Depression : आठवड्यातून 75 मिनिटांचे चालणेही वाचवेल डिप्रेशनपासून | पुढारी

Depression : आठवड्यातून 75 मिनिटांचे चालणेही वाचवेल डिप्रेशनपासून

लंडनः सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात अनेक लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याच्या गर्तेत अडकत आहेत. असुरक्षितता, भविष्याची चिंता अशा अनेक कारणांमुळे लोकांना डिप्रेशन येत आहे. या मानसिक समस्येपासून बचाव करण्यासाठीही चालण्याचा व्यायाम लाभदायक ठरतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. आठवड्यातून 75 मिनिटांचा चालण्याचा व्यायामही डिप्रेशनची शिकार बनण्यापासून वाचवतो असे ब्रिटनच्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी म्हटले आहे.

संशोधकांनी म्हटले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या व्यायामाच्या अवधीच्या निम्म्या वेळेतही व्यायाम केला तरी डिप्रेशनचा धोका 20 टक्क्यांवरच रोखता येतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आठवड्यातून 150 मिनिटे व्यायाम करण्याची गरज आहे. केम्ब्रिजच्या संशोधकांनी म्हटले आहे की यापेक्षा निम्मा वेळ जरी व्यायामाला दिला तरी शरीराबरोबरच मानसिक आरोग्यालाही लाभ मिळू शकतो. व्यायामामुळे शरीरात ‘एंडोर्फिन’ नावाचे रसायन बनते जे आपल्याला आनंदाची जाणीव करून देते. यामुळे डिप्रेशनशी झुंजणार्‍या लोकांना मदत मिळते. त्यामुळे तो सामाजिक घडामोडींमध्ये पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतो.

याबाबत 1 लाख 90 हजार लोकांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये भारत, अमेरिका, रशिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, जपानसह युरोपियन देशांचे लोक सहभागी झाले होते. या लोकांपैकी 28 हजार लोक डिप्रेशनशी झुंजत होते. सध्या जगभरात सुमारे 28 कोटी लोक डिप्रेशनच्या विळख्यात आहेत. काही स्टडीजनुसार शारीरिक सक्रियता ही औषधांपेक्षाही अधिक परिणामकारक ठरू शकते.

हेही वाचलत का ?

Back to top button