वेळीच ओळखा पक्षाघात | पुढारी | पुढारी

वेळीच ओळखा पक्षाघात | पुढारी

डॉ. शिरीष हस्तक

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पक्षाघाताला (स्ट्रोक) आयतेच आमंत्रण मिळतेय. जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने या आजाराला कसं दूर ठेवता येऊ शकतं, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायामाने आपण पक्षाघाताचा धोका कमी करू शकतो. दररोज 30 मिनिटे व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. यामुळे जीवनशैलीत सुधारणा होऊन पक्षाघात टाळता येऊ शकतो.

जेव्हा मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या रक्‍तवाहिन्यांमध्ये रक्‍ताची गुठळी निर्माण झाल्याने अडथळे निर्माण होतात, तेव्हा मेंदूच्या त्या भागावरील नियंत्रण जाते. अगदी थोड्या काळासाठी तरी ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडला, तरी मेंदूतील पेशी मरू लागतात. एकदा प्राणवायूच्या कमतरतेमुळे पेशी मरायला लागल्या की, मेंदूच्या त्या विशिष्ट भागावरील नियंत्रण कमी होते. त्यामुळे पक्षाघाताचा झटका येतो. 

दोन प्रकारचे स्ट्रोक आहेत, ज्यामध्ये मेंदूचा एक भाग रक्‍तप्रवाह गमावतो, तर दुसरा एक रक्‍तस्राव ज्यामध्ये रक्‍तस्राव रुग्णाच्या मेंदूतून होतो. पक्षाघाताचं पटकन निदान होणं गरजेचं आहे. कारण, पक्षाघात हे मृत्यूचे कारण ठरू शकते. याशिवाय रुग्णाला कायमस्वरूपी अपंगत्वाचा सामना करावा लागतो. उच्च रक्‍तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह असलेल्या लोकांना पक्षाघाताचा धोका सर्वांधिक असतो. त्याचप्रमाणे धूम्रपान केल्यामुळेही पक्षाघाताचा धोका संभवू शकतो.

पक्षाघाताचा झटका आलेल्या व्यक्‍तीचे आयुष्य वाचवण्यासाठी वेळेवर निदान आणि त्वरित उपचार करणं आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णावर उपचार हे त्यांच्या वैद्यकीय स्थितीनुसार भिन्‍न असू शकतात. रुग्णांची स्थिती लक्षात घेऊन काय उपचार द्यावेत, हे डॉक्टर ठरवतात. सुरुवातीच्या काळातच म्हणजे गोल्डन अवरमध्ये उपचार झाल्यास ब्रेन स्ट्रोकचा (पक्षाघात) आलेला रुग्ण बरा होऊ शकतो. याशिवाय चांगली जीवनशैलीसुद्धा पक्षाघाताचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. व्यायामाने पक्षाघाताचा धोका टळू शकतो. त्यासाठी,

–  दररोज व्यायाम केल्याने रक्‍तदाब नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. उच्च रक्‍तदाब हा पक्षाघाताचा (स्ट्रोक) धोका वाढवणार्‍या घटकांपैकी एक आहे. त्यामुळे पक्षाघात होण्यापासून रोखण्यासाठी रक्‍तदाब नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. इतकंच नाही, तर नियमित व्यायाम केल्यास लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहसुद्धा टाळता येऊ शकतो. अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे, की व्यायामामुळे अनेक आजारांना दूर ठेवता येऊ शकतं.

– नियमित व्यायाम केल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढते. दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी व्यायाम करावा. मुळात, आपल्याला आठवड्यातून पाच वेळा व्यायाम करणे आवश्यक आहे. आपले शरीर परवानगी देत असेल, तरच आपण जोरदार व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र, अतिरिक्‍त व्यायाम करणं टाळावेत. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

– चालणे, धावणे, एरोबिक्स करणे, पोहणे, सायकल चालविणे किंवा आपल्या आवडीच्या कोणत्याही गोष्टी करा, जे आपल्याला आपल्या स्नायू आणि हाडांचे आरोग्य बळकट करण्यास मदत करेल. अगदी घरगुती कामे करणंसुद्धा एकप्रकारचा व्यायाम आहे. नृत्य हा आणखी एक पर्याय आहे. यामुळे वजन नियंत्रण ठेवू शकतो.

– पक्षाघाताचा झटका आलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायामाची निवड करा. आपण एक फिटनेस ट्रेनरसुद्धा ठेवू शकता. जो आपल्याला योग्यपद्धतीने व्यायाम करणं मदत करू शकतो.

– नियमित व्यायामाबरोबरच संतुलित आहार घेणंही आवश्यक आहे. याशिवाय धूम्रपान व मद्यपानाचे व्यसन करणं टाळावे. कारण, पक्षाघातामुळे जीवघेणे परिणाम रुग्णाला सहन करावे लागतात. बर्‍याच लोकांना पक्षाघाताबद्दल माहिती नसते. त्यामुळे लोकांना याबद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून पक्षाघात वेळीच लक्षात आल्यास रुग्णावर तातडीने उपचार होऊन तो बरा होऊ शकतो.

Back to top button