सांधेदुखी : अत्याधुनिक उपचार

भारतातील सांधेदुखीचे प्रमाण वेगाने वाढत असून साधारणतः देशातील 55 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या 25 टक्के लोकांना सांधेदुखी चा त्रास असतो. सांधेदुखीमध्ये गुडघ्याच्या सांधेदुखीचे प्रमाण 50 टक्के असते.

वाढत्या वयानुसार सांध्यांमध्ये असणार्‍या कार्टिलेज नावाच्या घटकांची झीज झाल्यामुळे हा आजार होतो. वयोवृद्धांच्या तुलनेत आता तरुणांमध्येही सांधेदुखीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, व्यायामचा अभाव आणि अयोग्य व्यायाम पद्धतीमुळे गुडघेदुखी होण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीरातील हार्मोनल बदल रजोनिवृत्ती यामुळे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा गुडघेदुखीची शक्यता अधिक असते.

गुडघ्यात तीव्र वेदना जाणवणं, गुडघ्याला सूज येणं, सांधा आखडणे, सांधा बाहेरून लाल होणे, सांध्यास स्पर्श केल्यास गरम लागणे व त्यावेळी वेदना होणे, खूप दिवसांचा संधिवात असेल तर सांधे वेडेवाकडे होणे, कटकट असा आवाज येणं, शारीरिक हालचाली मंदावणे ही सांधेदुखी ची प्रमुख लक्षणे आहेत.

सांध्याच्या दुखण्यावर वेळीच योग्य उपचार केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. यासाठी संधिवाताची वारंवार तपासणी करून घेणं गरजेचं आहे.

सांधेदुखीची समस्या आहे का हे तपासून पाहिल्यासाठी काही रक्ताच्या चाचण्या आणि सांध्याचा एक्स-रे काढून पाहिला जातो. सांधेदुखीवर वेळीच योग्य उपचार न केल्यास हा त्रास वाढू शकतो.

सांधेदुखीची चार गटांत विभागणी केली जाते. पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात सांधेदुखीच्या समस्येचे निदान झाल्यास वेळेवर उपचार मिळाल्यास गुडघेदुखी बरी होऊ शकते.

यासाठी नियमित संतुलित आहार घेणं, वजनावर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम करणे, सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेणं आणि वेदनाशामक औषध यामुळे गुडघेदुखी कमी करता येऊ शकते.

वैद्यकीय शास्त्रामधील प्रगतीमुळे विशिष्ट इंजेक्शच्या उपचारामुळे हाडांची झालेली झीज भरून काढता येते. इतकंच नाहीतर हाडांची होणारी झीज टाळता येऊ शकते.

रोबोटिक शस्त्रक्रियेचे फायदे –

* आपल्या गुडघ्याच्या कुर्चेतील झिजेची 3 डी ईमेजच्या मदतीने लांबी, रूंदी, खोलीचे मापन करून खराब कुर्चा बरिंग करून काढता येतो.

* नैसर्गिक स्नायू व लिंगामेंट या रचनांचे जतन.

* सांध्याची आभासी प्रतीमा तयार करून वास्तविक शस्त्रक्रियेपूर्वी त्याच्या हालचालीचे मूल्यांकन केले जाते.

* रोबोटिकच्या सहाय्याने अचूक शस्त्रक्रिया करता येते.

* कमी रक्तस्राव.

* शस्त्रक्रियेननंतर रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचा कालावधी कमी होतो.

* हृदयविकार, मेंदूविकार व इतर शारीरिक व्याधींनी पिडीत असणार्‍यांसाठी सुद्धा ही शस्त्रक्रिया अतिशय सुरक्षित आहे.

* ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी रुग्ण पूर्वीप्रमाणे आपले दैनंदिन आयुष्य जगू शकतो. सायकलिंग करणं, पोहणे, ट्रॅकिंग यांसारखे छंदही जोपासू शकतो.

त्यामुळे सांधेदुखीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. सांध्याच्या दुखण्याची लक्षणं आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला
घ्या.

डॉ. नीलेश कुलकर्णी

Back to top button