव होतोय? | पुढारी | पुढारी

हिरड्यांमधून रक्‍तस्राव होतोय? | पुढारी

डॉ. प्राची हेंद्रे

मौखिक आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे असून निरोगी आयुष्याकरिता दातांची निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दात दुखण्याची समस्या घेऊन येणार्‍या जवळपास  70 टक्के रुग्णांना दात व्यवस्थित न घासल्यामुळे तसेच दातांची योग्य निगा न राखल्याने हिरड्यांमधून रक्‍तस्राव होण्यासारख्या समस्या उद्भवतात. 

हिरड्यांमधून रक्‍तस्राव होण्याच्या इतर कारणांमध्ये स्त्रियांमध्ये होणारे हार्मोनल बदल, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि रक्‍तातील साखरेची अनियंत्रित पातळी यांचा समावेश आहे. याकरिता दात घासण्याचे योग्य तंत्र जाणून घ्यावे. दर सहा महिन्यांनंतर दंतचिकित्सकास भेट द्यावी, तसेच हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळे खावीत. हिरड्यांमधील रक्‍तस्राव, पेरीओन्डोटायटिस आणि दात किडणे यासारख्या दातांच्या समस्या सामान्यत: लोकांमध्ये दिसून येतात. बरेच लोक दात घासण्यासाठी चुकीचे तंत्र, चुकीचे ब्रश वापरून, खूप जोरजोरात दात घासतात किंवा अगदी हळूवारपणे दात घासतात, तर काही जण दोन्ही बाजूंनी दात घासत नाहीत किंवा खूप वेळ दात घासणे अथवा अगदी कमी कालावधीतच दात घासतात. यामुळे दाताच्या आतील पृष्ठभागात पोकळी निर्माण होणे, कीड लागणे आदी समस्या उद्भवतात.

मधुमेह असलेल्या लोकांना मौखिक आरोग्य समस्येचा धोका असतो. अनियंत्रित मधुमेहामुळे पांढर्‍या रक्‍तपेशी कमजोर होतात. त्यामुळे हिरड्यांमधून रक्‍तस्राव होतो. 

निरोगी हिरड्यांसाठी पालेभाज्या आणि फळांचा आहार हवा –

आपल्या आहारात बेरीज, किवी, सफरचंद, नासपती, बेरी, संत्री, क्रॅनबेरी आणि गाजर, पालक, ब्रोकोली आणि पालेभाज्यांचा समावेश करा. आपल्या हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दर 6 महिन्यांनंतर दंतचिकित्सकास भेट द्यावी.

Back to top button