उन्हाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी | पुढारी

उन्हाळ्यात त्वचेची घ्या अशी काळजी

कोवळे ऊन अंगावर पडले की बरे वाटते; पण उन्हाळ्यातील रखरखीत उन्हं त्वचेसाठी निश्चितच हानिकारक आहेत. इतर मोसमांच्या तुलनेत यूव्हीेए आणि यूव्हीबी किरणांमध्ये 43 टक्के वाढ होते. त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्याशिवाय उन्हाळ्यात खूप घाम येतो. घर्मग्रंथी अधिक सक्रिय झाल्याने त्वचा चिकट होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचेशी निगडित अनेक समस्या भेडसावतात. उन्हाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेतली पाहिजे. त्वचेच्या पोतानुसार काळजी घ्यावी.

सामान्य त्वचा : ही त्वचा तेलकटही नसते आणि कोरडीही नसते. या त्वचेचा स्पर्श मुलायम आणि मखमली असतो. सामान्य त्वचेची देखभाल केली नाही तर त्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि वाढत्या वयाचा परिणाम त्वचेवर लगेच दिसतो. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये यासाठी चेहरा दिवसातून चार ते पाच वेळा धुवावा. थंड पाण्याने धुताना सतत साबणाचा वापर करू नये. त्वचेचे पोषण व्हावे यासाठी संतुलित आणि पोषक आहार घ्यावा.

तेलकट त्वचा : या त्वचेच्या लोकांच्या शरीरातील तैलग्रंथी जास्त सक्रिय असतात. तेलकट त्वचेवर तीळ, मुरूम, पुटकुळ्या येण्याचे प्रमाण अधिक असते. ही त्वचा विशेषत्वाने स्वच्छ राखली पाहिजे. त्यामुळे त्वचेची रंध्रे मोकळी राहतात. उन्हाळ्यात चेहरा तीन ते चारवेळा धुवावा. अतिचरबीयुक्त आहार, तेलकट, तुपकट आहार घेऊ नये. अतिगोडही खाऊ नये. तसेच चेहर्‍याला ऑईल फ्री मॉश्चरायझर लावावे.

कोरडी त्वचा : कोरड्या त्वचेवर वातावरण बदलाचा लगेच प्रभाव पडतो. या त्वचेचा जोराचा वारा, कडक ऊन यांच्यापासून बचाव करावा. या प्रकारच्या त्वचेला उन्हाळ्यातही नरम ठेवणे गरजेचे असते; पण त्वचेची देखभाल करताना साबणाचा वापर करू नये. जास्त वेळ एअर कंडिशनरमध्ये बसू नये. कडक उन्हात फिरू नये. घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन अवश्य लावावे; अन्यथा त्वचा अजूनच कोरडी होते आणि निर्जीव दिसते. सनस्क्रीन लावल्यास हे टाळता येते.

संमिश्र त्वचा : या प्रकारच्या त्वचेची रचना कोरडी आणि तेलकट यांचे मिश्रण असते. त्वचेचा काही भाग तेलकट, तर काही भाग कोरडा असतो. त्यामुळे त्वचेच्या प्रत्येक भागाची काळजी वेगवेगळी घ्यावी. धूळ, माती, उष्णता आणि जोराचा वारा
यापासून त्वचेचा बचाव केला पाहिजे.

मुख्य समस्या : रखरखीत ऊन आणि उकाडा याचा त्वचेला त्रास होतो. अतिघाम आणि धूळ यांच्यामुळे त्वचा खराब होते. उन्हाळ्यात सूर्याची किरणे थेट त्वचेवर पडल्यास त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात फक्त चेहराच नाही तर संपूर्ण शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात त्वचेसंबंधी काही प्रमुख समस्या निर्माण होतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

* टॅनिंग, सनबर्न
* मुरूम, पुरळ
* घामोळ्या
* उन्हाळ्यातील पुरळ

त्वचेचे पोषण-

* आहारा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा.

* भाज्या, मोसमी फळे आणि दही यांचा समावेश करावा. तसेच जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक, अतितेलकट आणि मसालेदार आहार घेऊ नये.

* दिवसातून कमीत कमी पाच मोसमी फळे आणि भाज्या खाव्यात. कारण, त्यात अँटीऑक्सिडंट असतात. ते फ्री रॅडिकल्सशी लढतात. त्वचा चमकदार तसेच उजळ आणि तरुण-तजेलदार राखण्यास मदत करते.

* उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. त्यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि डागविरहित राहते.

* या काळात लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक आणि फळांचा रस यांचे सेवन करावे.

* ग्रीन टीचे सेवन करावे. त्यामुळे त्वचा सुंदर होते.

* आख्खे धान्य सेवन करावे. त्याचा त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो.
काळजी घ्या – * हानिकारक अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे डोळे आणि त्याच्या आसपासची त्वचा होरपळते. त्यामुळे गॉगल जरू वापरावा.

* उन्हात बाहेर पडताना शरीर झाकावे. चेहरा झाकण्यासाठी टोपी घालावी किंवा रूमाल बांधावा.

* सुती आणि सैल कपडे घालावेत. त्यामुळे घाम
शरीरावर राहत नाही; अन्यथा घामामुळे पुरळ येतात.

* उन्हात बाहेर जाताना त्वचेवर सनस्क्रीन लावावे. त्यामुळे त्वचेचे रक्षण तर होते; पण त्वचेच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो. त्यामुळे पिग्मेंटेशन देखील होत नाही. सुरकुत्या लवकर पडत नाहीत.

* उन्हाळ्यात शक्यतो सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बाहेर पडू नये.

* धूम्रपान करू नका. त्यामुळे त्वचेतील इलास्टिन आणि कोलेजन नष्ट होते. त्वचेचा मऊपणा संपतो.

* ताण घेऊ नका, त्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचा अतिसंवेदनशील असते.

* दिवसातून दोनवेळा चेहरा स्वच्छ साबणाने धुवावा.

* व्यायाम आणि योगाभ्यास नियमितपणे करावा. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. तणाव कमी होतो, त्यामुळे त्वचेच्या समस्याही दूर होतात.

* पुरेशी झोप घ्यावी. जितकी शांत आणि जास्त झोप तितकेच शरीरात ह्युमन ग्रोथ हार्मोन्सची निर्मिती होते. आपल्या त्वचेला जाड आणि लवचिक बनवण्यास त्याची मदत होते. तसेच त्वचेवर सुरकुत्या कमी येतात.
वरील काही गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार त्वचेची काळजी घेतल्यास उन्हाळ्यातही त्वचा आरोग्यदायी राहते.

डॉ. संतोष काळे

Back to top button