पोस्ट कोव्हिड सिंड्रोम | पुढारी | पुढारी

पोस्ट कोव्हिड सिंड्रोम | पुढारी

डॉ. अनिल मडके

ज्यांना पूर्वीपासून दमा, सीओपीडी, इंटेस्टिनल लंग डिसीज असे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ज्यांना पूर्वी हार्टअटॅक होऊन गेलेला आहे किंवा Angioplasty, Bypass झाली आहे, अशा रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड सिंड्रोम जास्त प्रमाणात आढळतो.

कोव्हिड आपल्याला फार जवळून पाहायला मिळाला; पण ज्यांना कोव्हिडचा संसर्ग झाला किंवा ज्यांच्या कुटुंबीयांना कोव्हिडची लागण झाली, त्यांना खर्‍या अर्थाने कोव्हिड काय असतो, हे व्यवस्थित समजले. ज्यांना कोव्हिड झाला नाही, त्यांना त्याची तीव्रता समजणे थोडे कठीणच. एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊन गेली आणि आता थोडे मजेत आनंदात जगावे असा विचार त्याच्या मनात येत असेल, तर सुमारे दहा टक्के व्यक्तींच्या बाबतीत हा विचार लगेच फलद्रूप होतो असे नाही. कारण, अशा व्यक्तींना अनेक शारीरिक त्रास असतात, तक्रारी असतात. कोव्हिडनंतरच्या या तक्रारींचे स्वरूप भिन्न असते. रुग्णांच्या मनात गोंधळ निर्माण होतो की आपण कोणत्या तज्ज्ञाकडे जावे? जावे की नको की या तक्रारी आपोआपच कमी होतील, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. कोव्हिडनंतरच्या या वेगवेगळ्या लक्षण समूहाला ‘पोस्ट कोव्हिड सिंड्रोम’ किंवा ’लाँग कोव्हिड 19’ असे म्हटले जाते. थोडक्यात, कोव्हिडमधून रुग्ण बरे झाल्यानंतर काही आठवडे किंवा काही महिने म्हणजे अगदी सहा महिन्यांपर्यंत राहणारा वेगवेगळ्या लक्षणांचा समूह म्हणजे ‘पोस्ट कोव्हिड सिंड्रोम’ होय.

पोस्ट कोव्हिड सिंड्रोमची लक्षणे –

हा लक्षणांचा समूह असल्याने तक्रारींचे स्वरूप भिन्न असते. सर्वात प्रमुख तक्रार म्हणजे प्रचंड थकवा येतो. अशक्तपणा येतो. काहीही करायची इच्छा होत नाही. काही वाचन करावे, शांत बसावे, टीव्ही पाहावा यात कशातच मन रमत नाही. दुसरी प्रमुख तक्रार म्हणजे श्वास घेण्याचा त्रास. दम लागणे, धाप लागणे, छातीत दुखणे, कोरडा खोकला येणे, छातीत धडधडणे अशा तक्रारी असतात. पाठीत दुखणे, छातीत किंवा पाठीत मुंग्या येणे, सांधे दुखणे आणि अंग दुखणे, डोके दुखणे, डोके गच्च होणे, कामात एकाग्र होण्याची क्षमता कमी होणे, स्मरणशक्ती काहीशी कमी होणे अशाही तक्रारी आढळतात. झोप न लागणे, चव न लागणे, वास न येणे, अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे, केस गळणे अशी लक्षणे काही रुग्णांमध्ये आढळतात. 

पोस्ट कोव्हिड सिंड्रोम कुणाला?

ज्या व्यक्तींना  कोरोनाचा तीव्र संसर्ग झाला किंवा ज्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले, ज्यांना ‘एआरडीएस’  (अक्यूट रेस्पायटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) किंवा ALI अक्युट लंग इंज्युरी झाली, ज्यांना व्हेंटिलेटर किंवा HFNO (हाय फ्लो नेजल ऑक्सिजन) ची गरज भासली, ज्यांना मल्टिसिस्टीम किंवा मल्टिऑर्गन फेल्युअर झाला अशा रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड सिंड्रोमची शक्यता अधिक असते. जे रुग्ण वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले नाहीत किंवा घरीच उपचार घेतला, अशा रुग्णांतही या तक्रारी आढळल्या. ज्यांना कोरोना होतो त्यापैकी साधारण 70ते 80 टक्के लोकांमध्ये सौम्य आजार असतो. 10 ते 15 टक्के लोकांना मध्यम स्वरूपाचा आजार असतो आणि  5 ते 10 टक्के लोकांना तीव्र आजार होतो. तीव्र न्युमोनिया, तीव्र जंतुसंसर्ग, तीव्र एआरडीएस अशा आजारांना सामोरे जावे लागते. व्हेंटिलेटरची गरज अशा लोकांना लागते. एकूण दहा टक्के व्यक्तींना कोव्हिड सिंड्रोम होतो.

जोखमीचा गट –

50 पेक्षा अधिक वय असलेले रुग्ण, ज्यांना पूर्वीपासून दमा, सीओपीडी, इंटेस्टिनल लंग डिसीज असे दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ज्यांना पूर्वी हार्टअटॅक होऊन गेलेला आहे किंवा Angioplasty, Bypass झाली आहे, अशा रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड सिंड्रोम जास्त प्रमाणात आढळतो.  स्थूल व्यक्ती,  तंबाखू खाणारे, धूम्रपान, मद्यपान करणार्‍या व्यक्तींतही पोस्ट कोव्हिड सिंड्रोम आढळतो. जेव्हा एखाद्याला कोरोनाची लागण होते आणि त्यानंतर हॉस्पिटलमधून घरी जाताना पुढे काही महिने उपचार घेणे हे फार महत्त्वाचे. हा कालावधी दोन महिने, तीन महिने, सहा महिने असा असू शकतो. रक्त पातळ राहण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गोळ्या सलगपणे घ्याव्या लागतात. अनेक रुग्णांनी हॉस्पिटलमधून घरी गेल्यानंतर थोडे दिवस औषधे घेऊन औषधाकडे पाठ फिरवली, त्यांना हे परिणाम जास्त भोगावे लागले आहेत. 

ज्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते, व्हेंटिलेटर लावावा लागतो तेव्हा त्या ठिकाणी, त्या आयसीयूमध्ये इतर रुग्णही दाखल असतात. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ताण रुग्णाला येतो. मानसिक धक्का बसू शकतो आणि नैराश्य येऊ शकते. हे नैराश्य दीर्घकाळ राहू शकते. पोस्ट कोव्हिड सिंड्रोममधील सायकॉलॉजिकल स्ट्रेस – मानसिक तक्रारी गंभीर असतात. त्यावर उपचार, समुपदेशन, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. कुटुंबातील व्यक्तींनी, मित्रांनी वातावरण सतत सकारात्मक राहील, अशी काळजी घ्यावी. रुग्णाला कुटुंबीयांनी सतत मोटिव्हेट करत राहणे महत्त्वाचे असते.

पोस्ट कोव्हिड सिंड्रोमची तीव्रता

पोस्ट कोव्हिड सिंड्रोमची तीव्रता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर काही तपासण्या करतात. प्राथमिक तपासणी म्हणजे छातीचा एक्सरे. त्यावरून पल्मोनरी फायब्रोसिसचा अंदाज येतो.  छातीच्या एचआरसीटीवरून फुफ्फुसात कोणते आणि किती बदल झालेले आहेत, फायब्रोसिस झाला आहे का, त्याची तीव्रता किती आहे, याचा अंदाज येतो. पोस्ट कोव्हिड सिंड्रोम आहे का, याचे निदान करून उपचार करून घेणे महत्त्वाचे. कोरोनावरील उपचार झाल्यानंतरही कोरोनाचा आजार पूर्ण संपलेला नसतो. पोस्ट कोव्हिड सिंड्रोमचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपली औषधे पूर्ण घ्यावीत. ऑक्सिजनची पातळी नॉर्मल ठेवावी. पल्मोनरी फंक्शन टेस्ट ही फुफ्फुसांची क्षमता मोजण्याची चाचणी करून घ्यावी. सिक्स मिनिट वॉक टेस्ट या सोप्या चाचणीमुळे फुफ्फुसाच्या क्षमतेचा अंदाज येऊ शकतो.

पोस्ट कोव्हिड रुग्णांनी घ्यावयाची काळजी –

पुरेशी विश्रांती घ्यावी. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यासाठी  प्राणायाम करावा. कोमट पाणी जास्त प्रमाणात प्यावे. अर्थात, ज्यांना मूत्रपिंडाचा विकार असेल, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आहार ताजा, सकस घ्यावा. पालेभाज्या, फळभाज्या भरपूर प्रमाणात घ्याव्यात. प्रथिनांसाठी मोड आलेली धान्ये वापरावीत. पुरेशी विश्रांती, पुरेशी झोप महत्त्वाची. कुटुंबात सकारात्मक, खेळीमेळीचे वातावरण असणे गरजेचे. रुग्णांना मानसिक आधार देणे, सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णांनी वाचन, संगीत यात मन रमवावे. शारीरिक स्थिती उत्तम असेल, तर व्यायाम करावा. ताजी बातमी अशी, की इंग्लंडहून येणार्‍या फ्लाईटवर बंदी आली आहे. कारण, तिथला कोरोनाचा विषाणू सत्तर पट अधिक सक्षम आहे आणि तो त्याच पटीने वाढतो असे आढळले आहे. अजून आजूबाजूला कोरोना आहे.  यासाठी सामाजिक सुरक्षित अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळणे महत्त्वाचे. चांगल्या मास्कचा वापर योग्य रीतीने करावा. हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत. अनोळखी ठिकाणी स्पर्श टाळावा. चेहर्‍याला, नाकाला, डोळ्यांना, तोंडाला (टच एरिया) वारंवार स्पर्श न करणे महत्त्वाचे आहे. गर्दीची ठिकाणे टाळावीत. सामाजिक आणि वैयक्तिक सुरक्षिततेची लस मनाला टोचून घ्यावी आणि कोरोनापासून दूर राहावे.

Back to top button