अ‍ॅनेमिया आणि आहारबदल | पुढारी

अ‍ॅनेमिया आणि आहारबदल

काम करताना किंवा अभ्यास करताना तुम्हाला मध्येच पेंग येते का? तुमचे डोके वारंवार दुखते का? चक्कर आल्यासारखे वाटते का? रात्री झोपल्यावर पाय हलवण्याची तीव्र इच्छा होते का? पाय दुखतात का? या सगळ्यांची उत्तरे जर ‘हो’ अशी असतील तर तुम्ही अ‍ॅनेमिया या आजाराने त्रस्त आहात आणि या आजाराने आपल्या देशातील 51 टक्के महिला ग्रस्त आहेत, असे ग्लोबल न्यूट्रीशियन रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या अहवालात म्हटले आहे की, बहुतांश भारतीय महिलांमध्ये लोहाची कमतरता आहे आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका आहे. लोहाची कमतरता असणे म्हणजेच अ‍ॅनेमिया असणे. शरीरात जेव्हा लाल रक्तपेशींची संख्या कमी असते तेव्हा हा आजार होतो.

लोह आपल्या शरीराला अत्यंत आवश्यक असणारा पोषक घटक आहे. लाल रक्तपेशी तयार करण्यात लोहाचा उपयोग केला जातो. लाल रक्तपेशी आपल्या शरीरात ऑक्सिजनचे वहन करतात. त्यामुळे शरीरात लोह कमी असेल तर अनेक आजार उद्भवतात आणि त्यातील काहींमुळे तर जीवावरही बेतू शकते. लोह कमी असल्याचे आणि हिमोग्लोबिन कमी होत असेल तर कमालीचा थकवा येणे, त्वचा निस्तेज होणे, धाप लागणे, हात-पाय थंड पडणे, चक्कर येणे, नखे ठिसूळ होणे आणि चिंताग्रस्त होणे ही लक्षणे दिसतात.

याची वेळीच तपासणी केली नाही तर हृदयविकारासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात, महिलांना गरोदरपणात त्रास होतो आणि बाळाची वाढ नीट होत नाही. लोह कमी होण्याची कारणे सामान्यच असतात. निकृष्ट दर्जाचा आहार, प्रमाणाबाहेर रक्तस्त्राव होणे, गरोदरपणा आणि लोह सामावून घेण्याची शरीराची क्षमता कमी होणे ही शरीरातील लोह कमी होण्याची प्रमुख कारणे असतात.

शरीराला पुरेसे लोह मिळावे यासाठी पोषक आहार घेणे महत्त्वाचे असते. लोहाची कमतरता असलेला आहार घेतला तर शरीरातील लोह कमी होते. म्हणूनच लोहाचे प्रमाण जास्त असलेला आहार घेणे गरजेचे आहे. अन्नात दोन प्रकारचे लोह असते. एक म्हणजे हेमे लोह आणि दुसरे बिगर-हेमे लोह. हेमे लोह मांस, चिकन आणि सीफूडमध्ये आढळून येते, तर बिगर-हेमे लोह वनस्पतीजन्य अन्नात असते.

तुम्हाला अ‍ॅनेमिया झाला असेल तर तुमच्या आहारात रेड मीट, पोर्क, चिकन, सीफूड, अंडी, बीन्स, पालेभाज्या, सुका मेवा, कडधान्ये, पास्ता आणि शेंगदाणे वगैरेचा समावेश असायला हवा. आहारात ‘क’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश असेल तर शरीराची लोह सामावून घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे लोहयुक्त आहाराबरोबरच ‘क’ जीवनसत्त्व असलेला आहार घेणेही चांगले ठरते. थोडक्यात, फळे आणि ब्रोकोली, संत्री, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, भोपळी, मिरची यांचाही आहारात समावेश करावा.

याशिवाय भाजी लोखंडाच्या कढईत शिजवणे, खाण्यात गूळ शेंगदाण्याचा वापर करणे यामुळेही शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते आणि रक्ताचीही वाढ होते.

आपल्या देशात महिलांच्या आहाराकडे त्या स्वत: आणि त्यांचे कुटुंबीय दुर्लक्ष करतात. घरात राबणारी महिला योग्य तर्‍हेचा आहार घेते की नाही, याकडे लक्षच दिले जात नाही. ती गर्भवती असली तरीही. त्याचमुळे महिला कुपोषित राहतात आणि त्यामुळे त्यांची नवजात बालकेही कुपोषित राहतात.

महिलांप्रमाणेच पाच वर्षांच्या आतील मुले अ‍ॅनेमियाने ग्रस्त असण्याचे प्रमाण आपल्या देशात जास्त आहे.
महिला आणि लहान मुलांबरोबरच आता जगभरात पुरुषांमध्येही अ‍ॅनेमियाचा विकार वाढत असल्याचे ‘लान्सेट ग्लोबल हेल्थ’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अ‍ॅनेमियामुळे पुरुषांमध्ये थकवा, लक्ष केंद्रित न होणे, आळस अशा समस्या निर्माण होतात.

अ‍ॅनेमिया प्रामुख्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाल्याने आणि रक्त कमी झाल्याने होतो. त्यामुळे लोहयुक्त आहार घेणे हाच त्यावरचा प्रमुख प्रभावी उपाय आहे; पण त्याचबरोबर लोहाचा शरीराला पुरेसा पुरवठा होण्यासाठी लोहयुक्त औषधे आणि पोषक पदार्थ घेणे आवश्यक आहे.

Back to top button