कर्करोग आणि जन्मजात दोष | पुढारी

कर्करोग आणि जन्मजात दोष

कर्करोग हा जन्मजात दोष असणाऱ्या बालकाला सर्वाधिक धोका असतो.

नवजात अर्भक निरोगी आहे ना? त्याच्यात जन्मजात कोणते वैगुण्य तर नाही ना? असे प्रश्‍न मुला-मुलींच्या जन्मानंतर हमखास विचारले जातात.

गर्भावस्थेत 40 आठवड्यांपर्यंत भ्रूणात अनेक बदल होत असतात. या कालावधीत भ्रूणाचा विकास योग्य होतो आहे की नाही, हे समजू शकत नाही. जन्मजात दोषांचे हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

भारतात दरवर्षी सात टक्के बालके वैगुण्यासह (बर्थ डिफेक्ट) जन्माला येतात. 3.3 कोटी मुले पाच वर्षांची होण्यापूर्वीच प्राणाला मुकतात.

अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, ज्या मुलांमध्ये जन्मजात दोष असतात, त्यांना कर्करोगाचा धोकाही सर्वाधिक असतो. वयात येताच या धोक्याचे प्रमाण कमी होत जाते. परंतु, जोखीम कायम राहते.

जनुकीय तसेच बिगरजनुकीय कारणामुळे बालकात ‘बर्थ डिफेक्ट’ निर्माण होऊ शकतो. आई-वडिलांपैकी एखाद्याला जनुकीय समस्या असेल, तर हा धोका वाढतो.

‘बर्थ डिफेक्ट’मध्ये कौटुंबिक इतिहासही महत्त्वाचा ठरतो. अशा स्थितीत काही महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात. ‘बर्थ डिफेक्ट’मुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्या पुढीलप्रमाणे –

‘डाऊन सिंड्रोम’ या समस्येला ‘ट्राईसोमी 21’ असेही म्हटले जाते. जर भ्रूणात माता-पित्याचा अतिरिक्‍त क्रोमोसोम आला तर बाळाला ‘डाऊन सिंड्रोम’ होऊ शकतो. बाळाचा मेंदू आणि शरीर यांच्या विकासात यामुळे अडथळा येतो. महिला जर 35 वर्षांनंतर आई बनली, तर तिच्या बाळाला ही समस्या येऊ शकते.

अर्भकांमध्ये ‘ट्रायसोमी 18’ ही समस्याही घातक ठरते. या दोषामुळे शरीरातील अवयवांचा योग्य विकास होत नाही आणि वजन कमी भरते. तसेच हृदयासंबंधीही आजार होऊ शकतात. याखेरीज ‘क्लब

फूट’ हीसुद्धा जन्मजात समस्या आहे. यात बाळाचे पाय आतील बाजूला वाकले जातात. स्ट्रेचिंग, एक्झरसाईज आणि सर्जरी या माध्यमातून या दोषावर इलाज शक्य आहे. कौटुंबिक इतिहास हे या दोषाचे कारण असू शकते.

‘सिस्टिक फायब्रेसिस’ नावाचा जन्मजात दोष असल्यास बाळाची पचनसंस्था आणि फुफ्फुसांचे मोठे नुकसान होते. पचनसंस्थेतील स्वादूपिंड, यकृत आदी अवयवांवर दुष्परिणाम दिसून येतात.

अमेरिकेत झालेल्या संशोधनातून असे निष्पन्‍न झाले आहे की, बर्थ डिफेक्टमुळे कर्करोग हाेण्याचा धोका वाढतो. संशोधकांनी बर्थ आणि हेल्थ रेकॉर्ड एकत्रित केले. यात नॉर्वे, स्वीडन, फिनलँड आणि डेन्मार्क येथील 62,295 कर्करोगग्रस्तांचा समावेश केला गेला.

यातील सर्वजण वयाच्या 46 वर्षांच्या आतील होते. या व्यक्‍तींची तुलना 7,24,542 अशा लोकांशी करण्यात आली, ज्यांना कर्करोग नव्हता. यातील सर्वाधिक कर्करोगग्रस्त लोक असे होते ज्यांच्यात ‘बर्थ डिफेक्ट’ होता.

असा दोष असणार्‍या 74 टक्के लोकांना कर्करोगाचा धोका असल्याचे दिसून आले. ज्यांच्यात जनुकीय दोष नाहीत, अशा 54 टक्के व्यक्‍तींना कर्करोगाचा धोका असल्याचे स्पष्ट झाले. संशोधनानुसार, अनेक धोके समोर आले.

उदाहरणार्थ, ज्यांच्यात जन्मजात ‘न्यूरल डिफेक्ट’ आहे त्यांना कर्करोगाचा धोका पाचपट अधिक असतो. डाऊन सिंड्रोमसह जन्माला आलेल्या मुलांना कर्करोगाचा धोका सहापट अधिक असतो. ‘क्लेफ पेलेट’ हा जन्मजात दोष असणार्‍यांना कोणताही धोका नसतो.

बाळात जन्मजात दोष असण्याचा धोका कमी करण्यासाठी गर्भधारणेपूर्वी थायरॉईड, शुगर, बीपी या गोष्टींची तपासणी करून घेणे चांगले. ज्यांना एखादी व्याधी असेल, त्यांनी गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भधारणा झाली असल्यास डॉक्टरांना त्यासंबंधीची सर्व माहिती द्यावी. त्यानुसार डॉक्टर औषधे बदलून देऊ शकतात. दोष टाळण्यासाठी आहार आणि जीवनशैलीही चांगली राखणे आवश्यक आहे.

डॉ. मनोज शिंगाडे

Back to top button