लहानग्यांमधील बद्धकोष्ठतेची समस्या | पुढारी

लहानग्यांमधील बद्धकोष्ठतेची समस्या

लहान मुले असो किंवा मोठी व्यक्ती, पोट चांगले आणि स्वच्छ असेल तर अनेक आजारांपासून बचाव होतो. वारंवार पोट साफ न होता राहिल्यास बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते.

बद्धकोष्ठता होण्यापूर्वी संडास किंवा मल कडक होतो त्यामुळे तो शरीराबाहेर टाकण्यात अडचणी निर्माण होतात. एवढेच नव्हे तर बद्धकोष्ठता झाल्यास पोटात वेदना होतात. त्यामुळे पाईल्स होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे.

बद्घकोष्ठतेची समस्या ही मोठ्यांपासून लहान मुलांनाही जाणवते आणि त्याचा त्रास लहान मुलांना अधिक होतो. साधारणतः बाळ जेव्हा दुधाव्यतिरिक्त काही अन्नपदार्थ सेवन करून लागते तेव्हा त्यांना बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावते.

काही मुलांना बद्धकोष्ठतेचा खूप त्रास होत नाही तर काहींची बद्धकोष्ठता खूप त्रासदायक असते त्यांना असह्य पोटदुखी आणि शौचाबरोबर रक्त पडण्याचाही त्रास होतो. अशा परिस्थितीत पालकांनी विचारपूर्वक बाळाला औषधे दिली पाहिजेत. बाजारात मिळणारी उत्पादने आणि औषधे यांचा वापर करण्याऐवजी जर बाळाच्या बद्घकोष्ठतेवर घरगुती उपाय केले तर ही समस्या दूर होऊन बाळाला लवकर फायदा होईल.

सहा महिन्यांपेक्षा लहान बाळ : सहा महिन्यांपेक्षा लहान बाळ असेल तर संपूर्ण पोषण हे आईच्या दुधातूनच मिळते. आईचे दूध म्हणजे स्तनपान नियमितपणे करणार्‍या बाळांमध्ये बद्धकोष्ठतेचे प्रमाण कमी असते. परंतु जेव्हा बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त म्हणजेच स्तनपानाव्यतिरिक्त फॉर्म्युला दूध द्यावे लागते तेव्हा मात्र बाळांना बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचे कारण आईच्या आहारात पोषक घटकांची कमतरता असते. बाळाला ताप येणे, पोट फुगणे, संडास किंवा मल कडक होणे आणि दूध पिण्यास नकार देणे आदी लक्षणे दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क करावा.

बाळ स्तनपान करते त्यामुळे आईने स्वतःच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आईने आहारात हिरव्या भाज्या, फळे आणि तंतुमय पदार्थ सामील केले तर बाळाला बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही.
बाळाच्या शी करण्याच्या वेळा ठरवा. अनियमित शी ची वेळ हे देखील बद्धकोष्ठतेचे कारण असू शकते.
बाळाला फॉर्म्युला मिल्क द्यावे लागत असेल तर ते बदलून पहावे. असे केल्यास बाळाला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
बाळाचे पोट रिकामे असू नये. बाळाने किती दूध प्यायले आहे याकडे जरूर लक्ष दिले पाहिजे. बाळाचे पोट रिकामे असेल तर त्याला पुरेशा प्रमाणात दूध पाजणे आवश्यक आहे.

सहा महिन्यांपेक्षा मोठे बाळ :

बाळ जेव्हा सहा महिन्यांपेक्षा मोठे असेल तेव्हा बाळाच्या आहारात दुधाव्यतिरिक्त काही पदार्थ सामील केले जातात. दुधाव्यतिरिक्त बाळाला अन्नपदार्थ खाऊ घालत असाल आणि बाळ निरोगी असेल तर काहीच प्रश्न येत नाही अन्यथा बाळाला बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावते. बाळ एक वर्षाचे होईपर्यंत त्याचा मुख्य आहार दूध हेच असले पाहिजे. बाळाला कडक, कोरडे पदार्थ खायला घातले तर बाळाला बद्धकोष्ठता होते.

सहा महिन्यांनंतर बाळाच्या आहारात डाळीचे पाणी, फळे किंवा फळांचा रस आणि पाणी हे पुरेशा प्रमाणात सामील करावे. त्याशिवाय बाळाला नवा पदार्थ खायला घालण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, शिवाय नवा पदार्थ खाऊ घातल्यानंतर बाळाला काही त्रास होत नाही ना याकडे जरूर लक्ष द्यावे. सहा महिन्यांपेक्षा मोठ्या बाळाला बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत असेल तर खालील सूचना करून पहाव्यात.

बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्याला हिंग, जिरे आणि शुद्ध साजूक तूप घालून दलिया किंवा मूग डाळ खिचडी खाऊ घालावी. गाजर हा देखील प्रभावी उपाय आहे. बाळ गाजर खात नसेल तर गाजर किसून ते दुधात शिजवून बाळाला खायला द्या.

मैद्याचे पदार्थ जसे बिस्किट, खारी, ब्रेड, मॅगी आणि नमकीन पदार्थ, अति तिखट पदार्थ बर्गर, पिझ्झा, समोसा हे बाळाला मुळीच देऊ नये. हिंग आणि पाणी यांची पेस्ट करून बाळाच्या बेंबीच्या ठिकाणी हलक्या हाताने मसाज करून लावावी. त्यामुळेही बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.

Back to top button