पावसाळ्यात पौष्टिक आहार खा आजारांपासून दूर रहा

ऋतुमानानुसार केलेला आहार बदल आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करत असतो. त्याद़ृष्टीने विचार करता पावसाळ्यात आहारामध्ये कोणते बदल केले पाहिजेत, कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे, याविषयी जाणून घेणे औचित्याचे ठरेल.

योग्य जीवनशैलीबरोबरच योग्य घटकांचा आपल्या आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढू शकते.

मसाले :

मान्सूनच्या काळात आपल्या स्वयंपाकघरात विविध प्रकारचे मसाले ठेवावेत. हळद, जिरे, मेथी, आले, लसूण, लवंग, दालचिनी, कडपत्ता, तुळस, काळी मिरी यांसारख्या मसाल्यांचा नियमित उपयोग करावा.

या मसाल्यांचे मिश्रण करून काढा तयार करू शकता किंवा दररोज आपल्या आहारात समावेश करू शकता. याशिवाय मसाला चहादेखील घेऊ शकतो.

गरम सूप :

पावसाचा विषय निघतो तेव्हा गरमागरम सूपची सर्वांना आठवण येते. पावसाळ्यात सीताफळ सूप, टोमॅटो, वाटाणे, मिक्स्ड व्हेज सूप किंवा रस्सम तयार करू शकता.

व्हिटॅमिन सी आणि उच्च प्रतिच्या बिटा कॅरोटिनमुळे शरिरातील इम्युनिटी बूस्ट होते. त्याचे मिश्रण तयार करताना लसूण आणि आल्याचा समावेश आवर्जून करावा. हे दोन्ही घटक हायअँटी इंफ्लामेंट्री आहेत. विशेषत: लसूण अँटिबायोटिक आणि अँटिफंगलचे काम करते.

सुकामेवा :

थंडी असो उष्णता असो मीठ नसलेले बदाम, अक्रोड, शेंगा, सूर्यफुलाचे बी, भोपाळ्याचे बी हे शरिराला हानीकारक ठरत नाहीत. दररोज मूठभर हा सुकामेवा खाणे गरजेचे आहे. अर्थात गरजेपेक्षा अधिक त्याचे सेवन करू नये, अन्यथा अपचन होऊ शकते.

ओवा :

ओवा हा शक्तिशाली अँटिफंगल गुण असणारा पदार्थ आहे. मान्सूनच्या काळात परिसरात सतत ओलावा राहत असल्याने फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका राहतो. त्यामुळे आपण ओव्याचा चहा करू शकता किंवा त्याला सॅलेडमध्ये देखील मिसळू शकता.

ओवा हा श्वसनप्रणालीसाठी फायदेशीर आहे. त्याचवेळी कफ कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर आहे. विशेषत: गरम पाण्याबरोबर ओवा घेतला जातो.

भाजीपाला :

कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, मुळा यांसारखा भाजीपाला हा शरिरातील सूज नियंत्रित करण्याचे काम करतो. विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी भाज्यांचे सेवन महत्त्वाचे आहे. शक्तिशाली इम्युनिटी बूस्टर म्हणून हा भाजीपाला काम करतो.

परंतु भाज्या चांगल्या शिजलेल्या असणे गरजेचे आहे. वाफ आणून भाज्या चांगल्या उकडाव्यात. भाजी करण्याबरोबरच सूप किंवा फ्राय करून त्याचे सेवन करू शकता.

योग्य जीवनशैलीबरोबरच आपण या घटकांचा आपल्या आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढू शकते. आहाराचे पथ्य पाळल्यास आणि सकस भोजन असल्यास पावसाळ्यामुळे होणार्‍या आजारापासून बचाव होऊ शकतो.

सर्व आजार हे आपल्या इम्यून सिस्टीमवर अवलंबून आहेत. आपली इम्यून सिस्टीम कमकुवत असेल तर फिट बॉडी, झिरो साईज किंवा सिक्स पॅक अ‍ॅब्ज हे आजारापासून वाचवू शकत नाहीत.

डॉ. भारत लुणावत

Back to top button