कोव्हिड चाचण्या महत्त्वाच्याच! | पुढारी | पुढारी

कोव्हिड चाचण्या महत्त्वाच्याच! | पुढारी

डॉ. भारत लुणावत

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत प्रामुख्याने सध्या तीन प्रकारचे रुग्ण समोर येत आहेत. यात सर्वाधिक संख्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यातून ते बरे होत आहेत. मात्र गंभीर लक्षण असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन आणि रुग्णालयात भरती होण्याची गरज भासत आहे. काही रुग्णांच्या अन्य अवयवांचे देखील नुकसान होत आहे. उपचाराची दिशा अचूक राहावी आणि रुग्ण लवकर बरा व्हावा यासाठी काही चाचण्या करण्याचा सल्‍ला डॉक्टरांकडून देण्यात येतो.  त्यांविषयी…

एचआरसीटी/सीटी स्कॅन

दुसर्‍या लाटेत एचआरसीटी (हाय रिझोल्युशन कंप्युटेड टोमोग्राफी) चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. गंभीर रुग्णांना ही चाचणी करणे आवश्यकच आहे. एचआरसीटी ही फुफ्फुसाची स्थिती सांगते. या चाचणीची रीडिंग ही कोव्हिड रिपोर्टिंग अँड डेटा सिस्टिम्स स्कोर आणि सीटी स्कोरच्या आधारावर नोंदली जाते. एचआरसीटीचा सीटी स्कोर हा फुफ्फुसाची स्थिती सांगतो. ज्या रुग्णांत न्यूमोनियाचे गंभीर लक्षणे आहेत, त्यांच्यासाठी एचआरसीटी स्कोर महत्त्वाचा आहे. सीटी स्कॅन चाचणी ही कोव्हिडमुळे झालेल्या न्यूमोनियाचे किरकोळ, माध्यम आणि गंभीर श्रेणीत वर्गीकरण करण्यास मदत करतो. त्याचा रिझल्ट आजार रोखण्यास महत्त्वाचा ठरतो. विशेषत: ज्या रुग्णांत रिकव्हरी दिसत नाही, अशा रुग्णांसाठी हा स्कोर महत्त्वाचा आहे. अर्थात एचआरसीटी/ सीटी स्कॅनमध्ये एक्सरेचे रिझोल्यूशन तीव्र असल्याने सतत एचआरसीटी करणे देखील धोकादायक आहे. जर लक्षणे गंभीर नसतील तर डॉक्टर छातीचा एक्स रे  सांगतात. 

सीटी स्कॅन

 रुग्णात कोव्हिडची गंभीर लक्षणे असतील तरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा.

 आरटीपीसीआरची चाचणी निगेटिव्ह असेल, परंतु कोरोना संसर्ग किंवा न्यूमोनियाची लक्षणे सतत दिसत असतील तर…

 रुग्णांची स्थिती अधिक गंभीर असेल आणि त्याची ऑक्सिजन पातळी 90 च्या खाली जात असेल तर…

 जेव्हा रुग्णाच्या छातीत दुखत असेल आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असेल तर…

गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांची सिटी चेस्ट केल्यास संसर्गाची तीव्रता कळण्यास मदत मिळते. त्यामुळे वेळेवर उपचार करणे शक्य होते. परंतु सीटी स्कॅन करायचे की नाही, हे डॉक्टर ठरवतात. कोव्हिडची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांत स्टेरॉईडसारख्या औषधांचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्याअगोदर डॉक्टरांना कोरोनाची तीव्रता जाणून घेणे अत्यावश्यक राहते. त्याने फुफ्फुसात लहानातील लहान निमोनिक पॅच आणि आजार कोणत्या टप्प्यावर आहे, हे समजते. 

अन्य चाचण्या

सीआरपी चाचणी : सीआरपी (सी रिएक्टव्ह प्रोटीन) चाचणी ही शरिरातील संसर्ग समजण्यासाठी महत्त्वाची आहे. या चाचणीने आजाराचे स्टेटस करते. सी-रिएक्टिव्ह प्रोटीन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. हे प्रोटीन लिव्हर तयार करते. कोणतेही व्हायरल किंवा बॅक्टोरियलच्या संसर्गाच्या स्थितीत रक्‍तात सीआरपीचे प्रमाण वाढते. परंतु ज्यांना सतत खोकला, डोकेदुखी यासारखा त्रास होत असेल तर त्यांनी ही चाचणी करायला हवी. 

डी-डीमर चाचणी : ही रक्‍तातील क्लॉटिंगच्या स्थितीची माहिती सांगते. प्रत्यक्षात डी-डीमर प्रोटीनचा एक तुकडा असतो. शरीरात जेव्हा ब्लड क्लॉट तयार होऊ लागतो, तेव्हा डीमर प्रोटीन तयार होऊ लागते. अशावेळी डी-डीमरची पातळी शरीरात वाढते. प्रत्यक्षात कोरोना संसर्ग हा जेव्हा फुफ्फुसात प्रवेश करतो, तेव्हा तो रक्‍ताला हळूहळू घट्ट करू लागतो. त्यामुळे ब्लड क्लॉटिंगच्या समस्येचा शोध लागतो.

इंटर ल्यूकिन-6 (आयएल-6) चाचणी

ही एक प्लाझ्मा चाचणी आहे. या चाचणीच्या माध्यमातून शरीरातील संसर्गाची पातळी कितपत आहे, याचा शोध लागतो. हा एक इन्फ्लेमेशनचा मार्कर आहे. कोरेानाबाधिताच्या शरीरात सायटोकाइन स्टॉर्म तयार होतो आणि ते रुग्णांत मल्टी ऑर्गन फेल होण्याचे देखील कारण ठरू शकते. प्रत्यक्षात इम्यून सिस्टिमला व्हायरसचा शोध लागताच ते त्या चांगल्या पेशींचा बचाव करण्यासाठी सायटोकाइनला बाधित पेशींना नष्ट करण्याचे संकेत देतात. अशावेळी इम्यून सिस्टीम ही अधिक प्रमाणात सायटोकाईन तयार करते. त्यास आपण सायटोकाईन स्टॉर्म असे म्हणतो. काहीवेळा अधिक प्रमाणात असलेल्या बाधित पेशी या चांगल्या पेशींना नष्ट करू लागतात. या चाचणीतून ही स्थिती समजण्यास मदत मिळते. 

फेरिटिन चाचणी : फेरिटिन हे एक प्रकारचे प्रोटिन आहे. ते आयरनला जोडून जमा करते. रक्‍तात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास आयरनचीं पातळी वाढू लागते. या चाचणीतून त्याची पातळी समजते.

एलडीएच : एलडीएच म्हणजेच लॅक्टेट डिहायड्रोजनेज चाचणीचा उपयोग हा बॉडी टिश्यूची हानी आणि त्याचे गांभीर्य समजण्यासाठी केली जाते.  नॉर्मल रेंज 0-250 यू/एल आहे. 

इएसआर : संसर्गाच्या काळात रक्‍तात प्रोटीनचे प्रमाण वाढते. त्यामुळे आरबीसी (लाल  पेशी) चे प्रमाण वाढते. कालांतराने आरबीसी वेगाने स्थिर होऊ लागते. जेव्हा शरीरात असे बदल होतात, तेव्हा इएसआरची पातळी वाढते. त्याची नॉर्मल रेंज 0.22 एमएम/ प्रतितास असते.

Back to top button