मोड आलेली कडधान्ये का खायची? - पुढारी

मोड आलेली कडधान्ये का खायची?

मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जातात. हा अतिशय पोषक आहार मानला जातो. यामुळे शरीराला त्वरित ताकद आणि ऊर्जा मिळते. मोड आणल्यामुळे कडधान्यांची पौष्टिकता वाढते. म्हणजे कोरड्या बियांमध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जवळपास नसल्यासारखेच असते. ह्याच बिया अंकुरित केल्यास अथवा त्यांना मोड आणल्यास ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण दहापट होते.

आरोग्यसंपन्न जीवनासाठी योग्य जीवनशैली आणि पौष्टिक आहार अतिशय गरजेचा असतो. अयोग्य खाण्या-पिण्यामुळे हळूहळू आपले आरोग्य खराब होऊ शकते. बरेच जण आहाराकडे तितकेसे लक्ष देत नाहीत. आहारात फळे आणि मोड आलेल्या कडधान्यांचे प्रमाण अत्यल्प अथवा नसल्यासारखेच असते. आरोग्य संपन्न राहाण्यासाठी आहाराच्या गुणवत्तेवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. मोड आलेली कडधान्ये आरोग्यसाठी अतिशय उपयुक्त मानली जातात.

हा अतिशय पोषक आहार मानला जातो. यामुळे शरीराला त्वरित ताकद आणि ऊर्जा मिळते. मोड आणल्यामुळे कडधान्यांची पौष्टिकता वाढते. म्हणजे कोरड्या बियांमध्ये ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जवळपास नसल्यासारखेच असते. ह्याच बिया अंकुरित केल्यास अथवा त्यांना मोड आणल्यास ‘क’ जीवनसत्त्वाचे प्रमाण दहापट होते. इतकेच नाही तर मोड आणल्यानंतर कडधान्यातील शरीराला हानिकारक असणार्‍या घटकांचे प्रमाण कमी होते.

यामध्ये ऑलीगॅसेकराईझ हा प्रमुख घटक आहे. मोड आल्यानंतर भिन्न डाळीत आढळणारे स्टार्च, ग्लुकोज, हे घटक फ्रुक्टोज, माल्टोजमध्ये परिवर्तित होतात. मोड आलेली कडधान्ये खाल्ल्यामुळे अशक्तपणा आणि अनेक प्रकारचे आजार दूर होतात. त्याबरोबर शरीराचे योग्य प्रमाणात पोषणही होते. यामुळे आपली प्रतिकार शक्ती मजबूत होते. शरीरासाठी अतिशय उपयुक्त असणार्‍या अंकुरीत कडधान्यांचे आणखी कोणकोणते फायदे आहेत हे जाणून घेऊ.

* कडधान्ये म्हणजे सोयाबीन, हरभरे, मूग, मटकी इत्यादी मोड आणून खाल्ल्यास या खाद्यपदार्थांमध्ये असणार्‍या पोषक घटकांचे प्रमाण दुप्पट होते.

* मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ती सहजपणे पचवता येतात. कडधान्ये खाल्ल्यामुळे पोटासंबंधीच्या तक्रारी दूर होतात आणि पचनक्रिया मजबूत होते.

* भूक न लागण्याची समस्या असणार्‍यांनी मोड आलेली कडधान्ये खाऊन ही समस्या दूर करावी.

* मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स आणि ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘इ’ ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यापैकी अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्स नष्ट करतात. ‘क’ जीवनसत्त्व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते आणि त्याचसोबत यकृताच्या संपूर्ण कार्यप्रणालीसाठी ते गरजेचेही असते.

* फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेेशियम यासारखे पोषक घटक देखील मोड आलेल्या कडधान्यात भरपूर प्रमाणात असतात. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. तसेच लोह रक्तातील हिमग्लोबीनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करते.

* शरीर सतत निरनिराळ्या प्रकारच्या आजारांच्या वाहक जीवाणूंचे हल्ले झेलत असते. आपली रोग प्रतिकारक क्षमता मजबूूत असेल तरच हे हल्ले परतवून लावता येतात. मोड आलेल्या कडधान्यांच्या सेवनाने रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होते. म्हणजेच रोगाशी लढण्याची शक्ती वाढते.

* मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अनेक प्रकारची प्रथिने असतात. ती शरीर मजबूत ठेवण्यासाठी आणि आजारापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असतात. यामध्ये फायटो केमिकल्स असतात. यामुळे मधुमेहासोबत अन्य आजारांचा धोकाही कमी होतो.

* मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. आरोग्यबाबत आणि वजनाबाबत अधिक जागरूक असणार्‍या लोकांसाठी ही गोष्ट फायद्याची असते.

* रक्त स्वच्छ करण्यासाठी मोड आलेल्या कडधान्याची भूमिका महत्त्वाची असते.

* सोयाबीन, भूईमुगाच्या शेंगा, मका, तिळ, चणे, डाळी, इतर बिया अंकुरीत करता येऊ शकतात. धान्यामध्ये गहू, बाजरी, मूग, मटकी, हरभरे, सोयाबीन इत्यादींना सहजपणे मोड आणून त्यापासून स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवता येऊ शकतात.

कडधान्यांना मोड कसे आणावेत?

रात्री कडधान्यांना मोड आणण्याची तयारी करावी. आपल्या आवडीचे कडधान्य रात्री पाण्यात भिजवावे. एकत्र कडधान्यांची उसळ करायची असल्यास प्रत्येक कडधान्य वेगवेगळे भिजवावे. कारण त्यांचा अंकुरीत होण्याचा कालावधी वेगवेगळा असतो. शेंगदाण्याला 12 तासात मोड येतात. हरभर्‍यांना 24 तासात, गव्हाला 36 तासात मोड येतात. त्यामुळे हा काळ लक्षात घ्यावा. प्रथम धान्य चांगल्याप्रकारे धुवून घ्यावे. भांड्यात दहा-बारा तास भिजवावे.

भिजवताना धान्य पूर्णपणे बुडेल एवढे पाणी टाकावे. दहा-बारा तासानंतर पुन्हा हे धान्य चांगले धुवून घ्यावे नंतर चाळणीमध्ये उपसून स्वच्छ सुती कापडात घड्ड बांधून ठेवावे. अशा प्रकारे भिजवलेल्या धान्यासाठी मोड येण्यास 24 तास लागतात. उन्हाळ्यामध्ये बांधलेल्या कापडातून ओलावा नाहिसा होणार नाही, अर्थात ते कोरडे पडणार नाही याची काळजी घ्यावी. थोड्या थोड्या वेळाने त्यावर पाणी शिंपडावे, म्हणजे त्यात ओलावा राहिल. अलिकडे बाजारात विशिष्ट प्रकारची जाळीदार भांडी स्प्राऊट मेकर या नावाने मिळतात. त्यांचा उपयोग देखील करता येऊ शकतो.

कडधान्य चांगल्या प्रकारे अंकुरीत व्हावीत यासाठी काही नियम जरूर पाळावेत. प्रथम कडधान्य भिजवल्यानंतर पहिले पाणी काढून टाकावे. पाणी कढाल्यानंतर योग्य हवा लागणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे अंधार होय. ज्यावेळी कडधान्यांना मोड येतील तेव्हा त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कापून वरून लिंबू पिळावा.

तसेच त्यावर काळे मीठ, मिरपूड, जीरेपूड टाकून ते खावे. खरेतर मोड आलेली कडधान्ये कच्चीच खावीत. कारण शिजवल्यामुळे त्यांच्यातील पोषक घटक नष्ट होतात. मात्र ज्यांना कच्ची मोड आलेली कडधान्ये आवडत नसतील त्यांनी कुकरमध्ये एक शिट्टी येईपर्यंत ती शिजवावीत आणि मग खावीत. मोड आलेली कडधान्ये केवळ सकाळी न्याहारीच्या वेळीस खावीत.

डॉ. संजय गायकवाड

Back to top button