चक्कर का येते?; जाणून घ्या कारण | पुढारी

चक्कर का येते?; जाणून घ्या कारण

अनेकांना रक्तदाब अचानक वाढल्यामुळे, मानसिक तणाव वाढल्यामुळे, थकवा आल्यामुळे, उन्हामुळे चक्कर येतेय; मात्र चक्कर आल्यास सर्व त्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या, तर आपल्याला चक्कर येण्यामागचे खरे कारण कळते. एकदा चक्कर येऊन गेल्यावर बरे वाटू लागते व आपण डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे टाळतो, अशी चूक करणे आपल्या जीवावर बेतू शकते. पक्षाघात, हृदयविकार, शरीरातील रक्तामधील साखरेचे प्रमाण अचानक कमी होणे.

ब्रेन ट्युमर, ब्रेन हॅमरेज अशा अनेक कारणांमुळे चक्कर येऊ शकते. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे. अ‍ॅनिमियामुळेही चक्कर येऊ शकते. रक्तदाब अचानक कमी झाला तरी चक्कर येते. एकाच ठिकाणी दीर्घकाळ उभे राहिल्यानेही चक्कर येऊ शकते. ज्यांना मधुमेह असतो अशांना रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने चक्कर येऊन अशा व्यक्ती बेशुद्ध पडतात. अचानक चक्कर येण्यापूर्वी काही लक्षणे जाणवतात.

हाता-पायातील ताकद अचानक कमी होणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, घशातून आवाज न फुटणे, गळून गेल्यासारखे वाटणे अशी लक्षणे जाणवतात. अशी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. ही लक्षणे जाणवल्यानंतर शरीर घामाने डबडबून जाते. चक्कर आल्यानंतर काही काळाकरिता त्या व्यक्तीची शुद्ध हरपते. काही वेळा तर नाडीचे ठोके मंदावतात. अशा स्थितीत काही वेळा मेंदूतील रक्तप्रवाह खंडित होतो व त्याचा परिणाम हृदयविकाराचा झटका येण्यात किंवा ब्रेन स्ट्रोक येण्यात होतो. म्हणूनच चक्कर आल्यासारखी भावना झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

चक्कर आलेल्या व्यक्तीला त्या क्षणी काहीच समजत नसते. म्हणून त्याच्याजवळ असलेल्यांनी अशा रुग्णाला बाकी कोणताही विचार न करता डॉक्टरांकडे नेले पाहिजे. चक्कर आल्यानंतर त्या रुग्णाच्या अंगावरील शर्टची बटणे काढली पाहिजेत. त्याच्या चेहर्‍यावर हलके पाणी मारल्यावर त्याला शुद्ध येऊ शकते. शुद्धीत आल्यावर लगेचच ग्लुकोजचा डोस किंवा फळांचा रस दिला, तर रुग्णाला हुशारी वाटू लागते.

एवढे करूनही रुग्ण शुद्धीवर न आल्यास त्याला थेट रुग्णालयात दाखल करणे योग्य ठरते. सकाळच्या वेळेला वारंवार डोके दुखणे, उलटी होणे, डोके गरगरणे ही लक्षणे वारंवार आढळू लागल्यास डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्यावा. कारण, ही लक्षणे ब्रेन ट्युमर किंवा मेंदू
संदर्भातील अन्य विकारांची असू शकतात. काहीवेळा साठी ओलांडलेल्या व्यक्तींना मान हलविल्यावर किंवा वर खाली पाहिल्यावर चक्कर येऊ शकते. अशा रुग्णांनी तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

चक्कर येणे हे काही वेळेस गंभीर आजाराचे लक्षण असू शकते; मात्र अनेकजण चक्कर आल्यास त्याकडे लक्ष देत नाहीत. या दुर्लक्षामुळे आपल्याला गंभीर व्याधीला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच चक्कर आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

Back to top button