अपत्यहिनांसाठी स्टेम सेल थेरपी | पुढारी

अपत्यहिनांसाठी स्टेम सेल थेरपी

‘वंध्यत्व’ ही संज्ञा अशी गोष्ट आहे, जी कोणत्याही जोडप्याला किंवा कुटुंबाला एक मोठा धक्का देते. कारण, ती ‘अक्षमता’ दर्शवत असल्याचे समाजात मानले जाते. भारतातील 10 ते 15 टक्के जोडप्यांना प्रजननासंबंधी समस्या असल्याचे ज्ञात आहे आणि हा केवळ एक ढोबळ अंदाज आहे.

वंध्यत्वाची कारणे

पूर्वी स्त्रीचे वाढते वय हे गर्भधारणा न होण्याचे प्रमुख कारण मानले जात असे. क्षयरोग, ट्यूमर, पुनरुत्पादक अवयवांसंबंधी समस्या, संप्रेरकांचे असंतुलन, जीवनशैलीच्या सवयी इ.सारख्या विविध कारणांमुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही वंध्यत्व येते.

वंध्यत्व उपचार प्रगती

वर्षानुवर्षे वंध्यत्वाच्या उपचारांत लक्षणीय प्रगती झाली असली, तरी बर्‍याचदा वंध्यत्वास कारणीभूत परिस्थितीवर केवळ साहाय्यक पुनरुत्पादक तंत्रांनी मात करता येत नाही. वैद्यकीय शास्त्रातील दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहता आता आपल्याला आपल्या शरीरातील संसाधनांचा वापर करून वंध्यत्वावर मात करता येते. सेल आधारित थेरपी ही अशीच एक उदयोन्मुख पद्धत आहे जी पुरुष आणि महिला वंध्यत्वासह अनेक परिस्थितींच्या उपचारांमध्ये आशेचा किरण निर्माण करते.

सेल आधारित थेरपी आणि वंध्यत्व

सेल आधारित थेरपीमागील तत्त्व हे आहे की, आपल्या शरीरात स्टेम पेशी आणि वाढीचे घटक असतात, जे सूज आणि डाग कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, इतर पेशींचे कार्य वाढविण्यासाठी, नवीन पेशींना तयार करण्यासाठी मदत करतात.

पूर्वी असे मानले जात होते की, एक स्त्री निश्चित संख्येने अंडी घेऊन जन्माला येते जी वयानुसार कमी होत जातात. तथापि, अंडाशयात स्टेम पेशी असतात, ज्याचा वापर अंडी वाढविण्यासाठीही केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे पुरुषांच्या अंडकोषांमध्ये स्टेमपेशी असतात ज्या शुक्राणू तयार करू शकतात, ज्याचा उपयोग ऑलिगोस्पर्मिया/अझोस्पर्मियासारख्या समस्या सोडवण्यासाठी केला जाऊ शकतो.

शिवाय, विशिष्ट प्रकारच्या स्टेम पेशी फॉलिकल उत्तेजक हार्मोन रिसेप्टर व्यक्त करतात, जे विशिष्ट पुनरुत्पादक प्रक्रियांचे नियमन करणारे हार्मोन आहे. स्टेम पेशी एंडोमेट्रिओसिससारख्या परिस्थितीत फायदेशीर ठरू शकतात आणि एंडोमेट्रियल जाडी वाढविण्यात मदत करू शकतात.

डॉ. प्रदीप महाजन

Back to top button