बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी करा मानसिक आरोग्य तपासणी | पुढारी

बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी करा मानसिक आरोग्य तपासणी

बैठी जीवनशैली, जंकफुडचं सेवन आणि व्यसन यामुळे लठ्ठपणा वाढतोय. वाढत्या लठ्ठपणावर व्यायाम व डाएट हा उत्तम पर्याय आहे; पण अनेकांना ते शक्य नसते. काहीवेळा वजन खूप जास्त असते आणि लवकर आटोक्यात आणले नाही तर गंभीर आजार उद्भवण्याचा धोका असतो. काही वेळा तर निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी वजन लवकर आटोक्यात आणणे हाच उपाय असतो. अशा परिस्थितीत वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणा दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे तो म्हणजे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया. परंतु, बहुतांश लोकांना या शस्त्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती नसते.

लठ्ठपणामुळे त्रस्त असणार्‍या या व्यक्ती मानसिकदृष्ट्या अक्षरशः खचून गेलेल्या असतात. अशा स्थितीत रुग्णाला धीर देण्यासाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मानसिक आरोग्य तपासणी करणे खूप गरजेचे आहे. याशिवाय डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्ण व त्यांचे नातेवाईकांचे समुपदेशनसुद्धा करतात.

लठ्ठ मंडळींसाठी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया हा एक प्रभावी उपाय आहे. यामुळे वजन नियंत्रणात राहते. अनेक गंभीर आजारांपासून स्वतःला वाचवता येते. जर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या एखाद्या गंभीर आजाराचा त्रास सतावत असेल तर अनेकदा अशा रुग्णांना बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.

बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेत लॅप्रोस्कोपी तंत्राचा (दुर्बिणीचा) वापर केला जातो. जठर आणि लहान आतडे यांचा आकार मर्यादित प्रमाणात कमी केला जातो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी स्लीव्हगॅस्ट्रोटोमॅमी आणि गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करावी लागते. म्हणूनच जर तुम्ही बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला तुमच्या मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल. एखाद्याचे मानसिक आरोग्य हा एक महत्त्वाचा पैलू आहे.

रुग्णांच्या मानसिक आरोग्यासाठी तपासणी

– बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टर रुग्णाचे समुपदेशन करण्यासह त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करतात.

– या तपासणीत शस्त्रक्रियेआधी रुग्ण शारीरिक व मानसिकदृष्ट्या तयार आहे की नाही हे पाहिले जाते.

– रुग्णाला वजनाच्या समस्येबद्दल काही प्रश्न विचारले जातात. याची तोंडी उत्तरे रुग्णांना द्यावयाची असतात.

– एखाद्या रुग्णाला आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेआधी थेरपीसुद्धा सुचविली जाते.

– शस्त्रक्रियेपूर्वी समुपदेशन करून रुग्णाच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकले जातात.

– ट्रिगर्स, आव्हाने, वजन वाढण्याची कारणे आणि खाण्याचे विकार यांचे विश्लेषण करण्यासाठी योग्य मूल्यमापन केले जाते. रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर त्याचे मानसिक आरोग्य, त्याची वर्तणूक आणि नातेसंबंधातील बदलांना सामोरे जाण्यास तयार आहात का? हे विचारले जाईल.

– वाढत्या वजनामुळे रुग्ण उदास, चिंताग्रस्त, तणावग्रस्त किंवा निराश आहे की नाही, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

– जर डॉक्टरांना वाटले की, रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार आहे आणि पुरेसा आत्मविश्वास आहे, तरच त्याला/तिला शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते.

– रुग्णांना चांगल्या मानसिक आणि भावनिक आधाराची आवश्यकता असते.

– बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेनंतर निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीत योग्य तो बदल, नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणं आवश्यक आहे.

डॉ. केदार पाटील

Back to top button