जेवणानंतरची पोटदुखी | पुढारी | पुढारी

जेवणानंतरची पोटदुखी | पुढारी

वैद्य विनायक खडीवाले

जेवणानंतर लगेचच पोट दुखणे म्हणजे आमाशयाला आलेले अन्‍न सहन होत नाही. ही पोटदुखी तत्कालिक असली, तर लगेचच चिमुटभर हिंगाष्टक, पाचक, लवणभास्कर किंवा ओवाचूर्ण खाऊन पाहावे. सोबत गरम पाणी किंवा ताक घ्यावे. एवढ्याने थांबले नाही, तर मग पंचकोलासव किंवा पिप्पलादि काढा चार चमचे जेवणानंतर घ्यावा. सोबत शंखवटी तीन गोळ्या किंवा प्रवाळपंचामृत तीन आणि सहा गोळ्या घ्याव्या. काही वेळा नुसत्या शंखवटी किंवा प्रवाळपंचामृत सहा गोळ्या घेऊन भागते.

पोटदुखी जुनाट असली, तर आम्लपित्तवटी 3 गोळ्या प्रवाळपंचामृत सहा गोळ्या आणि पंचकोलासव चार चमचे दोन्ही जेवणानंतर घ्यावे. रात्री त्रिफळा किंवा एरंडहरितकीचूर्ण एक चमचा घ्यावे. पोटदुखीबरोबर पातळ जुलाब, वारंवार मलप्रवृत्ती असल्यास जेवणानंतर शामनवटी, संजीवनीवटी आणि कुटजवटी प्रत्येकी तीन किंवा सहा गोळ्या घ्याव्या. 

पोटदुखीबरोबरच नेहमीची आमाशयाची तक्रार असल्यास जेवणानंतर कुटजटारिष्ट, कुटजवटी, संजीवनीवटी आणि शामनवटी घ्यावी. आमांश, चिकटा, खडा होणे ही लक्षणे पोटदुखीबरोबर असल्यास आरोग्यवर्धिनी सकाळी आणि सायंकाळी तीन गोळ्या, जेवणानंतर आम्लपित्तवटी तीन गोळ्या आणि फलत्रिकादि काढा चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावा. रात्री गंधर्वहरितकी किंवा त्रिफळाचूर्ण घ्यावे. अल्सरचा इतिहास असल्यास सकाळी आणि सायंकाळी महातिक्‍तघृत दोन चमचे घ्यावे. 

विशेष दक्षता आणि विहार आहाराचे प्रमाण कमी करावे, कोणत्या पदार्थांनी पोट दुखते, ते पदार्थ टाळावेत. जेवण सावकाश आणि चावून खावे. आवश्यक तर जेवणाच्या मध्येमध्ये योग्य ते पाचक घ्यावे. 

पथ्य : लिंबू, पुदिना, जिरे यांचा तारतम्याने वापर, तांदूळ भाजून भात, ब्राह्मी, मुगाची कमी डाळ असलेले वरण, सुकी चपाती, दुधीभोपळा, दोडका, सुरण, पडवळ, घोसाळे, कोथिंबीर, कोकम यांचा आहारात समावेश करावा. 

कुपथ्य : डालका, मिठाई, फरसाण, नवा तांदूळ, गहू, हरभरा, वाटाणा, मटार, मटकी, चवळी, वाल, पोहे, चुरमुरे, लोणचे, पापड, बेकरीचे पदार्थ, रात्री उशीरा जेवण, मांसाहार, अंडी, दारू, तंबाखू, थंड पदार्थ.

योग आणि व्यायाम : सकाळी आणि रात्री जेवणानंतर 20 मिनिटे फिरून येणे. या रुग्णांसाठीचा चिकित्साकाल एक दिवस ते तीन महिने इतका आहे. 

निसर्गोपचारांमध्ये यासाठी अननस, लघू आहार, सायंकाळी लवकर जेवण, चिमुटभर सोडा, आले, लिंबाचे रसाचे पाचक हिंग तुपावर भाजून खाणे.

संकिर्ण : पोट दुखण्याच्या कारणाकडे लक्ष देऊन पदार्थ टाळता येतात, जेवणाचा काळ बदलता येतो. दारू, तंबाखू, विडी, मशेरी, चहाचा अतिरेक, कोल्ड्रिंक, जेवणावर जेवण, कदन्‍न, शिळे अन्‍न टाळावे.  

 

Back to top button