कोरोना काळात काय टाळायचे? | पुढारी | पुढारी

कोरोना काळात काय टाळायचे? | पुढारी

डॉ. संजय गायकवाड

कोरोनाचे विषाणू फुफ्फुसावर तीव्र हल्‍ला करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात श्‍वसनप्रक्रिया सक्षम राहील याची खबरदारी घ्यायला हवी. आपल्या खानपानाच्या सवयी बदलाव्या लागतील. फुफ्फुसाला मारक ठरतील, अशा सवयींपासून आपण बचाव करायला हवा.

कोरोनाची दुसरी लाट घातक ठरली आहे. संसर्ग शक्‍तिशाली असून तो शरीरातील संवेदनशील अवयवांवर जोरात हल्ला करत आहे. त्याचे सर्वाधिक दुष्परिणाम फुफ्फुसावर होत असल्याचे आढळून आले आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे लक्षण स्पष्ट होईपर्यंत त्याने फुफ्फुसाचे 25 टक्के नुकसान केलेले असते. त्यामुळे फुफ्फुस चांगले असणे गरजेचे आहे. 

फ्रिज किंवा थंड पाणी पिऊ नका

उन्हाळ्यात थंड पाणी सर्वांनाच हवे असते. परंतु हेच थंडगार पाणी आपल्या श्‍वसन प्रक्रियेला बाधा आणू शकतात. फ्रिजचे थंड पाणी पिल्याने घसा आकुंचन पावतो आणि त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टर सामान्य किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देत आहेत. ही बाब संसर्गाच्या काळात खूपच महत्त्वाची आहे. 

सॉफ्ट ड्रिंक टाळा

कोल्ड ड्रिंक्समध्ये कोणतेही पोषक तत्त्व नसते. त्यात केवळ साखर आणि कॅलरी असतात. त्याचे प्राशन केल्याने वजन वाढते आणि पोट फुगते. कोल्ड ड्रिंक्समुळे घशात खवखव होते. तहान लागेल तेव्हा फक्‍त पाणीच प्यावे. 

गॅस्टिक भाज्या नुकसानकारक

श्‍वसनाचा आणि फुफ्फुसाचा आजार असलेल्या व्यक्‍तींना गॅस आणि ब्लोटिंगमुळे अधिक त्रास होऊ शकतो. कोबी, ब्रोकोली, मुळा आणि फ्लॉवर या भाज्या पोषक तत्त्वांनी भरलेल्या असतात आणि फायबरही खूप असते. परंतु त्याच्या सेवनाने पोटात गॅस होत असेल तर त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवावे. 

तेलकट पदार्थ टाळा

तळलेल्या पदार्थांच्या सेवनाने अ‍ॅसिडिटी होते. त्यामुळे काही वेळा श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तेलकट पदार्थामुळे लठ्ठपणा वाढतो आणि त्यामुळे फुफ्फुसावर परिणाम होतो. तेलकट पदार्थ हेल्दी नसतात. ते कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात आणि हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता राहते. 

दुग्धजन्य पदार्थाचा अधिक मोह नको

दूध हे पौष्टिक असते. त्यात कॅल्शियम असते आणि ते नेहमीच शरीराला पोषण देते. मात्र दूधात कॅसोमॉर्फिन तत्त्व असतात. ते आतड्याला हानीकारक ठरू शकतात. फुफ्फुसाचा आजार असलेल्या लोकांसाठी डेअरीचे उत्पादन चांगले नाही. कारण हे पदार्थ आजाराचे लक्षणे वाढवण्यास हातभार लावतात. त्यामुळे त्याचे कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. 

मीठ कमी खाण्याची सवय ठेवा

चटपटीत जेवण, आहार हा सर्वांनाच आवडतो. मात्र अधिक मीठ हे फुफ्फुसाला मारक ठरतात, हे लक्षात घेतले पाहिजे. मिठाने वॉटर रिटेंशनची समस्या निर्माण होऊ शकते आणि परिणामी श्‍वास घ्यायला त्रास होतो. म्हणूनच मिठाचे सेवन कमी ठेवायला हवे. अर्थात आपल्या आहारात बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. 

 

Back to top button