एग फ्रीजिंग : महिलांसाठी वरदान | पुढारी

एग फ्रीजिंग : महिलांसाठी वरदान

आजकाल अनेक कारणांमुळे महिला वयाच्या तिशीनंतर किंवा चाळीशीनंतर आई होण्याचा निर्णय घेतात. आरोग्याच्या क्षेत्रात विज्ञानाने मोठी प्रगती केली आहे. आता महिला वय वाढल्यानंतरसुद्धा एग फ्रीजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने एका निरोगी बाळाला जन्म देण्याचे स्वप्न साकार करू शकतात. आजकाल अनेक महिला करिअर, आरोग्य किंवा अन्य कौटुंबिक कारणांमुळे उशिरा बाळाला जन्म देऊ इच्छितात. त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान एक वरदानच ठरले आहे.

फर्टिलिटी मेडिकल क्षेत्रात आयव्हीएफनंतर एग फ्रीजिंग तंत्रज्ञान हेही एक उपयुक्त तंत्रज्ञान म्हणून उदयास येत आहे. तनीषा मुखर्जी, मोना सिंह, एकता कपूर, डायना हेडन, हॉलीवूडची अभिनेत्री हलसेय, एम्मा राबर्टस् अशा प्रसिद्ध व्यक्तींनी एग फ्रीजिंग तंत्रज्ञानाचा लाभ घेतला आहे. आजकाल हा प्रघात सर्वसामान्य कुटुंबांमध्येही रुळला आहे.

वैद्यकशास्त्रात कीमोथेरपी किंवा रेडिएशन असलेल्या अनेक थेरपींमुळे महिलांच्या गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. अनेक आजार आणि शस्त्रक्रियांमुळे प्रजनन शक्तीवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीशी दोन हात करीत असलेल्या महिला असे उपचार सुरू करण्यापूर्वी आपले एग फ्रीज करू शकतात. एवढेच नव्हे, तर आजकाल निरोगी महिलासुद्धा करिअर आणि रिलेशनशिपच्या कारणामुळे उशिरा गर्भवती होऊ इच्छितात. अशा महिला एग फ्रीजिंग तंत्रज्ञानाचा आधार घेऊ शकतात.

एग फ्रीजिंग तंत्रज्ञानात अंडाशयातून निरोगी अंडे काढून घेतले जाते आणि ते प्रयोगशाळेत नेऊन फ्रीज करून ठेवले जाते. त्यानंतर संबंधित महिला जेव्हा आई बनण्याचा निर्णय घेईल, तेव्हा या अंड्यांचा वापर केला जाऊ शकतो. या प्रक्रियेत गोठवून ठेवलेल्या अंड्यांचा शुक्राणूंसोबत मिलाफ घडवून गर्भाशयात सोडण्यात येतात. फ्रीजिंगच्या या प्रक्रियेत अंड्यांच्या जैविक गतीला काही काळ थोपवून धरले जाते. त्यामुळे त्या गतीचा वापर नंतर करता येतो.

अंडी फ्रीज करण्याचे योग्य वय 20 ते 30 वर्षे हे आहे. वास्तविक, या वयात गर्भावस्थेत अडथळे खूप कमी असतात. त्यामुळे या वयातील अंडी फ्रीज करून ठेवणे आणि नंतर त्यांचा वापर करणे लाभदायी ठरते. डॉक्टर आयव्हीएफप्रमाणेच अंडी काढण्यापूर्वी हार्मोन्सची (संप्रेरके) इंजेक्शन देतात. महिलेला भूल दिल्यानंतर एका शॉर्ट नॉन-इम्प्रेसिव्ह प्रोसीजरद्वारे ही प्रक्रिया केली जाते. ही प्रक्रियाही अगदी आयव्हीएफसारखीच असते.

या प्रक्रियेसाठी सामान्यतः दोन प्रकारे खर्च करावा लागतो. महिलेच्या शरीरातून अंडी काढण्यासाठी आणि ती फ्रीज करून ठेवण्यासाठी. हा खर्च 50,000 ते 1,00,000 रुपयांपर्यंत असू शकतो. एग फ्रीज झाल्यानंतर त्यांना फ्रोजन अवस्थेत ठेवण्यासाठी वर्षाकाठी 15,000 ते 30,000 रुपये इतका खर्च होऊ शकतो. या प्रक्रियेनंतर काही महिलांमध्ये वेदना, सूज, वजन वाढणे अशा समस्या दिसू शकतात. अशा स्थितीत महिलांनी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. ही सर्व लक्षणे हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोमचे संकेत देणारी असू शकतात. परंतु, तसे फारच क्वचित पाहायला मिळते.

एखाद्या महिलेला गंभीर स्वरूपाची आरोग्यविषयक समस्या असेल आणि त्या समस्येमुळे भविष्यात तिची प्रजनन क्षमता कमी होणार असेल, तर भविष्यातील सुरक्षित गर्भधारणेसाठी ती महिला एग फ्रीजिंगचा पर्याय निवडू शकते. एग फ्रीजिंग तंत्रज्ञानात अंडाशयातून निरोगी अंडे काढून घेतले जाते आणि ते प्रयोगशाळेत नेऊन फ्रीज करून ठेवले जाते. त्यानंतर संबंधित महिला जेव्हा आई बनण्याचा निर्णय घेईल, तेव्हा या अंड्यांचा वापर केला जाऊ शकतो. या प्रक्रियेत गोठवून ठेवलेल्या अंड्यांचा शुक्राणूंसोबत मिलाफ घडवून ती गर्भाशयात सोडण्यात येतात. फ्रीजिंगच्या या प्रक्रियेत अंड्यांच्या जैविक गतीला काही काळ थोपवून धरले जाते.

डॉ. बबिता अरोडा

Back to top button