नीज का गं येत नाही...? 'ही' आहेत कारणे - पुढारी

नीज का गं येत नाही...? 'ही' आहेत कारणे

आपण म्हातारे किंवा वयस्कर दिसतो म्हणजे काय? तर तरुणपणी तुमची जी त्वचा असते ती बदलते. काही जणांच्या चेहर्‍यावर सुरकुत्या येतात, काहींच्या चेहर्‍यावर सुरकुत्या येत नाहीत. मात्र त्या त्वचेवरून त्या माणसाचे वय वाढले आहे, हे स्पष्टपणे जाणवते. झोप आणि त्वचा तरुण दिसणे यांचा संबंध आहे. कारण चांगली झोप ही चांगल्या आरोग्यासाठी गरजेची असते आणि आरोग्य चांगले असल्यास त्वचा चांगली दिसते. परंतु आज बदलत्या काळात शांत आणि पुरेशी झोप दुरापास्त झाली आहे.

चांगली झोप न येण्याची कारणे

1) रात्री जेवताना अनेकांना गोडधोड जेवणाची सवय असते. या गोडधोडामध्ये बासुंदीपासून केकपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश केला जातो. रात्री गोडधोड खाऊन टच्च जेवल्यावर शांत झोप मिळत नाही. गोडधोड खाल्ल्याने रात्री रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर स्ट्रेस हार्मोन्सचेही प्रमाण वाढते. परिणामी, आपण बराच वेळ जागे राहतो.

2) जेवल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची अनेकांना सवय असते. कॅफिनजन्य पदार्थ रात्री किंवा संध्याकाळी घेतल्याने आपल्या झोपेवर विपरित परिणाम होत असतो. झोपण्यापूर्वी चहा-कॉफी घेतल्यामुळे रक्तातील अ‍ॅड्रीनालाईनचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम आपला हार्ट रेट वाढण्यात होतो. परिणामी, शांत झोप येणे शक्य होत नाही.

3) अनेकांना जेवणाआधी तसेच जेवणादरम्यान व जेवणानंतर एनर्जी ड्रिंक्स घेण्याची सवय असते. अशा पेयांमधील कॅफिनचे प्रमाण पाहता तुम्हाला लवकर झोप येत नाही. अशा पेयांमध्ये असलेले अ‍ॅसिडस् तुम्हाला जागे ठेवतात. डोळ्यांवर येणारी झोपेची गुंगी या अ‍ॅसिडमुळे नाहीशी होते.

4) रात्री जेवताना टच्च जेवू नका. जेवल्यानंतर दोन तासांनंतर झोपा. रात्रीचे मांसाहारी जेवण जेवल्यास ते अन्न पचण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने होत असते. त्याचा परिणाम आपल्याला लवकर झोप न लागण्यात होतो.

5) रात्रीच्या जेवणात मसालेदार पदार्थ असल्यानेसुद्धा झोपेवर विपरित परिणाम होऊ शकतो.

6) अनेकांना सहा-सात वाजता नाश्ता करून रात्री दहाच्या पुढे जेवण्याची सवय असते. या सवयीमुळेसुद्धा रात्री शांत झोप मिळणे शक्य होत नाही.

7) भरपूर प्रथिने असलेला आहार घेतल्यामुळे झोपेवर परिणाम होतो. भरपूर प्रथिने असणार्‍या अन्नपदार्थांमध्ये अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असते. त्यामुळे आपल्या मेंदूतील पेशींवर परिणाम होऊन झोपेची प्रक्रिया चालू होण्यास वेळ लागतो.

8) ज्यांना झोपेची समस्या भेडसावते आहे अशांनी रात्री दारू, वाईन घेणे टाळावे. काही जण खूप थकल्यावर विरंगुळा म्हणून मद्यपान करतात. परंतु मद्यपानामुळे शरीरात अस्वस्थता निर्माण होते व तुम्हाला शांत झोप लागू शकत नाही. अल्कोहोलमुळे शरीरातील पाणी शोषून घेतले जाते. परिणामी, घशाला कोरड पडते. अशा वेळी पाणी पिण्यासाठी वारंवार उठावे लागते. याचा झोपेवर परिणाम होतो.

9) तंबाखूजन्य पदार्थांमुळे मेंदूतील पेशींना उत्तेजना मिळते. त्यामुळे झोपण्यापूर्वी धूम्रपान केल्यास किंवा तंबाखू, गुटखा खाल्ल्यास झोपेवर विपरित परिणाम होतो.

डॉ. मनोज शिंगाडे

Back to top button