मधुमेह आणि शारीरिक इजा | पुढारी

मधुमेह आणि शारीरिक इजा

मधुमेहामुळे रक्ताभिसरण कमी होऊन पायाच्या नसा खराब होतात. मधुमेह असलेल्या बहुसंख्य लोकांना मधुमेह-संबंधित पायावर जखम होण्याची शक्यता जास्त असते. उपचारात उशीर झाल्याने गँगरीनसारखी समस्या तसेच बर्‍याचदा जखम बरी न झाल्याने पाय देखील कापावा लागू शकतो. गुंतागुंत टाळण्यासाठी पायांच्या समस्या लवकर ओळखणे आवश्यक आहे.

मधुमेह हे केवळ अंधत्व, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचे प्रमुख कारण नाही तर शरीरातील इतर अवयवावरही परिणाम करतो. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये पायांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात.

जर एखाद्याला डायबेटीक फूट अ‍ॅटॅक आला असेल तर ती व्यक्ती त्वचा आणि टिश्यू नेक्रोसिससह तीव्रपणे फुगलेल्या पायाची तक्रार करते. एखाद्या व्यक्तीला कट आणि फोड येऊ शकतात ज्यामुळे अल्सर होऊ शकतो. ज्यामुळे गँगरीन (मृत, काळी त्वचा) होऊ शकते. पायांमध्ये रक्ताभिसरण कमी होऊन चालताना पायांच्या मागच्या भागात वेदना किंवा पेटके येऊ शकतात. हे 60% पुरुष, 30% महिला आणि 10% तरुणांमध्ये दिसून येते.

शारीरिक हालचालींचा अभाव, बैठी जीवनशैली, जंक फूडचे सेवन यामुळे पुरुषांमध्ये गेल्या 5 वर्षांत डायबेटीक फूट अ‍ॅटॅकचे प्रमाण वाढले आहे. 20 वर्षांहून अधिक वयाच्या अनियंत्रित मधुमेह असलेल्यांना डायबेटीक फूट अ‍ॅटॅक येतो. वेळेवर शस्त्रक्रिया करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जखमेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

पायांची काळजी घेण्यासाठी दररोज व्यायाम करा. आपले पाय पाण्याने व्यवस्थित धुवा आणि पायाचा प्रत्येक कोपरा विशेषत: पायाच्या बोटांमधील जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवा. रक्ताभिसरणासारख्या समस्यांना आमंत्रण देणारे धूम्रपान टाळावे, जखमांची काळजी घ्यावी, मर्यादित वजन राखावे, मधुमेह कंट्रोल करावा, पायांना मॉइश्चराइज करावे आणि योग्य आरामदायी शूज वापरावेत.

डॉ. विश्वजित चव्हाण

Back to top button