बदलत्या काळातील मुलांमधील आजार | पुढारी

बदलत्या काळातील मुलांमधील आजार

आई-वडिलांबरोबर मुलांच्याही जीवनशैलीत, आहाराच्या सवयीत सध्या आमूलाग्र बदल होताना दिसताहेत. मुलांच्या जीवनशैलीत बदल झाला, त्यानुसार खेळण्याच्या सवयीही बदलल्या. हल्‍ली प्रत्येक मुलाच्या हातात मोबाईल दिसतो. कॉम्प्युटर, मोबाईल गेम्स हे त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले आहेत. त्यामुळे साहजिकच त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. या सर्व बदलांमुळे लहान वयातच मधुमेह, अस्थमा आणि स्थूलता यांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. मुलांमध्ये औदासिन्य येते, त्यातून आत्महत्येचे विचारही मुलांच्या मनात येत असतात.

गेल्या काही वर्षांतील अभ्यास, संशोधन आणि सर्वेक्षणातून समोर आलेले आकडे अचंबा करायला लावतात. जे आजार म्हातारपणातील आजार म्हणून ओळखले जायचे, ते लहान मुलांना होताना दिसून येत आहेत.

मधुमेह : लहान मुलांमध्ये टाईप 1चा मधुमेह होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळतेय. त्याचबरोबर शारीरिक क्रियाशीलतेच्या अभाव आणि स्थूलता यामुळे मधुमहे टाईप 2 याचाही धोका वाढतोय. किशोरवयीन मुलांमध्ये टाईप 1 चा मधुमेह होत असल्याचे समोर आले. गेल्या काही वर्षांपासूून पाच वर्षांची मुलेसुद्धा मधुमेहाची शिकार होताना दिसताहेत. वीस वर्षांपूर्वी दरवर्षी सहाशे मुले टाईप 1 मधुमेहाने ग्रस्त होत होती; पण आता आकडा तीन हजार झाला आहे. वाढते वजन, फास्टफूडचे अतिरिक्त प्रमाण, अतिचरबीयुक्त, कार्बोहायड्रेटचे वाढते प्रमाण, फळे आणि भाजीपाल्या खाण्यांमध्येे घट ही मुलांमध्ये मधुमेह होण्याचे कारणे आहेत.

स्थूलपणा : बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांचे मैदानी खेळ बंद झाले, त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होऊ लागली. कॉम्प्युटर गेम्स, टीव्ही, मोबाईल, व्हिडीओ गेम्स याचे आकर्षण वाढल्याने मुले घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे शरीरातील कॅलरीज जळत नाहीत, त्यामुळे शरीरात त्या साठून राहतात. एकीकडे मैदानी खेळ कमी झाले असताना अतिकॅलरीज असेले फास्टफूड, बिस्किटे, पेस्ट्रीज, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक आदींचे आहारातील प्रमाण वाढले आहे. या सर्व पदार्थांमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त, तर पोषक घटक कमी आहेत. राष्ट्रीयकुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार भारतातील शाळकरी मुलांमधील 20 टक्के मुलांमध्ये स्थूलता वाढते आहे. त्यामुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक या दोन्हींवर परिणाम होतो. अतिवजनामुळे मुलांमध्ये मधुमेह, उच्च रक्‍तदाब, कोलेस्ट्रॉल आदी समस्या निर्माण होतात. जसे वय वाढेल, तसे हृदविकार आणि पॅरॅलिसिस होण्याची शंका वाढते.

दृष्टीदोष : हल्ली बर्‍याच मुलांना लहान वयात चष्मा लागण्याचे प्रमाण अधिक दिसते. मुलांमध्ये दूरची दृटी आणि जवळची दृष्टी दोन्ही प्रकाराचे दोष आढळून येतात. डोळ्यांतून पाणी येणे, खाज सुटणे, जळजळणे या समस्या पाहायला मिळतात. मुलांच्या मोबाईल आणि टीव्ही पाहण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने हे आव्हान निर्माण झाले आहे. एका अभ्यासानुसार, 20 टक्के शालेय मुलांमध्ये दृष्टी कमी असते. लहान वयात ते कळून न आल्याने गंभीर परिस्थिती उद्भवते. तज्ज्ञांच्या मते, शाळेत पाठवण्यापूर्वी आपल्या मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून घ्यायला हवी. कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्ही हे चार तासांहून अधिक काळ पाहिल्यास डोळे खराब होतात. यावर उपाय म्हणजे मुलांना अंडे आणि मासळी खायला द्या. योग्य आणि नैसर्गिक आहार घेतल्यास रेटिनापर्यंतचे रक्ताभिसरण चांगले होते. डोळ्यांतील लेन्स योग्य राहते आणि डोळ्यांच्या नसा कमजोर होत नाहीत.

बद्धकोष्ठता : आजघडीला शाळेत जाणार्‍या जवळपास 40 टक्के मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. त्याचे कारण पुन्हा आधुनिक जीवनशैली आणि पाश्‍चिमात्य पद्धतीचा आहार. पाश्‍चिमात्य पद्धतीच्या आहारात अतिप्रमाणात कार्बोहायड्रेट, चरबी आणि साखर खूप जास्त प्रमाणात असते. अशा आहारात पोषक घटक आणि तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण नगण्य असते. या पदार्थात मैद्याचा सर्वाधिक वापर केलेला असतो. त्यामुळे ते लहान मुलांना पचण्यास जड जाते.त्यामुळे असे पदार्थ खाल्ले की, त्यांना बद्धकोष्ठता होते. याशिवाय मुुले पाणी प्यायचे विसरतात किंवा कंटाळा करतात, त्यामुळेही बद्धकोष्ठता होते.

दमा : मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाणही अधिक होत चालले आहे. दोन-तीन वर्षांच्या मुलांना सातत्याने नेब्युलाईझ करावे लागते. याचे कारण मुलांना स्तनपानाऐवजी बाटलीने दूध पाजणे आणि वाढते वायूप्रदूषण. शहरांमध्ये हवेच्या प्रदूषणामुळे अस्थमाचे रोगी वाढताहेत. त्याचबरोबर सतत प्रतिजैविके दिल्यामुळे मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळेच मुलांना दम्यासह इतरही काही रोगाने ग्रस्त व्हावे लागते. श्‍वसनसंस्थेशी निगडित अस्थमा, सायनो सायटिस, अ‍ॅलर्जी, सर्दी, न्यूमोनिआ आणि अ‍ॅलर्जिक ब्रॉकटायटीस हे आजार मुलांमध्ये वाढताना दिसताहेत.

मानसिक ताण : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार दोन टक्के मुलांना औदासिन्य येते. हे औदासिन्य गंभीर नसेल; पण एक वर्षापासून सुरू असेल तर त्याला डिसथायमिया म्हटले जाते. यामध्ये मुले आपला आत्मविश्‍वास गमावतात तसेच त्यांना जेवण जात नाही, झोप लागत नाही. डिसथायमिया या रोगाने ग्रस्त 10 टक्के मुलांना औदासिन्य किंवा डिप्रेशन येते. त्याची कारणे विविध आहेत. आई-वडिलांमधील बेबनाव, चांगले गुण मिळवण्याचा दबाव, इतर मुलांची चिडवाचिडवी, लैंगिक शोषण अशी अनेक कारणे आहेत.

डॉ. प्राजक्‍ता पाटील

Back to top button