लेप्टोस्पायरोसिस आजार पावसाळ्याच्या काळात अधिक प्रमाणात - पुढारी

लेप्टोस्पायरोसिस आजार पावसाळ्याच्या काळात अधिक प्रमाणात

लेप्टोस्पायरोसिस हा आजार मुख्यत्वे पावसाळ्याच्या काळात अधिक प्रमाणात आढळतो. भारतात 2013 मध्ये पहिल्यांदा या आजाराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र दरवर्षीच या आजाराला बळी पडणार्‍या रुग्णांची संख्या वाढते आहे. हल्ली हा आकडा 10-15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या वर्षी मुंबईत या आजारामुळे चार लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

लेप्टोस्पायरोसिस हा आजार जनावरांच्या मलमुत्रामुळे पसरणार्‍या लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होते. उंदरांच्या मूत्रामध्ये हे जीवाणू आढळतात. त्याच्या संपर्कात येणार्‍या कोणत्याही पाळीव जनावरांच्या माध्यमातून हा आजार मनुष्याच्या शरीरात पोहोचतो. सर्वसाधारणपणे म्हैस, घोडे, मेंढ्या, बकरी, डुक्कर आणि कुत्रा यांच्यामुळेही लेप्टोस्पायरोसिसचा फैलाव होतो. पावसाळ्यात याचे प्रमाण वाढते.

जीवाणूचा संपर्क : लेप्टोस्पायरोसिसचे जीवाणू उंदीर, पक्षी आणि सस्तन प्राण्यांमधून मनुष्यापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे शक्यतो प्राण्यांचा वावर असलेल्या मातीच्या ठिकाणी आणि पाण्याच्या ठिकाणापासून दूर राहावे. कारण, त्या ठिकाणी प्राण्यांचे मूत्र असण्याची शक्यता अधिक असते. चुकूनही अशा ठिकाणी गेल्यास त्वचेला भेगा पडू शकतात, तसेच ओरखडे येऊ शकतात. लेप्टोचे जीवाणू चेहर्‍यावरील कान, नाक तसेच जननांगातून किंवा जखमांतून शरीरात प्रवेश करू शकतो.

आपल्या घरात पाळीव प्राणी असतील, तर या आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. या आजाराने ग्रस्त असणार्‍या जनावरांना स्पर्श केल्यास किंवा त्यांच्यासमवेत काही खाल्ल्यासही जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. घरात उंदीर असतील आणि ते या आजाराने ग्रस्त असतील, तरीही आपल्याला संक्रमण होण्याची शक्यता अधिक असते.

जनावरांच्या उष्ट्या पाण्यातही लेप्टोचे जीवाणू असतात. हवेतून ते आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. घरातील पाळीव जनावरांच्या मलमुत्रामुळे त्याच्या संपर्कात आल्यास हे आजार होऊ शकतात.

लक्षणे : लेप्टोस्पायरोसिस झाल्यास त्याची लक्षणे ही दोन आठवड्यांच्या आत दिसू लागतात. रुग्णाला खूप ताप म्हणजे 104 अंश फॅरेनहाईट ताप येतो. डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, कावीळ, उलट्या, डायरिया, त्वचेवर पुरळ आदी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे खूपच सामान्य आहेत. त्यामुळे लेप्टोची लागण झाली आहे का, हे जाणून घेण्यासाठी रक्ताची तपासणी करावी लागते.

उपचार : लेप्टोस्पायरोसिसवर उपचारांसाठी प्रतिजैविकांचाच वापर करावा लागतो. त्याशिवाय अंगदुखीकरिता वेदनाशामक औषधे दिली जातात. लेप्टोवर तब्बल आठवडाभर उपचार करावे लागतात; मात्र या आजाराने गंभीर स्वरूप प्राप्त केल्यास मात्र रुग्णालयात भरती व्हावे लागते. या संसर्गामुळे आपल्या शरीराचे अवयवही खराब होतात.

बचाव : लेप्टोपासून बचाव करण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सावधानी बाळगली पाहिजे.
पावसाळ्याच्या काळात पोहणे, वॉटर स्कीईंग, सेलिंगपासून बचाव केला पाहिजे. त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेवरही लक्ष दिले पाहिजे. प्रवासादरम्यान स्वच्छतेवर लक्ष दिले पाहिजे.
इजा किंवा जखम झाल्यास ती उघडी ठेवू नये त्यावर मलमपट्टी जरुर करावी.

हेही लक्षात ठेवा

पावसाचे पाणी आणि उंदरांपासून दूर राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पावसाच्या काळात पाणी साठत असल्याने आणि पाणी वाहत असल्यामुळे पाण्यात संसर्ग मिसळल्याने ते दूषित होते.

त्यामुळेच पावसाळ्याच्या काळात लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता दुप्पट होते. त्याशिवाय या जीवाणूंच्या संपर्कात आल्याने पाळीव जनावरांना बाधा होते आणि त्यांच्यामुळे आपल्यालाही संसर्ग होतो.

पावसाळा म्हटले की, जीवाणूजन्य विषाणूजन्य आजारांचा फैलाव वाढताना दिसतो. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना जुलाब, टायफॉईड, मलेरिया यासारखे आजार होतात. पावसाळ्यात त्याचे प्रमाण अधिक असते. याव्यतिरिक्तही आपल्या आजूबाजूला असे अनेक आजार आहेत, ज्यांच्या संसर्गामुळे आपल्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो; मात्र तरीही त्याविषयी आपल्याला जाणीव नसते किंवा माहिती नसते. त्यापैकीच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायोरसिस!

डॉ. अतुल कोकाटे

Back to top button