मूतखड्याच्या विकारात 'हा' आहार टाळा - पुढारी

मूतखड्याच्या विकारात 'हा' आहार टाळा

पोटात दुखणे, लघवीला आग होणे, कळ मारणे इत्यादी लक्षणे जाणवू लागल्यावर सोनोग्राफीची तपासणी केल्यानंतर मूतखड्याचे निदान झाल्यावर ‘मूतखडा म्हणजे ऑपरेशन’ अशा गैरसमजाने माणूस भयभीत झालेला असतो. वास्तविक प्रत्येक मूतखड्याला लगेच ऑपरेशन करावे लागते असे नाही. अनेक वेळेला अनेक रुग्णांत नियमित आयुर्वेदिक औषधे आणि जोडीला पथ्यकर आहार यांच्या उपयोगाने ऑपरेशनशिवायच मूतखड्याचा विकार बरा झालेले अनुभवास येते. उपचारामध्ये आहारीय पथ्याला जास्त महत्त्व असलेला हा एक विकार आहे. याच्याच जोडीला विकाराचा पनर्उद्भव टाळण्यासाठी ऑपरेशन झाल्यानंतरही नियमित आहाराचे पथ्य पाळणे महत्त्वाचे असते. तसेच काही जणांमध्ये लघवीवाटे खर जाणे किंवा लघवी साफ न होणे या तक्रारी असतानाही हेच पथ्य उपयोगी असते.

मूतखड्याच्या विकारात टाळण्याचा आहार :

मक्याचे कणीस, मक्याची भाकरी, वरीचा भात, नाचणीचा भात अथवा पापड, शेवगा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, पालक, दोडका, तांबडा भोपळा, अंबाडी, चुका, मेथी, घोसावळी या भाज्या तसेच वाल, वाटाणे, पावटे, मटकी, चवळी, उडीद या कडधान्याच्या उसळी, जांभूळ, कवट, अननस, आलुबुखारा, पीच करमळ ही फळे, लसणाची चटणी, गाजर, शाबूदाण्याची खिचडी, शाबूवडे, दही, चीझ, पनीर हे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. तसेच चमचमीत, मसालेदार, तळलेले पदार्थ नेहमीच टाळावेत. मासे, खेकडे, मटण नेहमी वर्ज्य करावे. मद्यपान, अतिप्रमाणात श्रम, सतत जागरण, वारंवार प्रवास या गोष्टीही नेहमी वर्ज्य कराव्यात.

मूतखड्याच्या विकारात घेण्याचा आहार :

 मूतखडा हा विकार असणार्‍यांनी नेहमी जुन्या तांदुळाचा भात, गव्हाची पोळी, तांदळी, लाल माठ, काटे माठ, पडवळ, मुळा या भाज्या तसेच मुगाचे वरण, कुळिथाची उसळ अथवा पिटले, काकडी, द्राक्षे, खजूर, कलिंगड, ओली हळद, नारळाचे पाणी हे पदार्थ नियमितपणे घ्यावेत. तसेच आहारात धने, जिरे, कोथिंबीर, वेलदोडे, हाळीव, गवती चहा, सब्जा बी, वाळा सरबत, आवळा सरबत, मोरआवळा यांचा नियमितपणे वापर करावा. कोंबडीचे मांस अधूनमधून घेण्यास हरकत नाही.

वरील पथ्यांबरोबरच नियमित वेळी आहार, भरपूर पाणी वारंवार पिणे हेदेखील महत्त्वाचे असते. खडा लवकर निघून जाण्यासाठी दोन चमचे कुळीथ आणि एक चमचा जिरे यांचे एक कप कढण दिवसातून दोनवेळा घ्यावे. एक तांब्या पाण्यात एक मूठ धने व चार चमचे जिरे रात्री ठेवून व सकाळी गाळून तीन-चार वेळा प्यावे. मुळ्याचा रस अर्धा कप + एक चतुर्थांश चमचा खाण्याचा सोडा हे मिश्रण रोज एक वेळ घ्यावे.

डॉ. आनंद ओक

Back to top button