eye health : उन्हाळ्यातील नेत्रारोग्य | पुढारी

eye health : उन्हाळ्यातील नेत्रारोग्य

उन्हाळ्याच्या दिवसांत संसर्गजन्य तापासोबतच डोळ्यांना त्रासदायक (eye health) ठरणारे अनेक विषाणू सक्रिय होतात. म्हणूनच घरातून बाहेर पडणार्‍या लोकांना प्रतिबंधात्मक पातळीवर या आजारापासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार इतर विषाणूंप्रमाणे डोळ्यांच्या आजारासाठी कारणीभूत ठरणार्‍या विषाणूंचे स्वरूपदेखील दरवर्षी बदलत जाते. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही ड्रॉपचा वापर करणे नुकसानदायक ठरू शकते.

डोळ्यांना खाज येत असेल किंवा टोचल्यासारखे वाटत असेल तर या मागचे सरळ कारण म्हणजे डोळे कोरडे पडणे. यामुळे डोळ्यातील वंगण निर्माण करण्याची क्षमता प्रभावित होते. मात्र, ही समस्या पिंक आय स्टेनसाठी कारणीभूत ठरणार्‍या एडीनो-8 या विषाणूमुळेदेखील निर्माण होऊ शकते. यामध्ये केवळ डोळ्यांच्या प्युटिराईड ग्रंथीच नाही तर ग्लुकोमावरदेखील परिणाम होतो. या आजाराकडे दुर्लक्ष करू नये. घरगुती इलाज करण्यात वेळ घालवू नये. कारण, या संक्रमणाचा प्रभाव वाढला तर पुढे डोळे उघडण्यासदेखील अडचण येऊ शकते.

कंजेक्टिव्हायटिस हे संक्रमण पसरविण्यासाठी 50 प्रमुख प्रकारच्या विषाणूंना जबाबदार मानले जाते; परंतु त्याचे स्ट्रेन दरवर्षी बदलते. या आजाराचा पहिला परिणाम डोळ्यांच्या दृश्यतेवर पडतो. त्यानंतर कॉर्नियामध्ये हलकासा पांढरा चट्टा पडतो. डोळ्यांमध्ये थोड्याशा वेदना हेदेखील याचे प्रमुख लक्षण आहे. ही लक्षणे सुरुवातीलाच ओळखली गेली तर हा आजार बरा करता येतो. प्रतिबंध अथवा सुरक्षितता म्हणून डोळ्यांना वारंवार हात लावू नये.

बर्‍याचदा इलाज करूनही डोळे बरे न होण्याचे सर्वसामान्य कारण हे रुग्ण वारंवार डोळ्यांना (eye health) हात लावून विषाणूंचे संक्रमण कमी होऊ देत नाही, असे दिसून आले आहे. तसेच हा आजार एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरतो, असेही दिसून आले आहे. म्हणूनच दुसर्‍यांनी वापरलेल्या वस्तू इतरांनी वापरू नयेत. कंजेक्टिव्हायटिस हा आजार सुरुवातीलाच ओळखला गेला तर दोन ते तीन दिवसांच्या इलाजाने तो पूर्ण बरा होतो. यामध्ये औषधांपेक्षा स्वच्छतेवर जास्त लक्ष ठेवणे गरजेचे असते. डोळे स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करावेत. दुसर्‍याचा रूमाल किंवा टॉवेल वापरू नये आणि कंजेक्टिव्हायटिस झाल्यानंतर दोन दिवस लोकांच्या संपर्कात येऊ नये.

डोळे बरे करणारे बरेचसे आयड्रॉप स्टेरॉईड हार्मोनयुक्त असतात. त्यामुळे डॉक्टरांशी सल्ला घेत असाल तरी आपल्याला देण्यात येणारे औषध स्टेरॉईड तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी. वास्तविक पाहता स्टेरॉईडच्या वापराने डोळ्यांच्या बुबुळांवर आणि पापण्यांवर सूज येऊ शकते.

अन्य कुठल्याही संक्रमणाप्रमाणेच डोळ्यांचे संक्रमणदेखील एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पोहोचते. मात्र, या संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात दुपारी तीव्र उन्हामध्ये असणारे अल्ट्राव्हायलेट किरणदेखील डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात. म्हणूनच डोळे चांगले असले तरीही दुपारी घराबाहेर पडताना उत्तम गुणवत्ता असणारे, अतिनिल किरणांपासून संरक्षण करणार्‍या गॉगल्सचा वापर करावा. बरेचसे लोक या सर्व गोष्टी माहीत असूनही हलक्या दर्जाचे गॉगल्स वापरतात. यामुळे डोळ्यांच्या द़ृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. निकृष्ट दर्जाच्या गॉगलमुळे डोळ्यांचे बुबूळ प्रसरण पावूशकतात. यामुळे डोळ्यांत अधिक प्रमाणात हानिकारक असणारी अतिनिल किरणे प्रवेश करून नुकसान करू शकतात.

उष्णतेमुळे तापमान वाढते आणि अश्रूंचे बाष्पीभवन अधिक प्रमाणात झाल्यामुळे ड्राय आईज सिंड्रोम म्हणजे डोळे कोरडे पडण्याची समस्या उद्भवते. ती सर्वसामान्य आहे. यामुळे अशावेळी डोळे सतत धुवत राहावे आणि त्यामध्ये ओलसरपणा राखणारे आयड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने टाकावेत.

पोहत असणार्‍या व्यक्तींनी क्लोरिनपासून होणार्‍या अ‍ॅलर्जीपासून आणि स्विमिंग पूल कंजेक्टिव्हायटिसपासून बचाव करण्यासाठी चष्मा घालावा. तसेच यासोबत 6 ते 8 तासांची शांत झोपदेखील डोळे नैसर्गिकरीत्या ताजेतवाने ठेवू शकते.

डॉ. मनोज शिंगाडे

Back to top button